म्युच्युअल फंड नव्या गुंतवणूकदारांनी काय करावे?

Mutual-Fund
Mutual-Fund

दु:खेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह: । वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते।।
अर्थ - सुख आणि दु:ख ज्याच्यासाठी समान आहेत, ज्याच्या मनामधील मोह, भय हे नाहीसे झालेले आहे, असा माणूस स्थिर बुद्धी असलेला मुनी म्हणून ओळखला जातो.

जानेवारी २०१८ पासून भारतीय शेअर बाजार ७ टक्के वाढला आणि केंद्रीय अर्थसंकल्पानंतर तो तितक्‍याच वेगात ८ टक्‍क्‍यांनी खालीदेखील आला. गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंड आणि थेट शेअर बाजारामधील छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली. बॅंक ठेवींवरील (एफडी) कमी झालेल्या व्याजदरांमुळे छोटे गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे किंवा म्युच्युअल फंडांकडे आकर्षित झाले आहेत. दरमहा लाभांश देणाऱ्या बॅलन्स्ड फंडात अशा गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आणि सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅनचा (एसडब्ल्युपी) मार्ग स्वीकारला. पण एक फेब्रुवारी २०१८ पासून शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे या क्षेत्रात नव्याने आलेल्या गुंतवणूकदाराच्या मनात आता थोडी भीती निर्माण झालेली आहे. अशा नव्या गुंतवणूकदारांनी येथून पुढे काय करावे, याबाबत चर्चा करण्यासाठी हा लेखप्रपंच.

पुरेसा वेळ दिला पाहिजे!
शेअर बाजाराशी जोडलेल्या गुंतवणूक प्रकारात पैसे गुंतविताना एक गोष्ट बरेच जण विसरतात आणि ती म्हणजे ‘कोणतीही गुंतवणूक यशस्वी होण्यासाठी तिला आवश्‍यक तो पुरेसा वेळ दिला गेलाच पाहिजे.’ यापूर्वी अनेकांनी सोने, रिअल इस्टेट, बॅंक किंवा पोस्टात पैसे गुंतविले असतील. यापैकी कोणत्याही गुंतवणुकीचा बाजारभाव किंवा परतावा किती आहे, हे आपण सारखे-सारखे (साधारणपणे तीन ते दहा वर्षे) बघत नाही. कारण यापैकी कोणत्याच पर्यायात दररोज भाव किंवा परतावा पाहण्याची गरज वाटत नाही किंवा त्यापैकी काहींमध्ये तशी स्पष्ट आणि पारदर्शकपणे बघण्याची सोय नाही. बॅंकेतील ठेव मुदतीपूर्वी मोडण्याची सोय असली तरी आणीबाणीशिवाय आपण ती कधीच मोडत नाही. अशा गुंतवणुकीची मुदत पूर्ण होईपर्यंत आपल्याला निश्‍चिंत झोप लागते. परंतु, हेच पैसे जर शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडांसारख्या दररोज पारदर्शकपणे बाजारभाव दाखविणाऱ्या गुंतवणूक साधनांमधे गुंतविले असतील, तर मात्र बाजाराच्या चढ-उतारांमुळे आपले नुकसान झाले की काय, अशी आपल्याला भीती वाटू लागते. वास्तविक जोवर आपण आपली गुंतवणूक मोडत नाही, तोवर बाजारभाव कितीही खाली आला तरी आपले नुकसान प्रत्यक्षात झालेले नसते. 

आता बॅलन्स्ड फंडांबद्दल बोलूया. गेल्या दोन वर्षांत हे फंड थोडेसे चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले. त्यामुळे नव्या गुंतवणूकदारांचा असा समज झाला, की असे फंड हे हमखास उत्पन्नाचे पर्याय असावेत. परंतु, प्रत्यक्षात ते तसे नसते. इक्विटी ओरिएंटेड बॅलन्स्ड फंडांत ६५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रक्कम शेअरमधे गुंतविली जाते. २०१४ पासून शेअर बाजाराने सतत वरची दिशा पकडल्यामुळे नियमित लाभांश देणे या फंडांना शक्‍य होत होते. परंतु, बाजार घसरला की हे नियमित उत्पन्न काही काळासाठी कमी किंवा बंद होऊ शकते.

बाजार कायम खाली राहत नाही, तो पुन्हा उसळी घेत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. परंतु हे चढ-उतार सहन करू न शकणाऱ्या गुंतवणूकदारांनी मात्र अशा फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी पुरेशी माहिती करून घेणे आवश्‍यक ठरते. संयमाची कसोटी पाहणाऱ्या बाजारातील घसरणीमुळे एखाद्या वर्षभरात लाभांश नाही मिळाला तरी चालणार असल्यास आणि किमान पाच वर्षे आपली गुंतवणूक तशीच ठेवण्याची तयारी असल्यास बॅलन्स्ड फंडांत जरूर पैसे ठेवावेत; किंबहुना त्यामधील गुंतवणूक वेळोवेळी वाढविणेसुद्धा श्रेयस्कर ठरू शकते. लाभांशाव्यतिरिक्त काही जणांनी ‘एसडब्ल्यूपी’चा पर्याय निवडला असेल तर त्यांच्याही पोर्टफोलियोचे ‘व्हॅल्युएशन’ गेल्या महिन्यात खाली आलेले असेल. ‘एसडब्ल्यूपी’ म्हणजे आपलेच पैसे आपण दरमहा काढून घेतो आणि म्युच्युअल फंडांमध्ये होणारी वाढ ते पैसे पुनर्स्थित करण्याची शक्‍यता असते. एखाद्या महिन्यात आपल्याला ‘एसडब्ल्यूपी’तून रक्कम आल्यानंतर आपल्या पोर्टफोलियोचे ‘व्हॅल्युएशन’ कमी झालेले दिसले तर ‘एसडब्ल्यूपी’ची रक्कम (शक्‍य असल्यास पदरची अधिक भर घालून) पुन्हा त्या फंडात गुंतविली पाहिजे. बाजारातील कितीही चांगल्या किंवा वाईट प्रसंगामध्ये विचलित न होता आपल्या सुनिश्‍चित उद्दिष्टाकडे नजर ठेवून वाटचाल करणारे गुंतवणूकदारच शेवटी यशस्वी होत असतात, हे लक्षात ठेवावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com