मै निकला गड्डी लेकर....... 

Seltos car
Seltos car

पणजी : "मै निकला गड्डी लेकर, एक मोड आया, की दिल विच छोड आया', अशीच भावना काहीशी किया सेल्टॉस ड्राइव्ह करताना आला. निसर्गसुंदर गोव्यात किया मोटर्सच्या वतीने सेल्टॉस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आकर्षक, स्पोर्टी लूकची किया चालवण्याचा योग आला.

देशभरातील चाळीसहून अधिक माध्यम प्रतिनिधी सेल्टॉस चालवण्यासाठी गोव्यात दाखल झाले. मग सुरू झाला भातशेतीतून वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या सेल्टॉसचा प्रवास. टुमदार घरे, भव्य दिव्य नवीन पुल, समुद्राच्या लाटांचा आवाज, अधून मधून कोसळणाऱ्या सरी अशा वातावरणातून किया चालवण्याची मजा औरच राहिली. 7 आणि 8 ऑगस्ट रोजी सेल्टॉसच्या विविध श्रेणीतील मोटार चालवण्याची संधी मिळाली. एवढेच नाही तर गाडी चालवतानाही गोवेकरही तितक्‍याच उत्सुकतेने कियाकडे वळून पाहत होते, हे विशेष. किया मोटर्सचे हे तिसरे मॉडेल होते. अनंतपूर आणि गुडगाव येथे किया मोटर्सची निर्मिती होत असून लवकरच भारतीय बाजारपेठेत किया मोटर्सचा दबदबा निर्माण होईल, असा विश्‍वास प्रॉडक्‍ट प्लॅनिंगचे प्रमुख विवेक गोस्वामी यांनी व्यक्त केला. 

गोवा म्हटलं की राजकपूरचा बॉबी किंवा कमल हसनचा एक दुजे के लिये आठवल्याशिवाय राहत नाही. गोव्यात उतरताच त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. गोव्यातील रस्त्यावरून जात असताना याच रस्त्यावरून कमल हसन गेला असेल का, ऋषी कपूर आणि डिंपल कापडिया यांचे प्रेम याच परिसरात बहरले का, असा प्रश्‍न आल्याशिवाय राहत नाही. अशा गोव्यात किया मोटर्सचे सेल्टॉस ड्राइव्ह चालवणे हा एक संस्मरणिय अनुभव होता. निसर्गाने नटलेल्या आणि पर्यटकांनी गजबजलेल्या आणि गोव्यातील अनोळखी मार्गावरून चारचाकी गाडी चालवणे तसे अवघड. पण गाडी चालवण्याच्या हौसेने सर्वांनी जोखीम पत्करली आणि ती लिलया पार पाडली. किया सेल्टॉस लवकरच बाजारपेठेत दाखल होत असून यासाठी 8 ऑगस्टपर्यंत सुमारे 23 हजाराहून अधिक नागरिकांनी प्रि-बुकिंग झाले आहे. या गाडीची किंमत सुमारे 11 ते 17 लाख रुपयांपर्यंत असणार आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या सेल्टॉस मोटारीचा दर्जा राखताना कोणतिही तडजोड केलेली नाही.

सेल्टॉसचा स्पोर्टी लूक हा भारतीयांना आणि विशेषत: तरुणांना आकर्षित करणारा आहे. ग्रीक पुराणकथेतील हर्क्‍युलसच्या मुलाचे नाव सेलटोस होते. त्यावरून किया मोटारीच्या नव्या श्रेणीस सेल्टॉस नाव दिल्याचे ते निर्माते सांगतात. सेल्टॉसची दणकट, दमदार आणि आकर्षक श्रेणी नवीन बाजारपेठ कमी कालावधीत काबिज करेल, असा विश्‍वास निर्मात्यांना वाटतो. सेल्टॉसमधील आतील रचना आकर्षक असून आरामदायी आसन व्यवस्था हे गाडीचे वैशिष्ट्ये आहे. गाडीच्या रचनेत डिजिटल तंत्राचा पुरेपूर वापर केला असून या आधारे टायरमधील हवेचा दाब, इंधनाची स्थितीसह अन्य सूचना चालकाला वेळोवेळी मिळणार आहे. दहा सेंकदात शंभर किलोमीटर प्रतितास वेग गाठण्याची क्षमता सेल्टॉसने विकसित केली आहे. सेल्टॉसचे नवे तंत्र "यूव्हीओ कनेक्‍ट' सेवा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. नोटिफिकेशन, ट्रॅकिंग सिस्टिम, वाहनांची सेफ्टी, सिक्‍युरिटी यासाठी ही यंत्रणा चालकासाठी महत्त्वाची ठरेल. कर्णमधूर संगीत ऐकत गाडी चालवण्याचा अनुभव आनंददायी ठरेल, असे निर्माते म्हणतात. भारतातील रस्त्याचा अभ्यास करुनच सेल्टॉसच्य रचनेमध्ये "इन्फोटेन्मेंट'चा पूरेपूर वापर करण्यात आला आहे. खड्ड्यातूनही गाडी चालवणे त्रासदायक ठरणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. 

यूव्हीओ यंत्रणेचे वैशिष्ट्ये 
दणकट, नियंत्रण, आरामदायी आणि वेग हे सेल्टॉसची खासीयत आहे. याशिवाय सेल्टॉसमधील यूव्हीओ कनेक्‍टचे सुरवातीला तीन वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शन असणार आहे. या कनेक्‍टिव्हीटी ऍपमध्ये 37 फिचर्स असून त्याची पाच श्रेणीत विभागणी केली आहे. त्यात नेव्हिगेशन, सेफ्टी, सिक्‍युरिटी, व्हेइकल मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल आणि कन्विनियंसचा समावेश आहे. किया सेल्टोस हे भारतातील तिसरे उत्पादन आहे. 

सेल्टॉसचे आकर्षण 
टेस्ट ड्राईव्हदरम्यान सेल्टॉस मोटार एका ठिकाणी थांबलेली असताना गोव्यातील एका नागरिकाने स्वत:ची गाडी थांबवून सेल्टॉसमध्ये बसण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्याने सेल्टॉसमध्ये बसून आरामशीर आसनाचे कौतुक केले. त्याचवेळी निसर्गसुंदर गोव्यातून सेल्टॉस धावत असताना अनेक वाहनस्वार कुतुलहापोटी गाडीकडे वळून पाहत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com