‘पीएसीएल’ गुंतवणूकदारांना अडीच हजार मिळणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

मुंबई - पीएसीएल (पर्ल अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमीटेड) कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना पहिल्या टप्प्यात अडीच हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे. भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने परतावा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पीएसीएल कंपन्यांमध्ये अडीच हजारांची मुद्दल गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना २८ फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकसंबंधीची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबई - पीएसीएल (पर्ल अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमीटेड) कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना पहिल्या टप्प्यात अडीच हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे. भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने परतावा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पीएसीएल कंपन्यांमध्ये अडीच हजारांची मुद्दल गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना २८ फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकसंबंधीची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. 

पीएसीएल कंपन्यांची आणि प्रवर्तकांची मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करण्यासाठी ‘सेबी’ने माजी न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी २०१६ मध्ये समिती स्थापन केली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरात ‘सेबी’ने पीएसीएल कंपन्यांची भारतातील; तसेच परेशातील १ लाख ८५ हजार कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली. नुकत्याच झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदारांना २५००चा  परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘सेबी’ने परताव्यासंबधी मंगळवारी (ता.२) अध्यादेश काढला असून, २८ फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकसंबंधीची कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अडीच हजार रुपये किंवा समितीकडे उपलब्ध असलेल्या निधीनुसार गुंतवणूकदारांना परतावा दिला जाईल, असे ‘सेबी’ने स्पष्ट केले.  

क्षुल्लक परतावा 
दोन वर्षांपासून पीएसीएल गुंतवणूकदार भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. घोटाळ्याची व्याप्ती पाहता केवळ अडीच हजार रुपयांचा परतावा क्षुल्लक असल्याची टीका ऑल इंडिया पीएसीएल गुंतवणूकदार संघटनेचे अध्यक्ष विश्‍वास उटगी यांनी केली. ते म्हणाले की, पीएसीएल कंपन्यांनी सहा कोटी गुंतवणूकदारांचे तब्बल ६० हजार कोटी हडप केले आहेत. आजच्या घडीला पीएसीएल कंपन्यांचे बाजारमूल्य दीड लाख कोटींहून अधिक आहे. गुंतवणूकदारांना तात्काळ परतावा देण्यासाठी सेबीने कठोर आणि निर्णायक भूमिका घेणे आवश्‍यक असल्याचे मत उटगी यांनी व्यक्त केले.

परतावा मिळण्याची प्रक्रिया 
 ‘सेबी’ला ५६२६३२ या क्रमांकावर एसएमएस करून गुंतवणूकदार वैयक्‍तिक आणि गुंतवणुकीसंबधीची माहिती देऊ शकतात. 
 सेबीच्या http://sebicommitteepaclrefund.com/ या वेबसाइटवर गुंतवणूकदारांना कागदपत्रे अपलोड करता येतील. 
 परतावा प्रक्रियेची ताजी स्थिती जाणून घेण्यासाठी गुंतवणूकदारांना ०४४-३९५-७१९८५ या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. 

आवश्‍यक माहिती आणि कागदपत्रे 
 पीएसीएल सर्टिफिकेटनुसार गुंतवणूकदाराचे नाव 
 परताव्याची रक्कम 
 मोबाईल क्रमांक 
 पीएसीएल योजनेचा नोंदणी क्रमांक 
 पीएसीएल सर्टिफिकेट, आधार कार्ड 
 पॅन कार्ड, बॅंक खाते क्रमांक (आयएफएससी कोडसह) 
 बॅंकेचे पासबुक (अद्ययावत व्यवहारांसह) 

Web Title: arthavishwa news pacl Investors will get two and a half thousand