बॅंकांचा आज देशव्यापी संप

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

खासगी क्षेत्रातील बॅंका सुरूच राहणार; धनादेश वटणावळीस अडचणी

खासगी क्षेत्रातील बॅंका सुरूच राहणार; धनादेश वटणावळीस अडचणी

नवी दिल्ली : बॅंक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या मंगळवारी 28 फेबुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे कर्मचारी संप करणार आहेत. "युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स' (युएफबीयू) या शिखर संघटनेच्या अंतर्गत बॅंक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटना या संपात उतरणार आहेत. या संपामुळे आज (दि. 28) बॅंकांचे कामकाज ठप्प होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, खासगी क्षेत्रातील बॅंका आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफ बॅंक, ऍक्‍सिस बॅंक आणि कोटक महिंद्रा बॅंक, ऍक्‍सिस बॅंक आदी बॅंकांचे कामकाज सुरळीत राहणार आहे. मात्र, संपामुळे धनादेश वटणावळीस (चेक क्‍लिअरन्स) अडचणी येण्याची शक्‍यता आहे. मंगळवारी संप झाला तर बॅंकांच्या शाखा, कार्यालये बंद राहणार असून, स्टेट बॅंक इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा यांनी याबाबत आपल्या ग्राहकांना कळविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर संप 
महाशिवरात्री, चौथा शनिवार आणि रविवार अशा तीन दिवसांच्या सलग सुट्यांनतर नऊ बॅंक संघटनांच्या एकदिवसीय संपामुळे मंगळवारी पुन्हा बॅंका बंद राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

मजदूर संघाचा विरोध 
बॅंक कर्मचाऱ्यांची भारतीय मजदूर संघ आणि "नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बॅंक वर्कर्स'चे या संघटनांचा या संपाला विरोध आहे. त्यामुळे संघटनांचे कर्मचारी संपात सहभागी होणार नाहीत. केवळ युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनचे कर्मचारी या संपात उतरणार आहेत.

बॅंक संघटनांच्या मागण्या
वाढलेल्या थकीत कर्जांसाठी बॅंकांमधील उच्चपदस्थांना जबाबदार धरावे
कर्जवसुलीसाठी कडक उपाययोजना कराव्यात
बॅंकांमध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांची पुरेशा प्रमाणात भरती करावी
कर्जबुडव्यांविरुद्ध फौजदारी कारवाई
नोटाबंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना जास्तीच्या कामाचा भत्ता मिळावा
बॅंक कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतनश्रेणी लागू करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी

Web Title: bank on strike today