एक कोटी बॅंक खात्यांची माहिती लीक 

पीटीआय
शनिवार, 15 एप्रिल 2017

असा सुरू होता प्रकार 
टोळीतील सदस्य बॅंक अधिकारी अथवा एखाद्या कंपनीचा अधिकारी म्हणून ग्राहकाला दूरध्वनी करत. त्याला कार्ड ब्लॉक झाले, अशी अन्य कारणे देत त्याच्याकडून पासवर्ड व सीव्हीव्ही क्रमांक मिळवत. यासाठी ग्राहकांना विविध आमिषेही दाखविली जात असत. एकदा का आवश्‍यक माहिती मिळाली की, संबंधित खात्यावरील रक्कम तातडीने काढून घेतली जात असे. शक्‍यतो ज्येष्ठ नागरिक या टोळीचे लक्ष होते. 

टोळी जेरबंद; नाममात्र दरात विकली माहिती 
नवी दिल्ली - विविध बॅंकांमधील सुमारे एक कोटी ग्राहकांच्या खात्याची माहिती लीक करून ती अल्पदरात इतर कंपन्यांना विकल्याचा प्रकार राजधानी दिल्लीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य सूत्रधार पूरण गुप्तासह दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दिल्लीतील ग्रेटर कैलास येथे राहणाऱ्या वृद्ध महिलेने दाखल केलेल्या तक्रारीचा तपास करताना हा प्रकार उजेडात आला. आरोपींनी या महिलेस 1.46 कोटी रुपयांना गंडा घातला होता. बॅंक ग्राहकांच्या खात्याशी संबंधित क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असा आदी तपशील लीक करून तो प्रतिग्राहक 10 ते 20 पैशांमध्ये इतर कंपन्यांना विकल्याचे तपासात समोर आले असून, यात फेसबुक, व्हॉट्‌सऍपशी संबंधित माहितीचाही समावेश आहे. 

50 हजार ग्राहकांची एकत्रित माहिती 10 ते 20 हजार रुपये किंवा प्रतिग्राहक 20 पैसे दराने कंपन्यांना विकल्याची माहिती गुप्ता याने चौकशीदरम्यान दिली आहे. लीक झालेल्या माहितीमध्ये लोकांचे बॅंक खाते, क्रेडिट व डेबिट कार्डचा तपशील तसेच, पासवर्ड, जन्म तारखेसह इतर महत्त्वाच्या माहितीचा समावेश आहे. 

बॅंक अधिकाऱ्यांचाही सहभाग 
या प्रकरणात काही बॅंक अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी बॅंक व कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्यांकडून क्रेडिट, डेबिट कार्डवरील सीव्हीव्ही, ओटीपी क्रमांक अशी तत्सम माहिती जाणून घेत असत. त्यामुळे बॅंकांमध्ये मोठ्या पदावर काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांची नावेही तपासात उघड होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

(अर्थविषयक बातम्यांसाठी क्लिक करा : sakalmoney.com)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bank account hacked