बचतीकडून जाऊया गुंतवणुकीकडे...

मुकुंद लेले
सोमवार, 22 जानेवारी 2018

आर्थिक नियोजनातील पहिली महत्त्वाची बाब म्हणजे बचत आणि अर्थातच त्याची पुढची पायरी म्हणजे योग्य ठिकाणी गुंतवणूक. आपली आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी कमवायला सुरू केल्यापासून म्हणजे तरुणपणापासूनच बचतीकडे लक्ष द्यायला हवे. यासाठी आधी मासिक अर्थसंकल्प मांडणे आवश्‍यक असते. मासिक उत्पन्न वजा मासिक खर्च बरोबर बचत हे सूत्र न ठेवता, मासिक उत्पन्न वजा बचत बरोबर मासिक खर्च असे सूत्र मनाशी निश्‍चित केले, की हमखास बचत होऊ शकते. यामुळे आपोआपच निरर्थक खर्च वाचून त्याचा वापर आपली गंगाजळी वाढविण्यासाठी होऊ शकतो.

आर्थिक नियोजनातील पहिली महत्त्वाची बाब म्हणजे बचत आणि अर्थातच त्याची पुढची पायरी म्हणजे योग्य ठिकाणी गुंतवणूक. आपली आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी कमवायला सुरू केल्यापासून म्हणजे तरुणपणापासूनच बचतीकडे लक्ष द्यायला हवे. यासाठी आधी मासिक अर्थसंकल्प मांडणे आवश्‍यक असते. मासिक उत्पन्न वजा मासिक खर्च बरोबर बचत हे सूत्र न ठेवता, मासिक उत्पन्न वजा बचत बरोबर मासिक खर्च असे सूत्र मनाशी निश्‍चित केले, की हमखास बचत होऊ शकते. यामुळे आपोआपच निरर्थक खर्च वाचून त्याचा वापर आपली गंगाजळी वाढविण्यासाठी होऊ शकतो. एकदा का बचत व्यवस्थित होत गेली, की त्याला योग्य प्रकारच्या गुंतवणुकीत रूपांतर करणे हे गरजेचे ठरते. 

वैद्यकीय आपत्ती अथवा अन्य आणीबाणीच्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी तुमच्या बॅंक खात्यात पुरेशी रक्कम असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ही रक्कम तुमच्या मासिक खर्चाच्या अंदाजे चार ते सहापट असायला हवी. संरक्षण कवच म्हणून पुरेसा आयुर्विमा घेतल्यानंतर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), म्युच्युअल फंड, शेअर, सोने-चांदी, रिअल इस्टेट अशा अनेक गुंतवणूक साधनांत तुम्ही गुंतवणूक करू शकता.

गुंतवणुकीत सुरक्षिततेला प्राधान्य देत असताना, जोखीम घेण्याच्या आपल्या क्षमतेचाही विचार केला पाहिजे. निवृत्तीनंतरच्या गरजांसाठीची तरतूद उमेदीच्या वयापासूनच केली पाहिजे. त्यासाठी एनपीएस, पेन्शन प्लॅन अशा योजनांचा विचार करून त्यात नियमितपणे दीर्घकाळ गुंतवणूक करायला हवी; जेणेकरून निवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य टिकून राहू शकते.

शेवटची, पण महत्त्वाची पायरी म्हणजे आर्थिक उद्दिष्टे निश्‍चित करून गुंतवणुकीस सुरवात केल्यानंतर त्यांचा किमान तीन वर्षांतून एकदा तरी आढावा घ्यायला हवा. बदलत्या गरजांच्या पूर्ततेसाठी आणि अधिक उत्तम गुंतवणुकीच्या संधी साधण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. आपले व्यापक आर्थिक नियोजन आणि पोर्टफोलियोच्या ‘रिबॅलन्सिंग’साठी या क्षेत्रातील जाणकारांची मदत निश्‍चितच घ्यायला हवी.

Web Title: arthavishwa news saving to investment