शेअर बाजारामुळे निश्‍चित विकासदर गाठू - विक्रम लिमये

शेअर बाजारामुळे निश्‍चित विकासदर गाठू - विक्रम लिमये

मुंबई - शेअर बाजाराचा अभ्यास करूनच गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. राष्ट्रीय शेअर बाजारात बदल करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आपल्याला जर आठ टक्‍क्‍यांपर्यंत विकासदर गाठायचा असेल तर केवळ बॅंकेवर अवलंबून राहू नये, असे राष्ट्रीय शेअर बाजाराचे (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांनी म्हटले आहे. शेअर बाजाराशी निगडित विविध विषयांवर लिमये यांनी मते मांडली.

एनएसईमध्ये येण्याबाबत आधी ठरवले होते का? 
मला तशी म्हटलं तर शेअर बाजार किंवा ‘कॅपिटल मार्केट’शी संबंधित कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. इतिहास आणि इंग्रजीमध्येदेखील काही करावं, असा मला वाटलं नाही. म्हणून मी कॉमर्सकडे आलो. त्यानंतर मी सीए केलं. मग काय त्या विषयात आणखी आवड निर्माण होत गेली. काही काळ अमेरिकेत काम केल्यानंतर भारतात मी ‘आयडीएफसी’मध्ये नोकरी स्वीकारली. नोकरी करत असतानाच ‘बॅंकिंग इन्फ्रास्ट्रक्‍चर’ उभं करण्याचा मोठं आव्हान होतं. 

‘एनएसई’त अजून कुठल्या समस्या आणि आव्हाने आहेत? 
एनएसईमध्ये येऊन मला पाच महिने होत आहेत. बदल करण्यासाठी खूप काही आहे. आपल्याला ७ ते ८ टक्के विकासदर गाठायचा असेल, तर फक्त ‘बॅंक फायनान्स’वर ही गोष्ट शक्‍य नाही. त्यामुळे शेअर बाजाराशी संबंधित आणखी काही प्रॉडक्‍ट आणण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये एनएसईमध्ये काही घटना घडल्या होत्या; मात्र त्यासंदर्भात ‘सेबी’शी चर्चा सुरू आहे. त्याला थोडा वेळ लागेल; पण आम्ही नक्की त्यातून मार्ग काढू.  

भविष्यात एनएसई कुठे असेल? काय लक्ष्य ठेवले आहे? 
सध्या आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. काही ‘प्रॉडक्‍ट’मध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. जागतिक पातळीवर आर्थिक विकास किंवा ‘ॲसेट क्‍लास’च्या बाबतीत बोलायचं झालं तर चीन वेगाने पुढे येतोय. त्यामुळे परकी गुंतवणूकदार तिकडे वळतात. भारताला अजून काही टप्पा गाठायचा आहे. आपल्याकडे आणखी ‘इंडेक्‍स स्पेसिफिक’ गुंतवणूक वाढायला हवी. चीनच्या तुलनेत आपल्याकडे हे प्रमाण कमी आहे. त्यासाठी सरकारच्या धोरणात सातत्य आणि अर्थव्यवस्थेत स्थिरता हवी. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अनुकूल आहेत. 

बिटकॉइन सध्या चर्चेत आहे. त्याबद्दल काय सांगाल? 
बिटकॉइनचे ट्रेडिंग भारतातसुद्धा होते; मात्र ते ट्रेड ‘ओव्हर द काउंटर’ (ओटीसी) होतात. बिटकॉइनला अजून रिझर्व्ह बॅंक किंवा ‘सेबी’ची मान्यता मिळायला वेळ लागेल. आपण बिटकॉइनची किंमत किंवा ट्रेडिंग बाजूला ठेवून त्याच्या मागे असलेल्या ‘ब्लॉकचेन’च्या तंत्रज्ञानावर लक्ष द्यायला पाहिजे. आपण ‘ब्लॉकचेन’ या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. आम्ही ‘ब्लॉकचेन’ लॅब तयार केली असून, त्यावर काम सुरू आहे. भारतात काही बॅंकांनी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. 

शेअर बाजारची वेळ वाढणार का? 
आपण परदेशी गुंतवणूकदारांबरोबर भारतीय गुंतवणूकदारांचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे साडेसहा तास बाजार सुरू असतो; मात्र समजा त्यानंतर जागतिक पातळीवर बाजारावर परिणाम करणारी घटना घडली, तर मात्र त्याचा फटका भारतीय गुंतवणूकदारांना बसू शकतो. परकी गुंतवणूकदार सिंगापूर बाजारात व्यवहार करून जोखीम कमी करू शकतो. त्यामुळे भारतात ठरविक प्रॉडक्‍टमध्ये म्हणजे ‘इंडेक्‍स हेज’मध्ये परवानगी द्यायला हवी. 

गुंतवणूकदारांनी कशी गुंतवणूक करावी? 
कोणत्याही मित्रांनी, नातलगांनी सांगितलं म्हणून किंवा अफवांवर विश्वास ठेवून शेअर बाजारात गुंतवणूक करू नये. ज्या गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराचा अभ्यास नसेल, तरीही शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणे चांगले. माझं विचाराल तर मी स्वतः शेअर बाजारात थेट खरेदी करत नाही. कारण त्यासाठी तुमच्याकडे वेळ असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे मी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com