लाभ आणि लोभ यात मात्रेचे अंतर 

भरत फाटक 
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

गुंतवणूकदारांचे वर्तन हा गेल्या 50 वर्षांत संशोधनाचा विषय ठरला आहे. हर्ब सायमन (1978), डिनियल कॅन्हेमन (2002), रॉबर्ट शिलर (2013) व या वर्षी प्रा. रिचर्ड थॅलर (2018) हे या संबंधातील संशोधनामुळे जगात प्रतिष्ठा पावलेल्या नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 2001 मध्ये "पद्‌मविभूषण' सन्मानाने गौरविलेले जॉन केनेथ गालब्रेथ यांचेही या विषयावरचे संशोधन नावाजले गेले आहे. 

आर्थिक निर्णय घेताना गुंतवणूकदारांचे वर्तन कसे असते हा गेल्या 50 वर्षांत संशोधनाचा विषय ठरला आहे. वर्तणूकशास्त्रातील संशोधनाची जोड दिल्यामुळे सर्वच पातळ्यांवरील निर्णय अधिक परिणामकारक होत आहेत. 

"कळतंय पण वळत नाही' या सार्थ म्हणीचा प्रत्यय वारंवार येत असतो. काय करणे चांगले प्रत्येकाला माहिती असते. पण ते करणे जिवावर येते. व्यायाम, नियमित आहार, योग्य प्रमाणात झोप या सवयी अंगी बाणवणे अवघड असते. धूम्रपान, मद्यपानासारख्या सवयी लागणे सोपे, पण नंतर ते साखळदंड तोडणे कठीण ठरते. श्रेयस्कर आणि प्रिय गोष्टींमधील द्वंद्व उपनिषदे आणि भगवद्‌गीतेच्या काळापासून मनुष्यस्वभावाचा अविभाज्य भाग आहे. कधी भीतिपोटी, कधी क्षणिक मोहामुळे, तर कधी "इतर लोक काय म्हणतील' या मानसिक दबावाखाली तर्कशुद्ध किंवा तत्त्वनिष्ठ निर्णय टाळण्याची मनोवृत्ती दिसून येते. 

हीच स्थिती आर्थिक निर्णयांमध्येही सामान्यपणे दिसून येते. मग ते निर्णय वैयक्तिक असोत किंवा सामाजिक वा सरकारी पातळीवरचे. सर आयझॅक न्यूटन या थोर शास्त्रज्ञानेही "साउथ सी' नामक आर्थिक बुडबुड्यामध्ये गुंतवणूक केली आणि त्याला नुकसानीचा मोठा फटका सहन करावा लागला, ही कथा सर्वश्रुत आहे. शेअर बाजारालाही गुरुत्वाकर्षणाचे नियम लागू पडतात, याचा विसर त्या महान प्रज्ञावंतालाही पडू शकतो, तर तुमच्या- माझ्यासारख्या पामरांची काय कथा! मागील आकडेवारीचा गोषवारा बघून, पूर्वीच्या भरती-ओहोटीच्या चक्रांचा विचार करून, तर्काच्या कसोटीवर पारखून तर्कशुद्ध निर्णय घेण्याऐवजी वारे कसे वाहत आहेत, सध्याची प्रचलित "फॅशन' काय आहे, याने वाहवत जाऊन गुंतवणूक केली जाते, तेव्हा "लाभ' आणि "लोभ' यात फक्त एका मात्रेचे अंतर असल्याचा प्रत्यय (उशिराने) येतो! 
अर्थात, यासाठी स्वतःला दोष देणे मात्र संयुक्तिक होणार नाही. जीवसृष्टीच्या सुरवातीपासून, विशेषतः भूचर प्राणिसृष्टीच्या उगमापासून असणाऱ्या आणि अंगी बाणलेल्या निर्णयप्रक्रियेचा वारसा आपल्याला मिळालेला आहे. जंगलात लांबवर कोठेही हालचाल दिसली, तर ती निमिषार्धात टिपून ते आपले भक्ष्य आहे, की आपण त्या प्राण्याचे भक्ष्य ठरणार आहोत, ते ताडावे लागते. त्यावर त्वरित निर्णय घेऊन आक्रमण किंवा पलायनाची कृतीही आवश्‍यक आहे. आजही आपले बहुतांश निर्णय या पद्धतीनेच घेतले जातात. वाहन प्रथम चालविताना विचार करून कराव्या लागणाऱ्या गोष्टी, नंतर प्रशिक्षित क्रिया बनतात. सहप्रवाशांशी बोलता बोलता किंवा संगीत ऐकता ऐकता आपण सहजपणे नकळत त्या करू शकतो. 

