सेन्सेक्‍स, निफ्टी तेजीच्या वाटेवर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जानेवारी 2018

सोन्याचा ‘भाव’ खाली  
गेल्या आठवडाभरातील सराफाची तेजी सोमवारी ओसरली. मुंबई सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला २१० रुपयांनी घसरला व ३० हजार २३५ रुपयांवर बंद झाला. औद्योगिक क्षेत्र, नाणी उत्पादकांकडून मागणी रोडावल्याने त्याचे पडसाद चांदीवर दिसले. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे ३८० रुपयांनी स्वस्त झाला. चांदीचे दर दिवसअखेर ३९ हजार ३८५ रुपयांपर्यंत खाली आले.

मुंबई - आर्थिक पाहणी अहवालात विकासदराबाबत आश्‍वासक अंदाज व्यक्त केल्याने गुंतवणूकदारांनी सोमवारी जोरदार खरेदी केली. यामुळे सेन्सेक्‍स आणि निफ्टीने पुन्हा एकदा तेजीची वाट धरली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स २३२.८१ अंशांच्या वाढीसह ३६ हजार २८३ अंशांच्या नव्या उच्चांकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी ६०.७५ अंशांच्या वाढीसह ११ हजार १३० अंशांवर बंद झाला. गुरुवारी (ता. २५) सेन्सेक्‍समध्ये १११ अंशांची घसरण झाली होती.

वाहन उत्पादक कंपन्यांचे शेअर्स, आयटी, वित्त सेवा पुरवठादार आदी शेअर्समध्ये खरेदी दिसली. फेब्रुवारीचे नवे वायदे आणि परकी गुंतवणुकीचा ओघ बाजारातील तेजी वृद्धिंगत करण्यास फायदेशीर ठरल्याचे शेअर दलालांनी सांगितले. बाजारात सकाळापासून खरेदी सुरू होती; मात्र काही शेअर्समध्ये नफावसुली झाल्याने सेन्सेक्‍सच्या घोडदौडीला लगाम बसला. सेन्सेक्‍स मंचावर टीसीएस, कोटक महिंद्रा बॅंक, एचयूएल, टाटा स्टील, बजाज ऑटो, एचडीएफसी बॅंक, सन फार्मा आदी शेअर्स वधारले. निफ्टी मंचावर मारुती, आयशर मोटर्स, एचडीएफसी, भारती इन्फ्रा, यूपीएल, हिरोमोटो कॉर्प, इंडियन ऑइल आदी शेअर वधारले. डॉ. रेड्डीज लॅब, लुपिन, गेल, भारती एअरटेल, एचपीसीएल, बीपीसीएल, ॲक्‍सिस बॅंक, ओएनजसी आदी शेअर्समध्ये घसरण झाली. 

निफ्टीवर स्मॉलकॅप व मिडकॅपमध्ये विक्री दिसली. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात तीन पैशांचे अवमूल्यन झाले. बॅंका व आयातदारांकडून डॉलरसाठी मोठी मागणी होती. परिणामी स्थानिक चलनाला झळ बसली. दिवसअखेर रुपया डॉलरच्या तुलनेत तीन पैशांच्या घसरणीसह ६३.५८ वर बंद झाला.

Web Title: arthavishwa news sensex nifty fast increase