एकाच दगडात तीन पक्षी

अरविंद परांजपे
Monday, 21 September 2020

इक्विटी, डेट आणि सोन्यातील गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या योजना न घेता एकाच योजनेतून हे तिन्ही ॲसेट प्रकार घेता येतात. ‘ॲसेट ॲलोकेशन’ हा गुंतवणुकीच्या यशास कारणीभूत असणारा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. 

आपल्याला अनेक व्हिटॅमिन्स घ्यायची असतात, तेव्हा प्रत्येकासाठी वेगवेगळी गोळी न घेता एकच मल्टिव्हिटॅमिनची गोळी घेऊ शकतो. त्याच धर्तीवर गुंतवणूकदारांना इक्विटी, डेट आणि सोन्यातील गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या योजना न घेता एकाच योजनेतून हे तिन्ही ॲसेट प्रकार घेता येतात. ‘ॲसेट ॲलोकेशन’ हा गुंतवणुकीच्या यशास कारणीभूत असणारा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शेतामध्ये शेतकरी जे पीक लावेल, त्यानुसार त्याला उत्पन्न मिळते. धान्य, फळे-भाज्या, नकदी पिके अशी विविधता असलेली पिके लावली तर त्याची जोखीमही कमी होते. या तत्त्वाचा गुंतवणुकीतही अवलंब करून एकाच ॲसेट प्रकाराची जोखीम कमी करता येते. महत्त्वाची बाब म्हणजे, या ॲसेट प्रकारांच्या परताव्याचे एकमेकांशी कमीत कमी नाते असले तरच या विविधतेचा फायदा मिळू शकतो. पण सोने, ठेवी आणि इक्विटी यातील कशात जास्त परतावा मिळेल, हे आधी कळणे शक्‍य नसल्याने या तिन्हींचा समावेश असलेल्या योजनेची निवड करणे हा मध्यममार्ग निवडता येतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

म्युच्युअल फंडातील मल्टिॲसेट योजना निवडण्यामागे पुढील महत्त्वाची कारणे आहेत 

प्रत्येक ॲसेट प्रकाराचा परतावा वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीत वेगळा असतो.

प्रत्येकाचे अचूक ‘टायमिंग’ साधणे अशक्‍य असते. 

विविधतेमुळे एकाच ॲसेट प्रकारावर अवलंबून राहण्याची गरज नसते.

पोर्टफोलिओची जोखीम कमी होते आणि स्थिरता येते.
सन २०१० ते २०२० या १० वर्षांच्या काळात पाच वेळा सोन्याने, तीन वर्षे इक्विटी म्हणजे शेअर्सने, तर दोन वर्षे डेट या ॲसेट प्रकाराने सर्वांत जास्त परतावा दिला आहे. म्हणजे, कोणता ॲसेट प्रकार कधी जास्त परतावा देणार आहे, हे माहीत नसल्याने एकाच योजनेत सर्वांचा समावेश करणे, हे योग्य धोरण होऊ शकते.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग 
सतत बदलणाऱ्या बाजारभावांमुळे एकदा केलेले ‘ॲसेट ॲलोकेशन’ बदलत राहते. त्याचे पुनर्संतुलन (रिबॅलन्सिंग) करावे लागते, तरच दिशा योग्य राहून आर्थिक उद्दिष्टे साध्य करायचे मार्ग चुकत नाहीत. जर गुंतवणूकदाराने प्रत्येक ॲसेट प्रकारासाठी वेगवेगळी योजना घेतली असेल, तर ‘रिबॅलन्सिंग’साठी विक्री-खरेदी करणे हे त्याला स्वत:ला करावे लागते. ते कधी करायचे, हे ठरविणे सोपे नसते. तसेच, त्यासाठी त्याला ‘एक्‍झिट लोड’ आणि प्राप्तिकर भरावा लागतो. मल्टिॲसेट योजनेचा फायदा म्हणजे फंड व्यवस्थापकाकडूनच वेळोवेळी ‘रिबॅलन्सिंग’ केले जाते; ज्यासाठी ‘एक्‍झिट लोड’ही नसतो आणि प्राप्तिकरही भरावा लागत नाही. 

शेअर बाजाराची परिस्थिती
अगदी थोड्या काळातच शेअर बाजाराने उसळी घेऊन ‘कोव्हिड-१९’च्या महासाथीपूर्वीच्या पातळीवर येण्याची तयारी दाखविली आहे. बाजाराचे मूल्यांकन महाग झाले आहे, असे काहींचे म्हणणे आहे. तसेच, एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) वाढ न होता आकुंचनच होणार आहे. असे असले तरीही पुढील तीन वर्षे आणि त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ‘एसटीपी’ आणि ‘एसआयपी’च्या माध्यमातून इक्विटी आणि मल्टिॲसेट योजनेत गुंतवणूक करता येईल.

(लेखक म्युच्युअल फंड क्षेत्रातील जाणकार आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arvind paranjpe article about gold equity debt