फिनटेक  : इन्स्टा  क्रेडिट कार्ड लोन

अतुल कहाते
Monday, 22 February 2021

बॅंकांकडे भरपूर पैसे असतात आणि त्यांचा वापर नफा कमावण्यासाठी कसा करायचा, हा त्यांचा एकमेव हेतू असतो. साहजिकच ग्राहक म्हणून आपण त्याकडे सावधपणे बघणेच श्रेयस्कर ठरते.

तातडीने मिळणारे कर्ज अर्थात ‘इन्स्टा लोन’ हे आपल्याला क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून मिळू शकते. याचा सोपा अर्थ समजून घेण्यासाठी आधी क्रेडिट कार्डाचा अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. बऱ्‍याच जणांना क्रेडिट कार्ड वापरूनसुद्धा क्रेडिट आणि डेबिट कार्ड यांच्यामधील महत्त्वाचा फरक समजत नाही. डेबिट कार्ड हे आपल्या बॅंक खात्याला जोडलेले असते. म्हणजेच आपल्या बचत खात्यातील पैशांचा वापर करण्यासाठी डेबिट कार्ड असते. अर्थातच हे पैसे आपल्याकडे आधीपासून असतात. क्रेडिट कार्ड म्हणजे बॅंकेने आपल्याला दिलेले कर्ज असते. म्हणजेच हे पैसे आपले नव्हे; तर बॅंकेचे असतात. आपण ते वापरू शकतो आणि नंतर आपण आपले क्रेडिट कार्डाचे बिल जेव्हा भरतो, तेव्हा आपण खरे म्हणजे बॅंकेने या रूपाने आपल्याला दिलेले कर्जच फेडत असतो.

आता मुळात क्रेडिट कार्ड हेच एक कर्ज असेल, तर ‘इन्स्टा क्रेडिट कार्ड लोन’ म्हणजे काय? तर आपल्याला काही कारणाने समजा रोख रकमेची गरज असेल आणि त्यासाठी कर्ज काढण्यावाचून दुसरा पर्याय आपल्यासमोर नसेल, तर त्यावेळी आपण आपल्या क्रेडिट कार्डाचा वापर नेहमीसारखा खरेदी किंवा बिले चुकती करणे या प्रकारे न करता कर्ज काढण्यासाठी करू शकतो. म्हणजेच आपली बॅंक आपल्या क्रेडिट कार्डावरच्या कर्जापोटी आपल्या बॅंक खात्यात रक्कम जमा करते. अर्थातच हे कर्ज आपल्याला फेडावे लागतेच. म्हणजेच मूळ क्रेडिट कार्डाचे नेहमीचे बिल तर आपण भरणारच; पण शिवाय आता या ‘इन्स्टा क्रेडिट कार्ड लोन’चे हप्तेही आपल्याला भरावे लागतात.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशाप्रकारे आपली आयत्या वेळेला सोय होत असल्यामुळे या कर्जांवर बॅंका खूप जास्त व्याजदर आकारतात. साहजिकच क्रेडिट कार्डांचा वापर ‘इन्स्टा लोन’ घेण्यासाठी अगदी हातघाईची परिस्थिती असल्याशिवाय अजिबात करू नये. बॅंका जरी आपल्याला जाहिरातींद्वारे अशी कर्ज घेण्यासाठी आकर्षित करीत असल्या तरी या कर्जामुळे आपली आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होण्याची दाट शक्यता असते. तसेच मुळात क्रेडिट कार्डाचे बिल भरण्यातच आपल्याला नाकीनऊ येत असतील, तर त्याचा वापर करून ‘इन्स्टा लोन’ घेण्याच्या भानगडीत चुकूनही पडू नये. यातून माणूस कर्जाच्या सापळ्यात अडकत जाण्याची दाट शक्यता असते. 

बॅंकांकडे भरपूर पैसे असतात आणि त्यांचा वापर नफा कमावण्यासाठी कसा करायचा, हा त्यांचा एकमेव हेतू असतो. साहजिकच ग्राहक म्हणून आपण त्याकडे सावधपणे बघणेच श्रेयस्कर ठरते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atul kahate writes article about Insta Credit Card Loan