आयुर्विमा - गुंतवणूक नव्हे, संरक्षण कवच!

दिलीप बार्शीकर
सोमवार, 22 जानेवारी 2018

मानवी जीवनातील एक निश्‍चित गोष्ट म्हणजे मृत्यू. पण या निश्‍चित गोष्टीची काळवेळ मात्र अनिश्‍चित असते. अशा प्रसंगी कुटुंबावर ओढविणाऱ्या आर्थिक संकटावर आयुर्विम्याद्वारे मात करता येऊ शकते.

मानवी जीवनातील एक निश्‍चित गोष्ट म्हणजे मृत्यू. पण या निश्‍चित गोष्टीची काळवेळ मात्र अनिश्‍चित असते. अशा प्रसंगी कुटुंबावर ओढविणाऱ्या आर्थिक संकटावर आयुर्विम्याद्वारे मात करता येऊ शकते.

विमा हा मूलतः नुकसानभरपाईसाठीचा करार असतो. एखाद्या आकस्मिक दुर्घटनेमुळे जे आर्थिक नुकसान होते, त्याची भरपाई (अर्थात विमा रकमेच्या मर्यादेत) देण्याची ग्वाही या कराराद्वारे दिली जाते. विमाधारक व्यक्तीचे निधन झाल्यास निर्माण होणारी आर्थिक पोकळी त्याच्या वारसाला विमा रक्कम देऊन अंशतः भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच आयुर्विमा हे विमाधारकाच्या आर्थिक मूल्याला संरक्षण देणारे कवच आहे आणि हेच मूलभूत सूत्र लक्षात घेऊन आयुर्विमा पॉलिसी घेताना प्रत्येकाने पुरेसे विमा संरक्षण मिळविणे आवश्‍यक आहे. बरेच जण त्याकडे गुंतवणूक म्हणून पाहतात; पण प्रत्यक्षात ते संरक्षण कवच आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तसेच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यांत केवळ करबचतीसाठी काही जण पॉलिसीची पुरेशी माहिती न घेता विमा खरेदी करताना दिसतात. पण करबचतीचा लाभ मिळणे, हा मूळ हेतू न राहता, दुय्यम हेतू असला पाहिजे.

एंडॉमेंट प्रकारातील आयुर्विम्यात मुदतपूर्तीच्या वेळी विमा रक्कम (बोनससह) मिळण्याची तरतूद असली तरी त्याचा हप्ता खूपच जास्त (४० ते ५० पट अधिक) असतो. अशा योजनेत मिळणारा परतावासुद्धा अगदीच कमी (४ ते ५ टक्के किंवा त्याहून कमी) असतो. चलनवाढीचा विचार केला तर हा परतावा ‘निगेटिव्ह’च असतो. त्यामुळे आयुर्विमा घेताना सर्वप्रथम ‘टर्म इन्शुरन्स’ खाली कमी हप्त्यात भक्कम विमा संरक्षण मिळविणे आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध राहणारी अतिरिक्त रक्कम अधिक परतावा देऊ शकणाऱ्या योजनांमध्ये (उदा. म्युच्युअल फंड, शेअर) सक्षम व तज्ज्ञ सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार गुंतविणे अधिक सुज्ञपणाचे ठरेल. लक्षात ठेवा, आयुर्विम्याला पर्याय नाही, पण ती संरक्षण प्रदान करणारी योजना आहे, गुंतवणुकीचा पर्याय नव्हे.

आयुर्विम्याचा हप्ता हा प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी नुसार कर सवलतीस पात्र असतो आणि कलम १० (१० डी) नुसार मिळणारी विमा रक्कम करमुक्त असते. पण केवळ प्राप्तिकरात सवलत मिळविण्यासाठी घाईघाईने, विचार न करता कोणत्याही योजनेखाली आयुर्विमा घेणे टाळले पाहिजे.

चहाच्या किमतीत ५० लाखांचा आयुर्विमा!
वार्षिक पाच लाख रुपये उत्पन्न मिळविणारी एखादी व्यक्ती जेव्हा ‘माझ्याकडे तब्बल दोन लाखांची विमा पॉलिसी आहे,’ असे छाती फुगवून सांगते, तेव्हा खरे तर आपल्याला हे आर्थिक संरक्षण पुरेसे आहे का, याचा त्याने विचारच केलेला नसतो. सर्वसाधारणपणे प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान दहापट रकमेचा आयुर्विमा घेणे आवश्‍यक आहे. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या विम्यासाठी प्रचंड मोठा हप्ता (प्रीमियम) भरावा लागेल, तो कसा परवडणार? यासाठीच तर ‘टर्म इन्शुरन्स’ ही अत्यंत योग्य योजना आहे, ज्याचा हप्ता अत्यंत कमी आणि म्हणूनच सहज परवडणारा असतो. हा हप्ता विमेदाराचे वय, आरोग्य, सवयी, विमा कंपन्यांचे दर यानुसार बदलत असतो. तरीही स्थूलमानाने असे म्हणता येईल, की दर दिवशी रु. १० ते १५ (म्हणजे एका चहाची किंमत) इतक्‍या अल्प हप्त्यात ५० लाख विमा रकमेचा ‘टर्म इन्शुरन्स’ मिळू शकतो. या योजनेत फक्त विमा संरक्षण मिळते, मुदतपूर्तीनंतरचा लाभ मिळत नाही. त्यामुळेच तर हप्ता अत्यंत कमी असतो. 
(लेखक निवृत्त विमा अधिकारी असून, प्रशिक्षण सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.)

Web Title: arthavishwa news life insurance no investment security armor