दोन बॅंकांचे प्रमुख अडकले  

पीटीआय
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

गैरव्यवहाराची रक्कम   ६०० कोटी रुपये
सीबीआयचे छापे  ५० ठिकाणी

गुन्हे दाखल 
आयडीबीआय बॅंकेचे आजी व माजी अधिकारी - 15
खासगी कंपन्यांचे अध्यक्ष व संचालक  - 24

नवी दिल्ली - आयडीबीआय बॅंकेतील सहाशे कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी एअरसेलचे माजी प्रवर्तक सी. शिवशंकरन यांच्या दोन कंपन्यांसह सिंडिकेट बॅंक आणि इंडियन बॅंकेच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ही कारवाई केली आहे. 

शिवशंकरन यांच्या कंपन्यांनी आयडीबीआय बॅंकेकडून ५३० कोटी रुपयांचे कर्ज फेब्रुवारी २०१४ मध्ये घेतले होते. हे कर्ज नंतर थकीत होऊन सहाशे कोटी रुपयांवर गेले. या प्रकरणी इंडियन बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर खरात (आयडीबीआय बॅंकेचे माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक), सिंडिकेट बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मेल्विन रेगो (आयडीबीआय बॅंकेचे माजी उपव्यवस्थापकीय संचालक) यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ब्रिटिश व्हर्जिन बेटावरील ‘एक्‍सेल सनशाइन लिमिटेड’ आणि फिनलॅंडस्थित ‘विन विंड ओय’ या कंपन्यांवर सीबीआयने गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हे दाखल केले आहेत. या दोन्ही कंपन्या शिवशंकरन यांच्या मालकीच्या आहेत. 

सीबीआयने या प्रकरणी देशभरात ५० ठिकाणी छापे घातले आहेत. दिल्ली, मुंबई, फरिदाबाद, गांधीनगर, चेन्नई, बंगळूर, बेळगाव, हैदराबाद, जयपूर आणि पुण्यातील मालमत्तांवर हे छापे घातले. यामध्ये आयडीबीआय बॅंकेच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचाही समावेश आहे. 

Web Title: Bank Loan scam