बँक खातेही होणार पोर्टेबल- रिझर्व्ह बँकेचा महत्त्वाचा निर्णय

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

एकच बँक खाते क्रमांक कायम ठेवणं बँकांसाठी आव्हानात्मक असणार आहे. यामध्ये काही उणिवा राहण्याचीही शक्‍यता आहे. तांत्रिक माहिती तसेच खात्यासंबंधी अत्यावश्‍यक कागदपत्रांचे संकलन अतिशय चोख ठेवावे लागणार आहे.

नवी दिल्ली : मोबाईल नंबरप्रमाणे आता बँक खातेही पोर्टेबल करता येणार आहे. बँक बदलली तरी नव्या बँकेत खाते क्रमांक कायम ठेवण्याची सुविधा लवकरच खातेधारकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. तांत्रिकी अत्याधुनिकीकरणातून आधार कार्डशी बँकेचं खाते जोडण्यात आले की ही सुविधा सहजपणे उपलब्ध करून देता येईल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी व्यक्त केला.

"बँकिंग कोड्‌स अँड स्टॅण्डर्ड बोर्ड ऑफ इंडिया'ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. रिझर्व्ह बँकेचे हे पाऊल खातेधारकांसाठी सोयीचे आहे. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे, बँकांसाठी खूप क्‍लिष्ट प्रक्रिया असणार आहे. एकच बँक खाते क्रमांक कायम ठेवणं बँकांसाठी आव्हानात्मक असणार आहे. यामध्ये काही उणिवा राहण्याचीही शक्‍यता आहे. तांत्रिक माहिती तसेच खात्यासंबंधी अत्यावश्‍यक कागदपत्रांचे संकलन अतिशय चोख ठेवावे लागणार आहे.
खात्यांच्या पोर्टेबिलिटीसाठी बँकांना त्यांची बँक खाते क्रमांकाच्या संपूर्ण प्रणालीची पुनर्रचना करावी लागणार आहे. प्रत्येक बँकेची खातेधारकांना खाते क्रमांक देण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ती एकाच प्रणालीवर आणावी लागेल आणि यात प्रत्येक बँकेला आपले सॉफ्टवेअरर्स पूर्णपणे बदलावे लागतील, असे बँक बाझारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी यांनी सांगितले.

बँक खात्यांची पोर्टेबिलिटी सुविधा सुरू केल्यास त्याचा खातेधारकांना लाभ होणार आहे. एखाद्या बँकेची असमाधानकारक सेवा असल्यास ग्राहकांना इतर बँकांमध्ये त्याच खाते क्रमांकावर आपली सेवा सुरू ठेवण्याची संधी मिळणार आहे. यामुळे सुविधा पुरवण्यासाठी बँकांमध्ये स्पर्धा लागून यामध्ये खातेधारकांचे हित जोपासले जाणार आहे.
- जितेंद्र पी. सोलंकी

बँक खाते पोर्टेबिलिटीचे फायदे
पोर्टेबिलिटीमुळे एका बँकेतील खाते बंद करून दुसऱ्या बँकेत खाते खोलताना खातेधारकांना होणारा त्रास कमी होणार आहे. नव्या बँकेचा नवा खाते क्रमांक मिळवा, मग तो लक्षात ठेवा, अशा नानाविध कटकटी कमी होणार आहेत. त्यामुळे जुन्या बँकेचाच खाते क्रमांक कायम ठेवून नव्या बँकेत नव्याने खाते सुरू करता येणार आहे. याशिवाय, अनेक बँकांमध्ये एकच बँक खाते क्रमांक कायम ठेवण्याची सुविधा असणार आहे. यामुळे खातेधारकांना चांगली सुविधा देण्यासाठीची स्पर्धा बँकांमध्ये निर्माण होईल. तसेच प्रत्येक बँक आपल्या खातेधारकांची योग्य ती काळजी घेण्यासाठी प्रयत्नशील राहील.

Web Title: banking news portable bank account RBI