SUNDAY स्पेशल : जगात टॉप १० मध्ये येणार एलआयसी?

अतुल सुळे, निवृत्त बँक अधिकारी
Sunday, 9 February 2020

‘एलआयसी’कडे असलेले प्रचंड भांडवल पाहता जगातील टॉप टेन कंपन्यांत तिची गणना होऊ शकते. तथापि, या यादीत असलेल्या अन्य कंपन्यांवर नजर टाकली तरी इतरांच्या तुलनेत ती कुठे राहील, हे पाहणे रंजक ठरेल.

‘एलआयसी’कडे असलेले प्रचंड भांडवल पाहता जगातील टॉप टेन कंपन्यांत तिची गणना होऊ शकते. तथापि, या यादीत असलेल्या अन्य कंपन्यांवर नजर टाकली तरी इतरांच्या तुलनेत ती कुठे राहील, हे पाहणे रंजक ठरेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एक सप्टेंबर १९५६ पासून अस्तित्वात असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) गेल्या ६-७ दशकांत भारतात चांगलाच जम बसविला आहे. दोन हजारांपेक्षा अधिक शाखा, एक लाखापेक्षा अधिक कर्मचारी आणि २९ कोटींपेक्षा जास्त पॉलिसीधारक असलेल्या ‘एलआयसी’चा बाजारहिस्सा ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. सध्या तरी तिची १०० टक्के मालकी केंद्र सरकारकडे असली तरी, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये त्यातील थोडासा हिस्सा विकण्याचा इरादा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नव्या अर्थसंकल्पात जाहीर केला आहे.  ‘एलआयसी’ची २०१९ मधील एकूण मालमत्ता रु. ३१ लाख कोटी (४४० अब्ज अमेरिकी डॉलर) एवढी प्रचंड आहे. याच्या २५ टक्के एवढे जरी ‘व्हॅल्युएशन’ गृहित धरल्यास ते रु. ८ लाख कोटी (सुमारे ११० अब्ज अमेरिकी डॉलर) एवढे निघते. 

या पार्श्‍वभूमीवर ‘एलआयसी’ ही जगातील ‘टॉप टेन’ कंपन्यांच्या (मार्केट कॅपिटलायझेशननुसार) यादीत प्रवेश करू शकेल का आणि या यादीतील ‘एलआयसी’चे प्रतिस्पर्धी कोण असतील, हे बघणे रोचक ठरेल. यानिमित्ताने ‘एलआयसी’च्या जागतिक प्रतिस्पर्ध्यांचा थोडक्‍यात परिचय पुढीलप्रमाणे - 
1) बर्कशायर हॅथवे - १८८९ मध्ये स्थापन झालेल्या कंपनीत प्रसिद्ध गुंतवणूक गुरू वॉरन बफे यांनी १९६० पासून गुंतवणूक केलेली आहे. सध्या या कंपनीच्या एका शेअरचा भाव ३,३७,४२१ डॉलर एवढा आहे! 

2) पिंग ॲन ऑफ चायना - ही कंपनी १९८८ पासून अस्तित्वात आहे. तिचे मुख्यालय शेन्झेनमध्ये आहे. ही कंपनी शांघाय स्टॉक एक्‍स्चेंजच्या टॉप ५० कंपन्यांपैकी एक आहे.

3) युनायटेड हेल्थ ग्रुप - ही अमेरिकी कंपनी १२५ देशांत कार्यरत आहे.

4) एआयए ग्रुप - १९१९ मध्ये सिंगापूरमध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे मुख्यालय हाँगकाँगमध्ये असून, ही कंपनी १८ देशांत कार्यरत आहे.

5) चायना लाइफ इन्शुरन्स ग्रुप - या यादीतील ही एकमेव सरकारी मालकीची कंपनी असून, तिची स्थापना १९४९ मध्ये झाली. सध्या ही कंपनी न्यूयॉर्क, हाँगकाँग आणि शांघाय स्टॉक एक्‍स्चेंजवर ‘लिस्टेड’ आहे.

6) अलियांझ एसई - जर्मनीमध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी १८९० पासून अस्तित्वात असून, ती ७० देशांत कार्यरत आहे.

7) ॲक्‍सा - पॅरीसमध्ये मुख्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना १८१६ मध्ये झाली. ती ५६ देशांत कार्यरत आहे. या कंपनीत १,२५,००० कर्मचारी काम करीत असून, १० कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत. 

8) आयएनजी ग्रुप - १९९१ मध्ये स्थापन झालेल्या या डच कंपनीकडे ३.७ कोटी ग्राहक असून, ४० देशांत अस्तित्व आहे. कंपनीने २०१८ मध्ये ‘ॲक्‍सा’ कंपनीबरोबर ‘ऑनलाइन’ पॉलिसींसाठी ‘टाय-अप’ केला आहे. 

9) मेटलाइफ - या अमेरिकी कंपनीकडे नऊ कोटी ग्राहक असून, कंपनी ६० देशांत काम करते.

10) एआयजी - २००७-०८ च्या ‘सबप्राइम’ संकटात ही कंपनी अडचणीत आली होती. परंतु, अमेरिकी सरकारने १८० अब्ज डॉलरचे पॅकेज देऊन तिला वाचविले. 

सुरवातीला सांगितल्याप्रमाणे, ‘एलआयसी’चे ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ ११० अब्ज डॉलर गृहित धरल्यास ‘एलआयसी’ ही जागतिक क्रमवारीत (मार्केट कॅपिटलायझेशनच्या निकषानुसार) सहावा क्रमांक पटकावू शकते. अर्थात हे विश्‍लेषण काही गृहितकांवर अवलंबून आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article atul sule on lic