ही वेळ पण निघून जाईल...

भूषण गोडबोले
Monday, 20 April 2020

शेअर बाजारात 'ट्रेंड' आणि 'व्हॅल्यूएशन' बघून व्यवहार करणे गरजेचे आहे.शेअर बाजार वधारला तरी फायदा मिळू शकेल.बाजार खाली आल्यास दिर्घकाळासाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स गेल्या आठवड्यात 31 हजार 588 अंशांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 9 हजार 266 अंशांवर बंद झाला. वर्षाच्या सुरुवातीला 20 जानेवारी 2020 रोजी निफ्टीने 12 हजार 430 अंशांची उच्चांकी पातळी गाठल्यानंतर निफ्टीने 24 मार्चपर्यंत 7 हजार 511 अंशांचा तळ गाठला. म्हणजेच दोन महिन्यात निफ्टी 39 टक्क्यांनी कोसळला. मात्र तो 7 हजार 511 या नीचांकी पातळीपासून निफ्टी पुन्हा 9 हजार 266 पर्यंत निफ्टीने 'बाउन्स बॅक' केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'ट्रेंड' ओळखा 
 निफ्टीने 'बाउन्स बॅक' म्हणजे जोरदार उसळी घेतली असली तरी 'टेक्निकल चार्ट'नुसार असा 'बाउन्स बॅक' म्हणजे तेजीचे संकेत नव्हे. एखादा चेंडू दहाव्या मजल्यावरून खाली पडल्यावर जसा खालून दुसऱ्या ते तिसऱ्या मजल्यापर्यंत उसळी घेतो. तसेच निफ्टी दर्शवित आहे. बाजारात खूप पडझड झाल्यावर सध्याची तेजी ही केवळ एक उसळी आहे. चार्टनुसार, निफ्टी जोपर्यंत 8 हजार 821 अंशांच्या वर आहे तोपर्यंत आणखी उसळी दर्शवू शकतो. मात्र, आगामी कालावधी साठी निफ्टीची 7 हजार 511 ही महत्वाची आधार पातळी आहे. चार्टनुसार मार्केटने पुन्हा मंदीचा कल दर्शवून 7 हजार 511 अंशांची पातळी तोडल्यास निफ्टी 5 हजार अंशांपर्यंत खाली येऊ शकतो. अर्थात हा केवळ एक  अंदाज आहे .यामुळेच 'ट्रेडिंग' करताना अंदाज बांधून 'ट्रेड' न करता सध्याचा 'ट्रेंड' पाहून व्यवहार करणे योग्य. मात्र प्रत्येकवेळी 'स्टॉप लॉस' लावणे आवश्यक आहे.

बाजारात 'ट्रेडिंग'असो वा दीर्घकालीन गुंतवणूक बाजाराचे मुल्याकंन (व्हॅल्युएशन) बघणे महत्वाचे आहे. 

'पीई'चे गणित समजूम घ्या 
शेअरची किंमत आणि त्या कंपनीच्या उत्पादनाचा जवळचा संबंध असतो. थोडक्यात 'प्राइस' आणि 'अर्निंग'चे चक्र आहे. सध्या निफ्टीचा 'प्राइस-अर्निंग रेशो' (पीई) 20 आहे. बाजाराचे मुल्याकंन मध्यम आहे. मात्र इथे 'पीई'चे गणित  करताना कंपन्यांचे उत्पादन मागील कालावधीमधील पकडण्यात येते तसेच आगामी कालावधीमध्ये निफ्टीतील कंपन्या पूर्वीच्या गतीने उत्पादन करतील या अंदाजाने सद्य परिस्थितील बाजाराचे मुल्याकंन स्वस्त आहे का महाग हा अंदाज घेतला जातो. इथे मात्र एक महत्वाची बाब लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे, लॉकडाउनमुळे अनेक कंपन्यांचे उत्पादन थांबले आहे. यामुळे आगामी काळात कंपन्यांचे उत्पादन आणि कमाई घटणार आहे. यामुळे जिथे बाजार मध्यम मूल्यांकनाला वाटत आहे तिथे तो महाग असणार आहे. उदा. शेअरची किंमत 200 रुपये आणि प्रतिशेअर उत्पन्न 10 गृहीत धरल्यास 'पीई' 20 येतो. मात्र भविष्यात कंपनीचे उत्पादन आणि उत्पन्न कमी होऊन प्रतिशेअर उत्पन्न होणार असल्यास 200 रुपये भागिले 5 केल्यास मिळणारा 'पीई' 40 येणार आहे. म्हणजे  शेअरचा 'पीई' 20 समजून बाजार जिथे योग्य 'व्हॅल्युएशन'ला वाटत होता तिथे पुढील कालावधीमधील उत्पादनातील घसरण लक्षात घेता बाजार खूप महाग असल्याचे दिसते आहे. लॉकडाउननंतर आघाडीच्या कंपन्यांची उत्पादन चक्रे पुन्हा सुरू झाल्यावर कंपन्यांचे उत्पन्न पुन्हा वाढणार असल्याने बाजार आकर्षक 'व्हॅल्यूएशन'ला असेल. लॉकडाउनचा कठीण काळ लवकरच निघून जाईल. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक उपाययोजना करत आहेत. एखाद्याचा मोठा अपघात झाल्यावर उपचारानंतर पूर्ववत होण्यास वेळ लागतो त्याचप्रमाणे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागू शकेल. 

एक वाक्य जे चांगल्या काळात ऐकल्यास माणूस सावध होतो तर कठीण काळात ऐकल्यास दिलासा मिळतो. ते वाक्य म्हणजे 'ही वेळ पण निघून जाईल'. सकारत्मकता ठेवून मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. शेअर बाजारात 'ट्रेंड' आणि 'व्हॅल्यूएशन' बघून व्यवहार करणे गरजेचे आहे. 

सध्या नेस्ले, ब्रिटानिया, मॅरिको ,हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुतंवणूक करणे योग्य ठरू शकेल. शेअर बाजार वधारला तरी फायदा मिळू शकेल. तसेच बाजार खाली आल्यास दिर्घकाळासाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhushan godbole article share market