निफ्टी ऐतिहासिक उच्चांकावर आरुढ 

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

केंद्र सरकारने पायाभूत सुविधा व परवडणाऱ्या घरांवर लक्ष्य केंद्रीत केल्याने गृहनिर्माण, सिमेंट, रिअल्टी क्षेत्रातील समभागांमध्ये तेजी जाणवत आहे. बॅंकींग क्षेत्रातील समभागांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाने निफ्टीला 9,300 चा आकडा पार करण्यात बळकटी मिळाली. 
- आनंद जेम्स, प्रमुख बाजार विश्‍लेषक, जिओजीत फायनान्शिअल सर्व्हिस 

मुंबई - जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्‍स आणि निफ्टीची आगेकूच सुरूच होती. निफ्टीत 89 अंशांची वाढ झाली आणि पहिल्यांदाच निफ्टीने 9306.60 अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍समध्ये 287 अंशांनी वधारून 29 हजार 943 अंशांवर बंद झाला. 

खासगी आणि सार्वजनिक कंपन्यांची तिमाही कामगिरी उंचावल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. त्याचबरोबर सरकारी पातळीवर पायाभूत सेवा सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे. परवडणाऱ्या घरांना प्रोत्साहन दिल्यामुळे सिमेंट आणि बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. सेन्सेक्‍सवरील सर्वच प्रमुख क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला. ज्यात टेलिकॉम, एफएमसीजी, रियल्टी, तेल आणि वायू क्षेत्राचे निर्देशांक 1 ते 2 टक्‍क्‍यांदरम्यान वाढले. महिंद्रा अँड महिंद्रा, ऍक्‍सिस बॅंक, एचयूएल, पॉवरग्रीड, आयसीआयसीआय बॅंक, बजाज ऑटो, एचडीएफसी बॅंक आदी शेअर्समध्ये वाढ झाली. 

चलन बाजारातही रुपयाची दमदार कामगिरी सुरू असून डॉलरच्या तुलनेत तो 18 पैशांनी वधारला आणि 64.26 वर स्थिरावला. जागतिक बाजारातही आज तेजीचे वातावरण होते. चीन, हॉंगकॉंग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवानमधील वायदेबाजारात 0.16 ते 1.31 टक्‍क्‍यांची वाढ पहायला मिळाली. 

केंद्र सरकारने पायाभूत सुविधा व परवडणाऱ्या घरांवर लक्ष्य केंद्रीत केल्याने गृहनिर्माण, सिमेंट, रिअल्टी क्षेत्रातील समभागांमध्ये तेजी जाणवत आहे. बॅंकींग क्षेत्रातील समभागांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाने निफ्टीला 9,300 चा आकडा पार करण्यात बळकटी मिळाली. 
- आनंद जेम्स, प्रमुख बाजार विश्‍लेषक, जिओजीत फायनान्शिअल सर्व्हिस 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banks, FMCG lift Nifty above 9300; Sensex up 287 pts; Midcap at record closing high