सलग तिसऱ्या तिमाहीत विकासदर खुंटला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’ची वाढ केवळ ५.७ टक्‍केच; पायाभूत सुविधा क्षेत्र खालावले

नवी दिल्ली - नोटाबंदीचा परिणाम आणि उत्पादन क्षेत्राच्या सुमार कामगिरीचा फटका विकासाला बसला आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची केवळ ५.७ टक्‍क्‍यांनी वाढ झाली. सलग तिसऱ्या तिमाहीत विकासदर खुंटला असून चीनपेक्षा खाली गेला आहे. ‘जीडीपी’चा गेल्या तीन वर्षांतील हा नीचांकी स्तर आहे.

पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’ची वाढ केवळ ५.७ टक्‍केच; पायाभूत सुविधा क्षेत्र खालावले

नवी दिल्ली - नोटाबंदीचा परिणाम आणि उत्पादन क्षेत्राच्या सुमार कामगिरीचा फटका विकासाला बसला आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची केवळ ५.७ टक्‍क्‍यांनी वाढ झाली. सलग तिसऱ्या तिमाहीत विकासदर खुंटला असून चीनपेक्षा खाली गेला आहे. ‘जीडीपी’चा गेल्या तीन वर्षांतील हा नीचांकी स्तर आहे.

केंद्रीय सांख्यिकी विभागाने गुरुवारी आर्थिक आकडेवारी जाहीर केली. जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या तुलनेत जीडीपी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, मात्र प्रत्यक्षात तो घसरला आहे. जीडीपीच्या ताज्या आकडेवारीतून सरकारने नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या नोटाबंदीतून उद्योग क्षेत्र अद्याप सावरलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत विकासदर ६.१ टक्‍क्‍यापर्यंत घसरला होता. २०१६-१७ मधील एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपी दर ७.९ टक्के होते. नोटाबंदीचे चटके सहन करणाऱ्या बड्या उद्योजकांनी, वाहन उत्पादकांनी, दैनंदिन वस्तू उत्पादक कंपन्यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंमलबजावणीच्या पार्श्‍वभूमीवर नव्या उत्पादनाऐवजी शिल्लक साठा संपवण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनात घट झाल्याचे बोलले जाते. पहिल्या तिमाहीत कारखाना उत्पादनात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. एकूण उत्पादन १.२ टक्‍क्‍यांपर्यंत घसरले. गेल्या वर्षी याच तिमाहीत उत्पादन १०.७ टक्के होते. कृषी उत्पादन २.३ टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित राहिले. गेल्या वर्षी याच तिमाहीत कृषी उत्पादन २.५ टक्के होते.

दरम्यान, माजी मुख्य संख्याशास्त्रज्ञ प्रणब सेन यांनी जीडीपीच्या घसरणीस वस्तू आणि सेवाकराला जबाबदार धरले आहे. सेन म्हणाले, की प्रत्यक्ष अंदाजापेक्षा जीडीपी ०.४० टक्‍क्‍याची घट झाली. चालू वर्षासाठी जीडीपी जेमतेम ६.३ टक्के राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान पहिल्या तिमाहीत प्रमुख आर्थिक सेवांमध्ये सात टक्‍क्‍यांची वृद्धी नोंदवण्यात आली. व्यापार, हॉटेल, दळणवळण, माध्यमे, प्रशासन, संरक्षण, वायू आणि पाणीपुरवठा आदी सेवांचा समावेश आहे. 

पायाभूत क्षेत्र खालावले
अर्थव्यवस्थेतील आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांची जुलैमधील कामगिरी खालावली आहे. आठपैकी पाच औद्योगिक क्षेत्रांमधील उत्पादन उणे नोंदवण्यात आले. त्यामुळे आठ क्षेत्रांचा वृद्धीदर २.४ टक्‍क्‍यांपर्यंत घसरला आहे. कच्चे तेल ०.५ टक्के, रिफायनरी उत्पादने २.७ टक्के, खते ०.३ टक्के आणि सिमेंट उत्पादनात २ टक्‍क्‍यांची घट झाली. कोळसा उत्पादनात ०.७ टक्‍क्‍याची घट नोंदवण्यात आली. नैसर्गिक वायू उत्पादनात मात्र जुलै महिन्यात ६.६ टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे सरकारने म्हटले आहे. त्याचबरोबर पोलाद उत्पादनात ९.२ टक्के आणि ऊर्जानिर्मितीत ५.४ टक्‍क्‍याची वाढ झाली. याच आठ प्रमुख क्षेत्राचा एप्रिल ते जुलै या कालावधीतील वृद्धिदर २.५ टक्के राहिला. गेल्या वर्षी याच कालावधीत तो ६ टक्के होता. प्रमुख क्षेत्रांच्या निराशाजनक कामगिरीचे पडसाद औद्योगिक उत्पादन निर्देशांकावर (आयआयपी) उमटणार आहेत. 

वित्तीय तूट लक्ष्यपूर्तीच्या नजीक 
सरकारच्या विविध खात्यांनी मोठ्या प्रमाणात खर्चाची तरतूद केल्याने जुलैअखेर वित्तीय तुटीचे लक्ष्य ९२.४ टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी जुलैअखेर वित्तीय तूट ७३.७ टक्‍के होती.

Web Title: arthavishwa news development rate decrease