एसआयपी: मूर्ती लहान, कीर्ती महान!

SIP
SIP

आतापर्यंत आपल्यापैकी बरेच जण अनेकविध कारणांमुळे इक्विटी किंवा शेअर बाजारापासून दूर राहिले असतील; पण हा लेख वाचल्यावर आपण एक असा तुलनात्मक आढावाही घेऊ शकता, की अ) नोकरी किंवा व्यवसायाच्या सुरवातीपासून किती बचत आपण रिकरिंग डिपॉझिटमध्ये (आरडी) केली अथवा किती रक्कम पारंपरिक आयुर्विम्याच्या हप्त्यांसाठी दिली, ब) जर हीच रक्कम आपण म्युच्युअल फंडामध्ये ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’द्वारे (एसआयपी) गुंतविली असती आणि त्या बरोबरीने शुद्ध विमा (टर्म इन्शुरन्स) घेतला असता, तर गुंतवणुकीवर किती परतावा मिळाला असता; तसेच असे केल्याने खूप जास्त रकमेचे आयुर्विमा कवच कमी वयात आणि कमी खर्चात मिळाले असते, ते वेगळेच.  

म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ला आपण आधुनिक युगातील ‘रिकरिंग डिपॉझिट’ असे संबोधू शकतो. याद्वारे आपल्याला स्वतःच्या अल्प, मध्यम व दीर्घकालीन उद्दिष्टांची पूर्तता करता येऊ शकते. काही दीर्घकालीन उद्दिष्टे (ज्यांना अजूनही ८-१० वर्षांपेक्षा अधिक अवधी आहे) उदा. निवृत्तीनंतरच्या उदरनिर्वाहाची सोय, मुलांचे/मुलींचे उच्चशिक्षण व लग्न यासाठीची तजवीज, मोटारखरेदी, परदेश भ्रमंती आदींसाठी इक्विटी फंडातील ‘एसआयपी’ उपयोगी ठरू शकते. यापेक्षा अधिक लाभदायी व परताव्यावर सर्वांत कमी करदायित्व असणारा पर्याय सध्यातरी बाजारात दिसत नाही.

‘एसआयपी’चे महत्त्व अधिक खोलात जाऊन अधोरेखित करणारे काही मुद्दे खालीलप्रमाणे
१) लवकर सुरवात करा - ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’, या वचनानुसार गुंतवणूक चालू करण्यास ‘आता’पेक्षा चांगला मुहूर्त नाही. जितक्‍या लवकर ‘एसआयपी’ चालू कराल, तितका फायदा जास्त होईल; शिवाय कमी वयात गुंतवणूक करायला लागणारी रक्कमही कमी असेल. उदा. जर एखाद्याचे निवृत्तीपर्यंत रु. पाच कोटी जमा करण्याचे उद्दिष्ट असेल आणि निवृत्तीला अजून ३० वर्षे कालावधी बाकी असेल, तर साधारणपणे १२ टक्के द. सा. द. शे. परतावा मानल्यास दरमहा फक्त ५७२२ गुंतविल्यास हे उद्दिष्ट गाठणे शक्‍य होईल. 

२) महागाई दरापेक्षा अधिक परतावा - गेली दहा वर्षे एखाद्याने इक्विटी फंडामधील ‘एसआयपी’ केली असेल, तर मिळालेला परतावा हा महागाई दरापेक्षा (चलनवाढ) अधिक तर आहेच; शिवाय ३१ जानेवारी २०१८ पर्यंत झालेल्या फायद्यावर काहीही कर देय होत नाही. म्हणजेच तो करमुक्त आहे. हा एकमेव जंगम गुंतवणूक प्रकार असा आहे की, ज्यामध्ये महागाई दरापेक्षा अधिक परतावा देण्याची क्षमता आहे.

३) चक्रवाढीचा करिष्मा - आपण आपल्या गुंतवणुकीला वाढण्यासाठी पुरेसा वेळ दिला, तर हीच गुंतवणूक तुम्हाला कैकपटीने परतावा देऊ शकते. चक्रवाढीचा करिष्मा येथे अनुभवता येऊ शकतो.

