इक्विटी फंडातील ‘एसआयपी’ सर्वोत्तम

एन. एस. व्यंकटेश
Monday, 18 November 2019

पूर्वी देण्यात येत असलेल्या व्याजदरांच्या तुलनेत आज बॅंकांकडून दिले जाणारे व्याजदर फारच कमी झाले आहेत. कमी व्याजदरावर मात करायची असेल, तर आता म्युच्युअल फंडात ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ हा (एसआयपी) उत्तम मार्ग आहे.

सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र व्याजदर कमी होत चालले आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात करण्याच्या धोरणामुळे बॅंकांकडून आपल्याला मिळत असलेल्या व्याजदरांमध्ये घट होत आहे. पूर्वी देण्यात येत असलेल्या व्याजदरांच्या तुलनेत आज बॅंकांकडून दिले जाणारे व्याजदर फारच कमी झाले आहेत. कमी व्याजदरावर मात करायची असेल, तर आता म्युच्युअल फंडात ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ हा (एसआयपी) उत्तम मार्ग आहे. ‘एसआयपी’चा पर्याय निवडण्यामागचे पहिले कारण म्हणजे दीर्घकाळात चांगला परतावा आणि शिवाय करसवलतीचा देखील फायदा घेता येतो. घटणाऱ्या व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर, बाजारातील अल्पकालीन चढ-उतारांचा लाभ घेत व कंपन्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे शेअर बाजार चांगली कामगिरी करू शकतो; तसेच दीर्घकाळात ‘इक्विटी’मधील गुंतवणुकीचे मूल्य वाढत जात असते. त्यामुळे ‘इक्विटी फंडा’तील ‘एसआयपी’ दीर्घकाळात नक्कीच चांगला परतावा देऊ शकते.

व्याजदरात कपात केल्यामुळे अर्थव्यवस्थेतील मागणी वाढत जाते. याचाच परिणाम म्हणून अर्थव्यवस्था सकारात्मक स्थितीत येते आणि त्याचा लाभ होत उद्योगांची कामगिरी चांगली होते. शेअर बाजारातील वाढ ही उद्योगांच्या किंवा कंपन्यांच्या चांगल्या कामगिरीवर आणि अर्थव्यवस्थेच्या विकासावरच होत असते. अशा परिस्थितीत ‘एसआयपी’ हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरतो. गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांचा ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करण्याचा कल वाढत चालला आहे. ‘म्युच्युअल फंड सही है’ या मोहिमेने गुंतवणूकदारांमध्ये जागृती निर्माण करण्याबरोबरच गुंतवणुकीची समज वाढविण्यासंदर्भात मोठा चमत्कार घडवून आणला आहे. या मोहिमेमुळे गुंतवणूकदारांमध्ये दर महिन्याला छोट्या रकमेद्वारे ‘इक्विटी म्युच्युअल फंडां’मध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक करण्यासंदर्भात जागृती निर्माण केली गेली आहे. इतकेच नाही, तर गुंतवणूकदारांना बाजारात जेव्हा घसरण सुरू असते, तेव्हा आपली गुंतवणूक नियमित ठेवण्यासही उद्युक्त केले आहे. 

नियमितपणे गुंतवणूक हवी
गुंतवणूकदारांनी ठराविक कालावधीने आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेतला पाहिजे आणि जोवर त्यांची मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्नकार्य किंवा निवृत्तीनंतरची आर्थिक गरज यासारखी विविध उद्दिष्टे पूर्ण होत नाहीत, तोपर्यत नियमितपणे गुंतवणूक सुरू ठेवली पाहिजे.

(लेखातील मते वैयक्तिक .)
(शब्दांकन - विजय तावडे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on Equity funds