'जिओ'मुळे एअरटेलला पुन्हा मोठा धक्का

वृत्तसंस्था
Thursday, 1 August 2019

दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी भारती एअरटेलने जूनअखेर 2,866 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे

 मुंबई: दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी भारती एअरटेलने जूनअखेर 2,866 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीला 97 कोटींचा नफा झाला होता. 'जिओ'बरोबरच्या स्पर्धेचा फटका बसून कंपनीच्या तोट्यात वाढ झाली आहे. याआधी मात्र भारती एअरटेलची उपकंपनी असणाऱ्या भारती इन्फ्राटेलने 887 कोटींचा दणदणीत नफा नोंदवला आहे. 

एअरटेलचा महसूल मात्र 4.7 टक्क्यांनी वाढून 20,738 कोटी रुपयांवर पोचला आहे. कंपनीचा वायरलेस व्यवसाय 4.1 टक्क्यांनी वाढून 10,724 कोटी रुपयांवर पोचला आहे. प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने जूनअखेर 11,679 कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. शिवाय गेल्या आठवड्यात व्होडाफोन आयडियाला मागे टाकत जिओ देशातील नंबर वन दूरसंचार कंपनी बनली आहे. व्होडाफोन आयडियाने 11,269.9 कोटींचा महसूल नोंदवला आहे. 

भारती एअरटेलचा शेअर आज मुंबई शेअर बाजारात  12.60 रुपयांच्या घसरणीसह 325 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharti Airtel reports loss of Rs 2866 crore in Q1FY20