अबब.... केवढा हा लाभांश! 

अबब.... केवढा हा लाभांश! 

विमा कंपन्यांसाठी ‘क्लाऊड’वर आधारीत सॉफ्टवेअर बनविणाऱ्या मॅजेस्को या कंपनीने अलीकडेच ५ रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर तब्बल १९,४८० टक्के, म्हणजे प्रति शेअर ९७४ रुपये एवढा प्रचंड अंतरिम लाभांश जाहीर करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. या लाभांशासाठीची ‘रेकॉर्ड डेट’ २५ डिसेंबर २०२० असून, हा शेअर २३ डिसेंबर २०२० रोजी ‘एक्स डिव्हीडंड’ होणार आहे. या शेअरचा सध्याचा भाव रु. ९७४ असून, गेल्या वर्षभरातील नीचांकी पातळी रु. १६८ वर, तर उच्चांकी पातळी रु. १००९ आहे. 

‘मॅजेस्को’ २०१४ पर्यंत, ‘मास्टेक’ या आयटी कंपनीची अमेरिकी उपकंपनी होती. २०१४ मध्ये ‘मॅजेस्को’ स्वतंत्र कंपनी झाली. ‘मास्टेक’ कंपनीचे संस्थापक अशांक देसाई, सुधाकर राम, केतन मेहता हे ‘मॅजेस्को’चे प्रमुख भागधारक आहेत. जुलै २०२० मध्ये ‘थमा ब्राव्हो’ या प्रायव्हेट इक्विटी कंपनीने ‘मॅजेस्को’ची अमेरिकी उपकंपनी ५९.४ कोटी डॉलरला खरेदी केली. त्यावेळी ‘मॅजेस्को’च्या शेअरचा भाव रु. ४०० च्या आसपास होता. कर वजा जाता हाती आलेली रक्कम कंपनी भागधारकांमध्ये लाभांशाच्या रूपात वाटणार आहे. 

ही बातमी जाहीर होताच, ‘मॅजेस्को’च्या शेअरने रु. १००९ ची उच्चांकी पातळी गाठली होती. परंतु, नंतर उच्च उत्पन्न गटातील (एचएनआय) गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे शेअरचा भाव रु. ९७५ पर्यंत खाली आला. 

उच्च उत्पन्न गटातील भागधारकांनी विक्री करण्याचे कारण म्हणजे लाभांशावर कर लावण्याच्या पद्धतीत झालेला एक महत्त्वाचा बदल. गेल्या वर्षीपर्यंत लाभांशावर गुंतवणूकदारांना कर भरावा लागत नसे. या आर्थिक वर्षात मात्र प्रत्येकाला आपापल्या ‘टॅक्स ब्रॅकेट’प्रमाणे कर भरावा लागणार आहे. जो, ‘एचएनआय’साठी सरचार्ज धरून ३० ते ४३ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. हाच कर अल्पावधीतील भांडवली नफ्यावर १५ टक्के, तर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याचा विचार करता, १ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवर १० टक्के आहे. त्यामुळे उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना लाभांश घेण्यापेक्षा शेअर विकून भांडवली नफा घेणे फायदेशीर ठरणार आहे. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

‘मॅजेस्को’ कंपनीचे ९९ टक्के उत्पन्न या विकलेल्या कंपनीतून होत होते, त्यामुळे हा लाभांश दिल्यानंतर कंपनीकडे रु. १०३ कोटी रोकड व रु. ७० कोटी रुपयांची रिअल इस्टेट शिल्लक राहील, जी कालांतराने २.८५ कोटी शेअरमध्ये विभागली जाईल व त्यानंतर कंपनी ‘डीलिस्ट’ होऊ शकते. ५ रुपये दर्शनी मूल्यावर रु. ९७४ हा लाभांशाचा दर १९,४८० टक्के पडत असला, तरी सध्याच्या भावाला हा शेअर खरेदी करणाऱ्याला ‘डिव्हीडंड यिल्ड’ सुमारे १०० टक्के पडेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com