एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्सचा आयपीओ कसा आहे?

एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्सचा आयपीओ कसा आहे?

प्रश्‍न - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ कधीपासून येत आहे व त्याचा किंमतपट्टा किती आहे?
- एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफचा आयपीओ ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान प्राथमिक बाजारात उपलब्ध होत आहे. ‘ऑफर फॉर सेल’ पद्धतीने ही विक्री होत असून, त्याद्वारे रु. ८६९५.०१ कोटी उभे केले जाणार आहेत. या इश्‍यूसाठीचा किंमतपट्टा रु. २७५ ते रु. २९० प्रतिशेअर असा आहे. १७ नोव्हेंबरच्या आसपास या शेअरची नोंदणी एनएसई आणि बीएसई वर होणार आहे. कमीत कमी ५० शेअर व त्या पटीत (जास्तीत जास्त ६५० शेअरसाठी) किरकोळ गुंतवणूकदार अर्ज करू शकतील. 

प्रश्‍न - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ ही कंपनी करते काय? 
- एचडीएफसी आणि स्टॅंडर्ड लाइफ आबर्डीन यांच्या संयुक्त विद्यमाने २००० मध्ये कंपनीची स्थापना करण्यात आली. वैयक्तिक आणि समूह विमा सेवा कंपनी पुरविते. या सेवांमध्ये पेन्शन प्लॅन, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, हेल्थ प्लॅन, विमेन व चिल्ड्रेन प्लॅन देखील आहेत. या सर्व सेवा एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफच्या शाखा, कर्मचारी, विमा प्रतिनिधी, भागीदार बॅंका यांच्याद्वारे पुरविल्या जातात.

प्रश्‍न - कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?
- आर्थिक वर्ष २०१४ पासून ते २०१७ पर्यंत मिळविलेल्या प्रीमियममध्ये १७,२९० कोटी रुपयांपासून ३०,५५४ कोटी रुपयांइतकी, तर निव्वळ नफ्यात ७२५ कोटी रुपये ते ८८७ कोटी रुपये इतकी भरघोस वाढ झाली आहे. मागील तीन वर्षांतील रिटर्न ऑन नेटवर्थ २८.३ टक्के आहे. सॉल्व्हन्सी रेशो १९२ टक्के, तर क्‍लेम सेटलमेंट रेशो ९९.२ टक्के आहे. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती उत्तमच आहे.

प्रश्‍न - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफच्या शेअरसाठी देण्यात आलेली ऑफर कशी वाटते?
- कंपनीच्या मागे ‘एचडीएफसी’ नाव असलेला मजबूत ब्रॅंड, सलग आणि उत्तम आर्थिक कामगिरी, आगामी काळात या क्षेत्राची होणारी वाढ, ग्राहकांच्या तक्रारी १५ दिवसांत सोडविण्याचा ९९ टक्के दर, मजबूत संगणकीय जाळे या कंपनीच्या निश्‍चितपणे मजबूत बाबी आहेत. परंतु शेअर बाजारात असे म्हणतात, की ‘प्रत्येक वस्तू एका विशिष्ट किमतीलाच आकर्षक ठरते.’ या तत्त्वात या कंपनीची ‘ऑफर प्राइस’ बसत नाही. याच क्षेत्रातील आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ (पीई रेशो ३३) आणि एसबीआय लाइफ (पीई रेशो ६९) या स्टॉक एक्‍स्चेंजवर आधीच नोंदणी झालेल्या कंपन्या आहेत. कंपनीची २९० ही ऑफर किंमत गृहीत धरली असता, पीई रेशो ६६ च्या घरात येतो. प्राइस/बुक १५.२ आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ ८.७, तर एसबीआय लाइफ ११.५ इतक्‍या दराने बाजारात चालू आहे. बाजारहिश्‍श्‍याचा विचार केला, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ २२.३ टक्के, एसबीआय लाइफ २०.७, तर एचडीएफसी लाइफ १२.७ टक्के आहे.

कंपनीच्या सर्व मजबूत बाबींचा विचार करुन देखील ‘ऑफर प्राइस’ अधिक वाटते. हा सर्व विचार करता, जास्त जोखीम घेण्याची तयारी असेल तरच या इश्‍यूसाठी अर्ज करावा; अन्यथा नाही केला नाही तरी चालेल, असे वाटते. 
(डिस्क्‍लेमर ः लेखिका इक्विटी रिसर्च ॲनालिस्ट आहे. तिने तिच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. मात्र, शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर व तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com