हीच पद्धत त्यामुळे आर्थिक निर्णय घेतानाही वापरली जाते. राज्याच्या सीमेजवळील एका पेट्रोल पंपावर "72 रुपये दराने पेट्रोल भरण्याची शेवटची संधी' अशी पाटी पाहून सर्वजण आपली टाकी भरून घेत. नंतर पुढच्या राज्यात हा दर 68 रुपये आहे, हे कळल्यावर खंत वाटे. "ही योजना उद्याच बंद होत आहे', असे सांगितल्यावर त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घाईघाईने कसा घेतला जातो, याचा अनुभवही अनेकांना असेलच. कोणताही बदल दिसताक्षणी त्या दडपणाखाली निर्णय घेतला जातो, हे गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रस्ताव विक्रीसाठी आणणाऱ्यांना चांगले माहीत असते आणि त्या दृष्टीने त्यांची जाहिरात ते कौशल्याने करतात. आज दृक्‌श्राव्य माध्यमे आणि इंटरनेट यांच्यामुळे अशा प्रस्तावांचा भडिमारच आपल्यावर होतो. "आपली गाडी चुकेल का?' अशा विचाराने गुंतवणूकदारही तडकाफडकी त्यावर झडप घालताना दिसतात. प्रत्येक वाहनचालकाला आपले वाहनकौशल्य उत्कृष्ट आहे, असेच वाटत असते.

प्रत्यक्षात ही वस्तुस्थिती असणे शक्‍य नाही. काही जण उत्तम, बरेचसे सरासरी आणि काही जण निकृष्ट दर्जाचे असणे स्वाभाविक आहे. गुंतवणुकीच्या बाबतीतही अशा अनाठायी आत्मविश्‍वासावर बरेच निर्णय घेतले जातात. तसेच निव्वळ आशावादावरही बरेच गुंतवणूकदार पुन्हा पुन्हा तीच कृती करून वेगळ्या परिणामांची अपेक्षा करतात. आधीच्या चुकीचे विश्‍लेषण करून बदल केल्याशिवाय हे शक्‍य नाही. पण "या वेळी परिस्थिती वेगळी आहे,' असे मानणाऱ्यांची संख्या मोठी असते. भविष्यात एकाच परिस्थितीतून अनेक वेगवेगळे परिणाम येण्याची शक्‍यता असते. प्रत्यक्ष त्यातील जो परिणाम येतो, त्याकडे पाहून बाकीच्या शक्‍यतांचा विसर पडतो आणि "मला माहीतच होते, की असे होणार आहे,' अशी धारणा करून घेतली जाते. 

गुंतवणूकदारांचे वर्तन हा गेल्या 50 वर्षांत संशोधनाचा विषय ठरला आहे. हर्ब सायमन (1978), डिनियल कॅन्हेमन (2002), रॉबर्ट शिलर (2013) व या वर्षी प्रा. रिचर्ड थॅलर (2018) हे या संबंधातील संशोधनामुळे जगात प्रतिष्ठा पावलेल्या नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 2001 मध्ये "पद्‌मविभूषण' सन्मानाने गौरविलेले जॉन केनेथ गालब्रेथ यांचेही या विषयावरचे संशोधन नावाजले गेले आहे. 

आज इंटरनेटच्या जमान्यात सर्व प्रकारच्या माहितीचा प्रसार अतिजलद वेगाने होतो. "वॉल स्ट्रीट'वरील विश्‍लेषकापर्यंत मर्यादित असणारी माहिती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्याच सेकंदाला उपलब्ध होते. कंपन्यांची अंतर्गत गोपनीय माहिती बाजारात स्वतःच्या फायद्यासाठी वापरणाऱ्यांवरची कायद्याची नजर दिवसेंदिवस अधिक सक्त आणि परिणामकारक ठरते आहे. सर्वांना माहिती एकाच वेळी मिळत असताना वॉरन बफेसारखे गुंतवणूकदार पुन्हा पुन्हा यशस्वी कसे ठरतात, याचे उत्तर त्यांची वागणूक आणि पराकोटीची शिस्त व संयम यातून मिळते. 

वैयक्तिक गुंतवणूकदारांना या संशोधनाचा निश्‍चित उपयोग आहे. एखाद्या इमारतीच्या बांधकामाचा आराखडा बनविला जातो, तसा कुटुंबाच्या आर्थिक भविष्याचा "मास्टर प्लॅन' बनविल्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय घेण्याची तर्कशुद्ध बैठक अतिशय उपयुक्त ठरते. अशा आराखड्यात वेगवेगळ्या उद्दिष्टांचा व जोखमीचा विचार केला जातो. सुयोग्य प्रमाणात जोखीम घेणेही आवश्‍यक ठरते. कोणत्याही प्रस्तावाचा विचार कागद, पेन्सिल घेऊन, त्यातील बरे-वाईट समजावून घेऊन व किमान 24 तास "थंड'पणे जाऊ देऊन केल्यास डोळसपणाने होतो. सामाजिक, सरकारी पातळीवर आर्थिक निर्णय घेताना, त्यातील मते अजमावताना त्यांचा संदर्भ बदलल्याने अधिक तत्त्वनिष्ठता आणता येते, असे प्रा. रिचर्ड थॅलर यांनी दाखवून दिले आहे. उदाहरणार्थ, एखाद्या सरकारी योजनेत सहभागी व्हायचे काय, असा पर्याय देण्याऐवजी त्यातून बाहेर पडायचे काय, असा विकल्प दिला तर वेगळी उत्तरे येऊ शकतात. वर्तणूकशास्त्रातील संशोधनाची जोड दिल्यामुळे सर्वच पातळ्यांवरील निर्णय अधिक परिणामकारक होत आहेत आणि अनेक देशांमध्ये धोरण ठरविताना याची दखल घेतली जात आहे, हे प्रा. थॅलर यांचे मोठे यश आहे.

Web Title: Bharat Phatak writes about investment