नेतृत्वनिवडीचे ‘इन्फोसिस’समोर आव्हान

नेतृत्वनिवडीचे ‘इन्फोसिस’समोर आव्हान

विशाल सिक्कांच्या राजीनाम्यानंतर संचालक मंडळातील धुसफुशीने परिस्थिती गंभीर 
मुंबई - मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर ‘इन्फोसिस’ कंपनीसमोर नेतृत्वनिवडीचा प्रश्‍न आहे. कंपनीच्या संचालक मंडळात परस्परांविषयी धुमसत असलेल्या अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तातडीने शोधणे हे आव्हानात्मक असल्याचे कंपनीतील सूत्रांचे म्हणणे आहे. 

कंपनीने २०१४ मध्ये सीईओ शोधण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न केला होता. कंपनीच्या संस्थापकांबाहेरील पहिली व्यक्ती म्हणून विशाल सिक्का ‘सॅप’ या जगप्रसिद्ध कंपनीतून इन्फोसिसमध्ये दाखल झाले होते. कंपनीचा घसरणारा व्यवसाय सावरण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. 

‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने कंपनीतील तीन विश्वासू व्यक्तींशी चर्चा केली. या तिन्ही व्यक्तींना संस्थेमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींची जवळून माहिती आहे. या व्यक्तींच्या माहितीनुसार, सध्याचे संस्थेतील आव्हान हे २०१४ पेक्षा जास्त गंभीर आहे. ‘संस्थेबाहेरील व्यक्ती घेणे ही २०१४ मधील अतिशय अवघड गोष्ट होती. आज त्याहून गंभीर परिस्थिती आहे, कारण संचालक मंडळामध्ये वाद सुरू आहेत. या वेळी बाहेरून कोणी व्यक्ती ‘सीईओ’ म्हणून येईल, अशी शक्‍यता खूप कमी वाटते,’ असे या सूत्रांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले. 

२०१४ पेक्षा संस्थेची एकूण परिस्थिती आज चांगली आहे. सिक्का यांनी आउटसोर्सिंगवर अवलंबून असलेल्या ‘इन्फोसिस’ला क्‍लाउड, ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत पुढे नेले आहे. सिक्कांनी कंपनी सोडेपर्यंत इन्फोसिसचा शेअर २२ टक्‍क्‍यांनी वधारला आहे. मात्र, १५० अब्ज डॉलर्सच्या कंपनीसमोर आज ब्रेक्‍झिट, युरोपियन मार्केट, अमेरिकेतील अस्थितरता अशी नवी आव्हानेही आहेत.

कंपनीने ‘सीईओ’ पदासाठी प्रभारी ‘सीईओ’ प्रवीण राव, मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) रंगनाथ डी मविनकेरे, उपमुख्य कार्यगत अधिकारी (डीसीसीओ) रवी कुमार एस आणि बॅंकिंग, वित्त आणि विमा सेवा विभागाचे प्रमुख मोहित जोशी यांची नावे विचारात घेतली आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com