शेअर बाजार गडगडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

नवी दिल्ली - जागतिक पटलावर पुन्हा व्यापार युद्धाचे ढग दाटल्याने शेअर बाजाराची बुधवारी गाळण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३५१ अंशांनी गडगडून ३३ हजार १९ अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ११६ अंशांच्या घसरणीसह १० हजार १२८ अंशांवर बंद झाला. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधील उत्पादनांच्या आयातीवर जादा कर लागू केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा कर लागू केला आहे. यामुळे जागतिक पातळीवर व्यापार युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली. याचा फटका शेअर बाजाराला बसला. यातच रिझर्व्ह बॅंकेची पतधोरण आढावा बैठक आज सुरू झाल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. 

आज सकाळी सेन्सेक्‍समध्ये वाढ झाली. तो ३३ हजार ५०५ अंश या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोचला. मात्र, दुपारनंतर निर्देशांकात घसरण सुरू झाली. 

अखेर कालच्या तुलनेत तो ३५१ अंश म्हणजेच १.०५ टक्के घसरण होऊन ३३ हजार १९ अंशांवर बंद झाला. निर्देशांकात २३ मार्चनंतर झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे. त्या वेळी निर्देशांक ४०९ अंशांनी गडगडला होता. 

33,019 (सेन्सेक्‍स -३५१)
10,128 (निफ्टी -११६ )

Web Title: arthavishwa news share market colapse