स्मार्ट पद्धतीने करा मनी मॅनेज

अतुल सुळे
Monday, 20 January 2020

स्मार्टफोनमध्ये आपल्या गरजेचे काही ‘ॲप्स’ डाऊनलोड केले, की आपण अनेक अवघड वाटणारी कामे चुटकीसरशी करू शकतो.

नवीन दशकाला सुरुवात झाली आहे आणि या नव्या ‘डिजिटल’ दशकातील ‘अलादीनचा दिवा’ म्हणजे ‘स्मार्टफोन!’ या स्मार्टफोनमध्ये एकदा आपल्याला आवश्‍यक ते ‘ॲप्स’ इन्स्टॉल केले की तुम्ही झालात ‘स्मार्ट’. अरेबियन नाइटस्‌मधील अल्लाद्दीन जेव्हा जेव्हा जादूचा दिवा घासत असे, तेव्हा तेव्हा एक जिन प्रकट होऊन ‘काय काम करू’ असे विचारत असे. त्याचप्रमाणे आपल्या स्मार्टफोनमध्ये आपल्या गरजेचे काही ‘ॲप्स’ डाऊनलोड केले, की आपण अनेक अवघड वाटणारी कामे चुटकीसरशी करू शकतो. गुंतवणुकीसाठी एखादे प्रॉडक्‍ट/सर्व्हिस निवडताना रिसर्च करणे असो किंवा योग्य ते प्रॉडक्‍ट निवडणे, त्यात गुंतवणूक करताना आवश्‍यक कागदपत्रे जमविणे, प्रत्यक्ष गुंतवणुक करणे इत्यादी किचकट प्रक्रिया ‘ॲप्स’च्या वापराने सुकर होतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डिजिलॉकर ॲप
वर्ष २०१५ मध्ये केंद्र सरकारने हे ‘ॲप’ लाँच केले. आपली काही महत्त्वाची कागदपत्रे आपण येथे सुरक्षितरीत्या ठेवू शकता. उदा. पॅन कार्ड, आधार कार्ड, इन्कमटॅक्‍स रिटर्न्स, बॅंक डॉक्‍युमेंटस, ड्रायव्हिंग लायसेन्स. हा लॉकर आधारशी संलग्न असतो. या लॉकरसाठी कोणतेही चार्जेस भरावे लागत नाहीत. 

मनी मॅनेजमेंट ॲप
या ॲपच्या मदतीने आपण आपले मासिक ‘बजेट’ बनवू शकता. दर महिन्याला उत्पन्न किती मिळाले, खर्च किती झाला, शिल्लक किती राहिली, कोठे खर्च अधिक झाला व तो कमी कसा करावा, हे ॲप सांगते. आपल्या बॅंक खात्यांत शिल्लक किती आहे, हेपण ॲप्स सांगतात. खर्चाचे वर्गीकरण ही ॲप करते. उदा. एम ट्रॅकर (M Trakr), मिंट, वॉलनट, गुड बजेट. 

खर्च विभागण्यासाठी ॲप
हे ॲप कॉमन खर्चाची विभागणी करण्यासाठी उपयुक्त आहे. जेव्हा विद्यार्थी ग्रुपने सहलीला, हॉटेलमध्ये जातात तेव्हा झालेल्या खर्चाची विभागणी सभासदांमध्ये करण्याचे काम हे ॲप करते. थकलेल्या बिलाची वसुली करण्यासाठीही हे ॲप मदत करते. उदा. स्प्लिटवाइज (splitwise) 

शेअर, म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी ॲप
शेअर बाजारातील, अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या घटना, शेअरचे भाव, म्युच्युअल फंडांची सर्व माहिती, एनएव्ही, चार्टस इत्यादी सर्व माहिती या ॲप्सद्वारे मिळते. आपल्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ बनवून तो ‘ट्रॅक’ ही करू शकता. काही ॲप्सद्वारे आपण खरेदी-विक्रीचे व्यवहार करू शकतो. उदा ः ‘सकाळ मनी’, ‘मनीकंट्रोल’. 

टॅक्‍स कॅल्क्‍युलेटर ॲप
आपापला टॅक्‍स कॅलक्‍युलेट करणे ही एक किचकट प्रक्रिया असते. परंतु टॅक्‍स कॅलक्‍युलेटर ॲप्सचा वापर करून एखादी व्यक्ती, प्राप्तिकराविषयी फारशी माहिती नसलेली व्यक्तीसुद्धा आपले ‘टॅक्‍स प्लॅंनिंग’ आणि ’कॅलक्‍युलेशन’ सहजपणे करू शकते. करबचत करण्यासाठी कोठे गुंतवणूक करावी, हे सुद्धा ॲप सुचविते. काही ॲप्स आपल्या रिटर्नचा तसेच रिफंडचा ‘स्टेटस’ जाणून घेण्यास मदत करतात. - ‘थिंक टॅक्‍स’, ऑल इंडिया आयटीआर’, ‘माय आयटी रिटर्न’, ‘माय टॅक्‍स इंडिया’. 

चला तर, ॲप्सचा वापर करून आपण स्मार्ट पद्धतीने ‘मनी मॅनेज’ करूया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atul sule article smart way to manage money