सायरस मिस्त्रींकडून विश्‍वासघात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

सायसर मिस्त्री यांची समूहाच्या अध्यक्षपदी चार वर्षांपूर्वी नियुक्ती करून टाटा सन्सने त्यांच्यावर विश्‍वास टाकला होता. समूहातील मुख्य कंपन्यांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करून त्यांनी या विश्‍वासाला तडा घालवला आहे. समूहाचा अध्यक्ष हा सर्व कंपन्यांवर संचालक असतो, ही सध्याची पद्धत अस्वीकारार्ह असून, हे असेच पुढे चालू राहणार नाही. 
- टाटा सन्स

मुंबई - सायरस मिस्त्री यांनी विश्‍वासघात केला असून, ते समूहातील प्रमुख कंपन्यांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप टाटा सन्सने गुरुवारी केला. 

टाटा सूमहातील कंपन्यांची मालकी असलेल्या टाटा सन्सने आज नऊ पानी निवेदन जाहीर केले आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे (आयएचसीएल) नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सायरस मिस्त्री हे स्वतंत्र संचालकांना हाताशी धरून करीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. ‘आयएचसीएल’कडे ताज सूमहातील हॉटेलांचा ताबा आहे. आयएचसीएलमध्ये टाटा सन्सचा २८.०१ टक्के हिस्सा आहे. मागील आठवड्यात झालेल्या कंपनीच्या बैठकीत स्वतंत्र संचालकांनी अध्यक्ष मिस्त्री आणि त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता. 

टाटा स्टील युरोप, डोकोमो-टाटा यांचा संयुक्त प्रकल्प आणि टाटा मोटर्स या अडचणीतील कंपन्यांच्या परिस्थितीत मिस्त्री कोणतीही उल्लेखनीय सुधारणा करू शकले नाहीत. याउलट या कंपन्यांच्या तोट्यात वाढ होऊन त्यांचा बाजारपेठेतील हिस्सा कमी झाला, असे टाटा सन्सने म्हटले आहे. मिस्त्री यांनी केवळ कर्ज लिहून देण्याच्या पलीकडे काही प्रयत्न केले नाहीत, असेही नमूद करण्यात आले आहे.

Web Title: betrayal by cyrus mistry