पैशांचे योग्यरित्या नियोजन करूनच ‘हॅपी ट्रेडिंग, हॅपी इन्व्हेस्टिंग’

पैशांचे योग्यरित्या नियोजन करूनच ‘हॅपी ट्रेडिंग, हॅपी इन्व्हेस्टिंग’

जानेवारी २०२० च्या सुरुवातीला ‘सेन्सेक्स’ ४१,३४९ अंशांवर होता, तर वर्षअखेरीस ४७,००० अंशांच्या समीप पोचला आहे. कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात ‘सेन्सेक्स’ने २५,६३८ अंशांपर्यंत घसरण दाखविली. यानंतर सर्वांना ‘सरप्राईज’ देत ‘व्ही शेप’ रिकव्हरी करीत ‘सेन्सेक्स’ने वर्षअखेरीस नव्या उच्चांकाला गवसणी घातली. 

एकाच वर्षात मोठ्या प्रमाणात पडझड आणि लगेच जोरदार तेजी, अशी ‘बुल अँड बेअर’ दोन्ही रूपे बाजाराने दाखविली. वर्षभरात निर्देशांकाने जवळपास १२ टक्के वाढ दाखवली आहे. कोरोना विषाणूसारख्या संसर्गजन्य साथीच्या काळात २०१५ पासून रेंगाळलेल्या फार्मा सेक्टरने उत्तम तेजी दर्शविली. विविध उद्योगांनी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर जोर दिल्याने आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी देखील मोठ्या प्रमाणात वाढ दर्शवीत चांगला परतावा दिला आहे. 

बॅंकिंग क्षेत्रात कमी परतावा ‘सेन्सेक्स’ तसेच ‘निफ्टी’च्या वाढीचा 
विचार करता, बँक क्षेत्रातील कंपन्यांनी निर्देशांकापेक्षा कमी परतावा दिल्याचे दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाउनमुळे टुरिझम  अँड ट्रॅव्हल, हॉटेल, मल्टीप्लेक्स, एअरलाइन इंडस्ट्रीतील कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाल्याने या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. लॉकडाउननंतर बाजाराने मंदीतून सावरून नवा उच्चांक गाठला असला, तरी या लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झालेल्या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर मात्र निर्देशांकापेक्षा कमी परतावा देताना दिसत आहेत. वर्षाखेरीस एकीकडे कोरोनावरील लस येण्याच्या सुखद बातम्या येत असताना, दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीचे वातावरणही आहे. 

मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये तेजीचे संकेत
पुढील वर्षासाठी विचार करता, ‘सेन्सेक्स’ची ३६,४९६, तर ‘निफ्टी’ची १०,७९० ही महत्त्वाची आधार पातळी आहे. दीर्घावधीच्या आलेखानुसार, फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी), आयटी, मल्टी नॅशनल कंपन्यांच्या (एमएनसी) क्षेत्राचा निर्देशांक तेजीचा कल दाखवत आहे. बाजाराचे महाग व्हॅल्युएशन आणि विविध क्षेत्राच्या निर्देशांकाच्या आलेखाची सांगड घालता, दीर्घावधीसाठी आयटी क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(टीसीएस), एल अँड टी इन्फोटेक, तसेच एफएमसीजी आणि एमएनसी कंपन्यांचा विचार करता, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले, ब्रिटानिया, कोलगेट पामोलिव्ह इंडिया आदी शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी टप्प्याटप्प्याने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकेल. 

हिंदुस्थान युनिलिव्हर, ‘सिप्ला’कडे लक्ष
मध्यम अवधीचा विचार करता, हिंदुस्थान युनिलिव्हर व सिप्ला हे शेअर तेजीचे संकेत  देत आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीच्या शेअरने मागील आठवड्यात २३९१ या 
अडथळा पातळीच्या वर रु. २४०२ बंद भाव देऊन आलेखानुसार मध्यम अवधीसाठी देखील तेजीचे संकेत दिले आहेत. या शेअरचा भाव रु. २२६४ या ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे,  तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये आणखी भाव मिळणे अपेक्षित आहे. तसेच, सिप्ला या कंपनीच्या शेअरचा भाव रु. ७०० या ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये भाववाढ होणे अपेक्षित आहे. 

‘इमर्जन्सी फंडा’नंतरच शेअर बाजार
सरणाऱ्या वर्षात कोरोनाच्या साथीमुळे आलेले अनुभव लक्षात ठेवून ‘इमर्जन्सी फंड’ किंवा ‘कॉन्टेंजन्सी फंड’ अर्थात कठीण काळासाठी काही रक्कम बाजूला ठेवल्यानंतरच, शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीचा विचार करणे योग्य ठरणार आहे. शेअर बाजारात फंडामेंटली सक्षम कंपन्यांच्या शेअरबरोबर कठीणसमयी वाढ दर्शविणाऱ्या सोन्यातदेखील टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. कारण ‘जान है तो जहान है!’ 

आणखी बातम्या व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

अशा प्रकारे नवीन वर्षाचे स्वागत करताना, पैशांचे योग्यरित्या नियोजन करूनच ‘हॅपी ट्रेडिंग, हॅपी इन्व्हेस्टिंग’ म्हणणे योग्य ठरू शकेल.

वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे .

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com