जगातील सर्वात मोठा दानशूर आज होतोय निवृत्त!

जगातील सर्वात मोठा दानशूर आज होतोय निवृत्त!

मुंबई: आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी आज (मंगळवार) निवृत्त होणार आहे. वयाच्या 74 व्या वर्षी अझिम प्रेमजी निवृत्ती घेत असून 53 वर्षे त्यांनी विप्रोचे प्रतिनिधित्व केले. आता कंपनीची धुरा त्यांनी त्यांचा मुलगा रिषद प्रेमजी याच्याकडे सोपवली आहे. उद्यापासून म्हणजेच 31 जुलैपासून रिषद प्रेमजी कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. मात्र अझिम प्रेमजी आपल्या कंपनीचे कार्यकारी संचालक आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून संचालक मंडळात कार्यरत राहणार आहेत. 

अझिम प्रेमजी यांचा जन्म 24 जुलै 1945 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडिल हाशीम प्रेमजी हेदेखील एक उद्योगपती आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीदरम्यान, हाशीम प्रेमजी यांच्या वडिलांनी त्यांना पाकिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्यांनी भारतातच राहणे पसंत केले. त्यांच्या पश्चात कंपनीची धुरा अझिम प्रेमजी यांनी स्वीकारली. अझिम प्रेमजी यांनी कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून आपले शिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या निधनानंतर ते पुन्हा भारतात परतले आणि आपला व्यवसाय साभाळण्यास सुरूवात केली. अझीम प्रेमजींनी खान्देशातील अमळनेर येथे पहिला कारखाना सुरु केला.  त्यांचे वडील मुहंमद हाशिम प्रेमजी यांनी वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्टस् या नावाने सनफ्लॉवर खाद्यतेलाचा कारखाना सुरु केला होता आणि 787 या नावाच्या कपडे धुण्याच्या साबणाचाही ते उद्योग करत होते.

सुरूवातीला अमळनेर येथे विप्रो ही कंपनी वनस्पती तेल आणि साबणाच्या व्यवसायात उतरली. मात्र 1970 मध्ये प्रेमजी यांनी अमेरिकी कंपनी सेंटिनल कंम्प्युटर कॉर्पोरेशन या कंपनीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर विप्रोची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी म्हणून ओळख झाली.  कंपनी कंम्प्युटर सोबतच सॉफ्टवेअर सर्विसही देऊ लागली. आज विप्रो ही देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

2000 मध्ये अझिम प्रेमजी यांना मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन द्वारे मानद डॉक्टरेट देण्यात आले. 2006 मध्ये त्यांना नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग, मुंबई द्वारे लक्ष्मी बिझनेस व्हिजनरी पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त 2009 मध्ये त्यांना मिडलटाउन, कनेक्टिकटमधील वेस्लेयन विद्यापीठाने मानद डॉक्टरेटने सन्मानित केले होते. तसेच 2013 मध्ये लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार, म्हैसूर विद्यापीठाची मानद डॉक्टरेट अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त 2005 मध्ये अझिम प्रेमजी यांना पद्मभूषण तर 2011 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अझिम प्रेमजी हे देशातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच मे 2019 पर्यंत त्यांच्याकडे 21.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती होती. ‘द गिविंग प्लेज’च्या माध्यमातून त्यांनी आपली अर्धी संपत्ती दान करण्यावर सहमती दर्शवली आहे. तसेच अझिम प्रेमजी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 2.2 अब्ज डॉलर्स दान केले आहेत. भारतातही त्यांनी शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. 

सध्याच्या विप्रोच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 1 लाख 58 हजार 216.95 कोटींचे बाजारभांडवल आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात विप्रोच्या शेअरमध्ये किरकोळ वाढ झाली असून तो 262.65 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com