खाद्यतेलाची ‘एटीएम’ लवकरच: पासवान

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

लहान पाकिटे तयार करण्याचा सल्ला 

नवी दिल्ली: पैसे टाकल्यानंतर शीतपेय देणाऱ्या यंत्रांसारख्या यंत्रांचा उपयोग आता खाद्यतेलाच्या वितरणासाठी करण्याचा सरकारचा मानस आहे. यातून गरिबांना त्यांच्या गरजेनुसार कमी प्रमाणात आणि चांगल्या दर्जाचे खाद्यतेल मिळू शकेल. त्यामुळे नजीकच्या काळात अशी तेलाची एटीएम यंत्रे दाखल होण्याची शक्‍यता आहे.

लहान पाकिटे तयार करण्याचा सल्ला 

नवी दिल्ली: पैसे टाकल्यानंतर शीतपेय देणाऱ्या यंत्रांसारख्या यंत्रांचा उपयोग आता खाद्यतेलाच्या वितरणासाठी करण्याचा सरकारचा मानस आहे. यातून गरिबांना त्यांच्या गरजेनुसार कमी प्रमाणात आणि चांगल्या दर्जाचे खाद्यतेल मिळू शकेल. त्यामुळे नजीकच्या काळात अशी तेलाची एटीएम यंत्रे दाखल होण्याची शक्‍यता आहे.

ग्राहक कल्याणमंत्री रामविलास पासवान यांनी आज पत्रकारांशी बोलताना तेलवितरण यंत्रांबाबत मंत्रालयीन पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. बाजारात केवळ तेलाची एक किलो वजनाची पाकिटे आणि त्यापेक्षा अधिक वजनाचे डबे मिळतात; परंतु गरीब लोक त्यांच्या गरजेनुसार कमी प्रमाणात सुटे तेल खरेदी करतात. त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते. त्यामुळे लहान आकाराची तेलाची पाकिटे तयार करावीत, असे तेल उत्पादकांना सांगण्यात आल्याचे पासवान म्हणाले.

अन्नसुरक्षा प्रमाणीकरण प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) अध्यक्ष आशिष बहुगुणा यांनीही या निर्णयाला दुजोरा दिला. अशा प्रकारे सुटे तेल विकणारी "व्हेंडिंग यंत्रे' बसविण्याच्या प्रस्तावाला सरकारने गेल्याच आठवड्यात मान्यता दिली आहे. यासाठीच्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत लवकरच पश्‍चिम बंगालमध्ये अशी यंत्रे बसविली जातील. त्यानंतर इतरत्रही या यंत्रांचा वापर होईल. याशिवाय तेल उत्पादकांनी तेलाच्या लहान पाकिटांचे उत्पादन करावे, यासाठी त्यावरील शुल्काचा फेरविचार केला जावा, अशी शिफारस "एफएसएसएआय'ने सरकारला केली आहे; मात्र खाद्यतेल हे "जीएसटी'च्या एकसमान कररचनेमध्ये येत असल्याने हा प्रस्ताव मान्य होण्याची शक्‍यता कमी आहे.

भेसळयुक्त तेल घातक
खाद्यतेलातील भेसळीमुळे कर्करोग, हृदयरोग, पक्षाघात किंवा यकृताचा विकार यासारखे घातक आजार होण्याची शक्‍यता पाहता "एफएसएसएआय'ने भेसळशोधक चाचणी यंत्रे विकसित करणे सुरू केले आहे. एका अध्ययनानुसार सुट्या तेलाच्या 1015 नमुन्यांपैकी तब्बल 85 टक्के नमुन्यांमध्ये भेसळ आढळली आहे. भेसळ चाचणीमध्ये सरकीच्या आणि तिळाच्या तेलाचे 74 टक्के नमुने, तर मोहरीच्या तेलाचे 72 टक्के नमुने सदोष आढळले आहेत. केवळ सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलामध्येच अनुक्रमे 20 आणि 16.5 टक्के एवढी कमी भेसळ आढळली आहे.

Web Title: Availability of PoS machines to improve in coming days: Ram Vilas Paswan