४) करपश्‍चात परतावा - इक्विटी फंडातील गुंतवणुकीवर झालेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील करदायित्व जास्तीत जास्त (१० टक्के + अधिभार + उपकर) इतके कमी आहे; परंतु, आज व्याजाच्या उत्पन्नावरील सर्वोच्च करदर (३० टक्के + अधिभार + उपकर) इतका जास्त आहे. त्यामुळे जाणकार आणि समंजस गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून अजूनही मुदत ठेवींपेक्षा (एफडी) कितीतरी जास्त परतावा देण्याची क्षमता असलेल्या ‘इक्विटी फंड’ या मालमत्ता प्रकारचा आकर्षकपणा कायम आहे.

५) करबचत योजनेतील (ईएलएसएस) ‘एसआयपी’ म्हणजे दुग्धशर्करा योगच - दरमहा १२,५०० रुपयांची ‘एसआयपी’ म्युच्युअल फंडाच्या करबचत योजनेत केल्यास वार्षिक दीड लाख रुपयांची गुंतवणूक कलम ८० सी अन्वये प्राप्तिकर निश्‍चितपणे वाचवू शकते; शिवाय बॅंक एफडीपेक्षा जास्त परतावाही मिळण्याची शक्‍यता असते. म्हणजे एखादी व्यक्ती जर ३० टक्के दराने प्राप्तिकर भरत असेल, तर ४५ हजार रुपयांचा कर आणि त्यावरील अधिभार व उपकर इतकी मोठी बचत होऊ शकते.

६) ‘एसआयपी’ म्हणजे जणू काही अपत्यच - आतापासून या नव्या अपत्याचा सांभाळ आपण लक्षपूर्वक आणि बिनचूक केल्यास हे अपत्य आपल्या निवृत्तीनंतरच्या काळात आर्थिक आधाराची काठी बनून आपल्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहण्यास नक्की मदत करेल. 

७) आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग - आजही आपल्याला अनेक जण असे दिसतात, की ज्यांना भांडवलाच्या कमतरतेमुळे किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मनाजोगते उपजीविकेचे साधन निवडता आलेले नाही. एखाद्याने जर का ठामपणे ठरविले आणि ‘मार्केट टायमिंग’च्या विचारात न अडकता जास्तीत जास्त गुंतवणूक ‘एसआयपी’च्या मार्गाने १०, १५ किंवा २० वर्षे केली तर शक्‍य तितक्‍या लवकर त्याला स्वतःला आवडेल ते नवे करिअर, उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचा विचार नक्की करता येऊ शकतो. हा मार्ग उपलब्ध करून देण्याचे सामर्थ्य ‘एसआयपी’मध्ये आहे.

८) बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको - अल्पकालीन फायदा कमाविण्याच्या उद्देशाने बाजाराच्या दिशेचा (चूक-बरोबर) अंदाज घेत, चाचपडत व जमेल तशी अंदाजे गुंतवणूक करण्यापेक्षा दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयुक्त, नियोजनपूर्वक व सातत्यपूर्ण गुंतवणूक करायला हवी, की जी तुमची उद्दिष्टपूर्ती करू शकेल. त्यासाठी ‘एसआयपी’चा मार्ग चांगला असून, तो अवलंबावा. कारण ‘एसआयपी’च्या मार्गाने चांगला परतावा दिला आहे, हे इतिहासात सिद्ध झालेले आहे.

ज्याप्रमाणे इमारत बांधताना प्रत्येक वीट महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहिल्यास असे लक्षात येईल की, आपली आर्थिक आघाडी अधिक भक्कम बनविण्यात ‘एसआयपी’तील प्रत्येक रुपयाचा वाटा किती मोठा होता ते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, की ‘एसआयपी’ म्हणजे मूर्ती लहान, पण कीर्ती महान!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com