एस्सार ऑईल कंपनीची ‘रॉसनेफ्ट’ला विक्री

पीटीआय
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

एसबीआय, आयसीआयसीआय, आयडीबीआय, ॲक्‍सिस बॅंक व स्टॅंडर्ड चार्टर्ड या बॅंकांसह अन्य बॅंकांचे ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज रॉसनेफ्ट कंपनी फेडणार आहे. त्यामुळे एस्सार ऑईल कंपनीवरील ६० टक्के कर्जाचा भार कमी होणार आहे.
- प्रशांत रुईया, संचालक, एस्सार समूह

८३ हजार कोटींचा व्यवहार; ‘एस्सार’वरील ६० टक्के कर्जाचा भार होणार कमी

मुंबई - कर्जबाजारी असलेल्या एस्सार समूहाने त्यांची प्रमुख एस्सार ऑईल कंपनीला रशियन कंपनी रॉसनेफ्टला विकण्याचा निर्णय घेतला आहे. एस्सार ऑईल व रॉसनेट कंपनीमध्ये १२.९ अब्ज डॉलरला (अंदाजे ८३ हजार कोटी) विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला. मागील वर्षी ऑक्‍टोबर २०१६ मध्ये झालेल्या ब्रिक्‍स परिषदेत या व्यवहाराची घोषणा करण्यात आली होती. एस्सार ऑईल कंपनीकडे कर्ज असणाऱ्या बॅंकांनी त्यांचे ४५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम परत करण्याच्या मागणीमुळे हा व्यवहार खूप दिवसांपासून रखडला होता.

जून २०१७ मध्ये जीवन विमासह (एलआयसी) अन्य कर्जदात्यांनी कंपनीच्या विक्रीला परवानगी दिली होती. एस्सार ऑईल कंपनीवर एलआयसीचे सर्वाधिक १२०० कोटींचे कर्ज आहे. विक्रीच्या परवानगीनंतर हा व्यवहार जुलै २०१७ च्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, कायदेशीर बाबींमुळे हा व्यवहार आणखी काही काळासाठी रखडला होता. भारतीय स्टेट बॅंक तसेच आयसीआयसी बॅंकेसह २३ कर्जदार बॅंकाच्या संयुक्त समूहाने एस्सार ऑईलच्या व्यवहाराला मान्यता दिली. 

रशियाची सर्वांत मोठी थेट परकी गुंतवणूक
एस्सार ऑईल कंपनीला १२.९ अब्ज डॉलरला विकत घेत रशियन कंपनी रॉसनेफ्टने आतापर्यंत सर्वांत मोठा विक्रीव्यवहार केला आहे. हा व्यवहार रशियाची सर्वांत मोठी थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) ठरणार आहे. एस्सार कंपनीने रॉसनेफ्टशी केलेल्या व्यवहारात गुजरातमधील वडीनारजवळील सालान येथे दोन कोटी टन क्षमतेचा तेल शुद्धीकरण प्रकल्प, याचसोबत ऊर्जा प्रकल्प, किरकोळ व्यापार करणारे ३५०० पेक्षा अधिक पेट्रोल पंपांचा समावेश आहे. वडीनार प्रकल्प देशातील एकूण उत्पादनाच्या ९ टक्के उत्पादन करतो.

Web Title: arthavishwa news essar oil company sailing to rosneft