महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी पर्यायी गुंतवणूक निधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ४८ वी आर्थिक परिषद दावोस (स्वित्झर्लंड) येथे उद्यापासून (मंगळवार) होत आहे. या परिषदेच्या सहअध्यक्ष होण्याचा मान माणदेशी महिला बॅंक व फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांना मिळाला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत जागतिक स्तरावर चर्चा होणाऱ्या ठरावांसंदर्भात ‘सकाळ’साठी त्यांनी दिलेली माहिती.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ४८ वी आर्थिक परिषद दावोस (स्वित्झर्लंड) येथे उद्यापासून (मंगळवार) होत आहे. या परिषदेच्या सहअध्यक्ष होण्याचा मान माणदेशी महिला बॅंक व फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांना मिळाला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत जागतिक स्तरावर चर्चा होणाऱ्या ठरावांसंदर्भात ‘सकाळ’साठी त्यांनी दिलेली माहिती.

स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेची (डब्लूईएफ) ४८ व्या आर्थिक परिषदेत भारतामधील महिलांना उद्योगातून आर्थिक स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने पर्यायी गुंतवणूक निधीची (‘अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड’) संकल्पना मांडून भारतीय विशेषतः ग्रामीण महिलांना आर्थिक स्वयंपूर्ण करण्यासाठी शंभर कोटी रुपये निधी मिळविण्याचा संकल्प आहे.

भारतामध्ये सूक्ष्मवित्त क्षेत्र वीस अब्ज डॉलरवर पोचले आहे. आता महिलांची मोठ्या रकमांची कर्जे घेऊन ती फेडण्याची क्षमता आहे. उद्योग किंवा व्यवसाय करणाऱ्या महिला आता तीन ते चार लाख रुपयांचे कर्ज काढून ते फेडू शकतात. पण बॅंका त्यांना इतक्‍या रकमेचे विनातारण कर्ज देत नाहीत. सूक्ष्मवित्त संस्था सहसा एक लाख रुपयांपर्यंतच कर्ज देतात. तीन-चार लाख रुपयांची गरज असलेल्या महिलांनी कुठे जायचे हा प्रश्न आहे.

अशा महिला तीन- चार ठिकाणांहून कर्जे घेतात. यामुळे त्यांचा कर्जाचा खर्च वाढतो. स्वतः उद्योग नव्याने उभा करताना महागडी कर्जे मिळून उपयोग नसतो. यावर उपाय म्हणून ‘अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडा’ची संकल्पना आम्ही तयार केली. यामध्ये उद्योग सुरू करणाऱ्या महिलेला कमी व्याजदराने, सुटसुटीतरीत्या कर्जपुरवठा केला जाईल. या कर्जासाठी तारण न घेता कर्जे द्यावीत. हे कर्ज थेट कर्जेच्छु महिलेच्या हातात न देता तिने स्थापन केलेल्या उद्योगाच्या किंवा तिच्या बचतगटाच्या नावे दिले जाईल.

असा हा फंड केवळ महिला अतिलघुउद्योजकांसाठी सुरू करणार आहोत. त्याची सुरवात दावोसमध्ये होईल. महिलांच्यासाठी पर्यायी गुंतवणूक निधी तयार करण्यात यावा, त्याची नोंदणी ‘सेबी’च्या नियंत्रणाखाली असावी व भांडवल उभारणीची सुविधा बाजारात केली जावी. विशेष बाब म्हणजे या पद्धतीचा जगात अद्यापही अवलंब केला गेला नाही. हीच ‘अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड’ची संकल्पना ‘डब्लूईएफ’मधील सात महिला सदस्याच्या पॅनेलसमोर मांडण्यात येणार आहे.

या फंडाच्या मुख्य गुंतवणूकदाराबरोबरही नवी दिल्ली येथे नुकतीच बैठकही झाली आहे. मास्टरकार्डसारख्या बड्या कंपन्यांनी यामधील गुंतवणुकीत रस दाखविलेला आहे. विशेष बाब मुख्य कार्यकारी अधिकारी इसाबेला कोचर यांनाही ही योजना आवडली आहे. या परिषदेतील व्यासपीठावर इसाबेलांसमवेतच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना महासंघाचे सरचिटणीस शॅरेन बरो, आयबीएम कार्पोरेशनच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जिनी रोमेटी, नॉर्वेच्या पंतप्रधान एरना सोलबर्ग, युरोपियन ऑर्गनायझेरशन फॉर न्युक्‍लिअर रिसर्चच्या महासंचालक फॅबिओला जियानोट्टी आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तिन लॅगार्ड आदींच्या उपस्थितीत ही योजना जगभरात निश्‍चितच पोहचेल.

जागतिक पातळीवरील फोरमच्या या आर्थिक परिषदेच्या इतिहासात प्रथमच महिलांना अधिक स्थान देण्याचा निर्णय घेतला गेला व भारताच्या वतीने या परिषदेच्या सहअध्यक्षपदाची संधी मला मिळाली. 

महिलांचा विकास करताना त्यांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे व त्यांचा पूर्णत: विकास घडवून आणण्यासाठी या परिषदेत विविध चर्चासत्रे होणार आहेत. यासाठी भारतानेही एक योजना तयार केली असून ती योजना केवळ भारतातर्फे परिषदेत मांडली जाणार आहे. या परिषदेत प्रामुख्याने महिलांचे प्रश्न हाताळले जाणार आहेत. महिलांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा, नोकरी व कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, मालमत्तेत अधिकार व माणदेशी फाउंडेशनमार्फत ग्रामीण महिलांना शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मालकी हक्कासाठी नाव नोंद करण्यास आमचा असलेला पाठपुरावा आदी विषय चर्चिले जाणार आहेत.

Web Title: arthavishwa news Optional investment fund for womens self sufficiency