महागाईच्या धसक्‍याने शेअर बाजारात नफावसुली

महागाईच्या धसक्‍याने शेअर बाजारात नफावसुली

मुंबई - जागतिक बाजारात खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशांतर्गत महागाईचा पारा चढेल, या भीतीने मंगळवारी (ता. १२) शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. चौफेर विक्रीमुळे दिवसअखेर सेन्सेक्‍स २२७.८० अंशांनी घसरला आणि ३३ हजार २२७ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ८२.१० अंशांची घट झाली आणि तो १० हजार २४० अंशावर स्थिरावला.

सरकारकडून औद्योगिक उत्पादन आणि महागाईची आकडेवारी दिवसअखेर जाहीर होण्याच्या पार्श्‍वभूमीवर बाजारावर दबाव दिसून आला. आशियातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये नकारात्मक वातावरण होते. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव प्रतिपिंपामागे ६५ डॉलरवर गेल्याने जगभरातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. गेल्या दोन वर्षांतील हा उच्चांकी दर आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक सुरू असून, या बैठकीत व्याजदर वाढवण्याची शक्‍यता बड्या संस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच केंद्र सरकाकडून आगामी अर्थसंकल्पात भांडवली करात वाढ केली जाण्याची शक्‍यताही व्यक्त होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये नाराजी आहे. या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. टेलिकॉम, रियल्टी, बॅंकिंग, ऊर्जा आदी क्षेत्रात विक्री दिसून आली. 

कोल इंडिया, सिप्ला, हिरोमोटो कॉर्प, टीसीएस, टाटा स्टील, आयटीसी, एलअँडटी, एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी आदी शेअर घसरणीसह बंद झाले. डॉ. रेड्डीज लॅब, अदानी पोर्ट, ओएनजीसी, लुपिन, इन्फोसिस, एसबीआय आणि मारुती सुझुकी आदी शेअर तेजीसह बंद झाले. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजारातून १८५ कोटींची गुंतवणूक काढून घेतली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र खरेदीचा होरा कायम ठेवला असून, सोमवारी त्यांनी १०८ कोटींची खरेदी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com