निफ्टी ऐतिहासिक उच्चांकावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

चलन बाजारात रुपयाची दमदार कामगिरी, जागतिक बाजारातील तेजी आणि परदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी वाढवल्याने निर्देशांकांनी नवी उंची गाठली आहे. आता फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. 
- विनोद नायर, मुख्य विश्‍लेषक, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिस

मुंबई - स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा खरेदीचा ओघ आणि जागतिक पोषक वातावरणाने सोमवारी निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला. दिवसअखेर निफ्टी ६७.७० अंशांच्या वाढीसह १०,१५३.१० अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्‍सही १५१.१५ अंशांच्या वाढीसह ३२ हजार ४२३.७६ अंशांवर बंद झाला. सलग सातव्या सत्रात निर्देशांक वधारल्याने गुंतवणूकदारांची मालमत्ता १,३६,७६,४६५ कोटींपर्यंत वाढली आहे. 

बाजारात स्मॉल कॅप आणि मीडकॅप शेअर्सला मोठी मागणी होती. ऑटो, ऊर्जा, बॅंका, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू आदी क्षेत्रांत खरेदी दिसून आली. सणासुदीचा हंगाम नजीक असून, या काळात वाहन विक्रीत वाढ होण्याची शक्‍यता असल्याने गुंतवणूकदारांनी आघाडीच्या ऑटो शेअरची खरेदी केली. 
मुंबई शेअर बाजारात बजाज ऑटो, एचयूएल, एलअँडटी आदी शेअर्समध्ये वाढ झाली. आयटीसी, टाटा स्टील, ओएनजीसी, एसबीआय या शेअरमध्ये घ सरण झाली. शेअर बाजाराच्या माहितीनुसार शुक्रवारी स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १२५.५५ कोटींची खरेदी केली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४१८.८६ कोटींची खरेदी केली.

बॅंक निफ्टी २५ हजार पल्याड 
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर बॅंक निफ्टी निर्देशांक २५ हजार अंशांवर बंद झाला. दिवसअखेर बॅंक निफ्टीत २०२.६ अंशांची वाढ नोंदवण्यात आली आणि तो २५०४६.९ अंशांवर बंद झाला. ॲक्‍सिस बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसी बॅंक, एसबीआय, येस बॅंक, इंड्‌सइंड बॅंक आदी शेअर तेजीसह बंद झाला. 

Web Title: arthavishwa news nifty on higest