Video: मंदीत पहा संधी

भूषण गोडबोले 
Monday, 2 March 2020

भारतीय शेअर बाजार आधीच आर्थिक वादळाने ग्रस्त आहे. आता कोरोनामुळे जागतीक बाजारातील घसरणी पाठोपाठ भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण बघायला मिळाली. मात्र अशा मंदीच्या परिस्थिती शांत राहून संधी नक्की शोधता येईल.

टप्याटप्याने करा गुंतवणूक 
यशस्वी गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांच्या गुंतवणूक तंत्राचा अभ्यास केला तर मंदीत देखील संधी शोधण्याचे तंत्र नक्की सापडेल.  जेव्हा बाजाराचे मुल्याकंन (व्हॅल्युएशन) महाग असते तेव्हा बफे बाजारात कमी गुंतवूणक करतात आणि जेव्हा मंदीमुळे बाजाराचे 'व्हॅल्युएशन' स्वस्त होते तेव्हा गुंतवणूक वाढवतात. तसेच मंदी आल्यास दीर्घकालावधीसाठी (लॉंग टर्म) टप्याटप्याने गुंतवणूक केल्याने मंदीनंतर जेव्हा बाजारात पुन्हा तेजी येते वॉरेन बफे यांना केलेल्या गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी हेच तंत्र अवलंबून मंदीत संधी शोधली पाहिजे. 'इंडेक्स फंडा'त लॉंग टर्मसाठी टप्याटप्याने गुंतवणूक केल्यास उत्तम परतावा मिळेल. बाजारात पडझड होऊन देखील 'निफ्टी प्राईस टू अर्निंग रेशो (पीई) नुसार महागच आहे.  यामुळे एकदम मोठ्या प्रमाणात खरेदी न करता बाजाराचे मुल्याकंन बघून गुंतवणूक करणे योग्य ठरेल. गुंतवणूकदारांनी गोदरेज कंझ्यूमर ,ब्रिटानिया ,कोलगेट अशा कंपन्यांचा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विचार करायला हरकत नाही. 

 गुंतवणुकीच्या इतर साधनांमध्ये संधी 
सर्वच गुंतवणूक शेअर बाजारात करणे हे सामान्य गुंतवणूकदारांसाठी धोकादायक ठरू शकते.  यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीवबरोबरच रक्कम सुरक्षित समजल्या जाणाऱ्या रोखे बाजारात तसेच काही रक्कम सोन्यामध्ये टप्याटप्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. परिणामी एका ठिकाणी मोठी पडझड झाली आणि दुसऱ्या ठिकाणी वाढ झाली किंवा तुलनेने कमी पडझड झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही. भविष्यात तेजी आल्यास चांगला नफा देखील मिळविता येतो. गुंतवणूक करताना 'डायव्हर्सिफिकेशन' केल्यास मोठ्या मंदीत देखील तुमची गुंतवणुक आनंदाने वाटचाल करेल. सद्यपरिस्थितीत लक्षात येईल की, एकीकडे शेअर बाजार कोसळतोय तर सोन्याचे भाव वाढता आहेत. एकूणच मंदी असताना घाबरून जाऊन व्यवहार न करता बफेंप्रमाणे टप्याटप्याने गुंतवणूक करावी. बाजाराचे व्हॅल्युएशन आणि 'डायव्हर्सिफिकेशन' केले तर मंदीत देखील खूप संधी आहेत. 

(सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhushan godbole article Opportunity to see in recession