झाले मोकळे आकाश... 

भूषण गोडबोले
Monday, 14 September 2020

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे, त्यामुळे व्यवहार करताना बाजारातील जोखीम ओळखून तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. 

गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचा निर्देशांक "सेन्सेक्‍स' 38,854 अंशांवर, तर "निफ्टी' 11,464 अंशांवर बंद झाला. शेअर बाजारात यशस्वी ट्रेडिंग करण्यासाठी आलेखानुसार सक्षम तेजी दर्शविणाऱ्या शेअरची निवड करणे आवश्‍यक असते, हे मी मागच्या वेळी सांगितले होते. एखाद्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यास, घसरण होण्यापूर्वीवरच्या भावपातळीला खरेदी केल्यामुळे अनेक ट्रेडर त्या शेअरमध्ये अडकून पडतात. जे ट्रेडर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून "स्टॉपलॉस' तंत्राचा वापर करतात, ते अशा पडणाऱ्या शेअरमधून "स्टॉपलॉस' ठेवल्यामुळे योग्य वेळेस बाहेर पडतात. मात्र, "स्टॉपलॉस' न ठेवल्याने अनेकांचे मोठे नुकसान होते. यानंतर त्या शेअरमध्ये मोठी घट झालेली पाहिल्यामुळे वरच्या विविध पातळीला अडकलेले लोक पुन्हा तो शेअर वर येण्याची वाट बघत असतात. अशा अडकलेल्या शेअरमध्ये पुन्हा घेतलेल्या भावापर्यंत वाढ झाली, की विकून टाकायचा आणि त्या शेअरमधून सुटकेचा श्वास घ्यायचा, असा निर्धार केला जातो. काही जण त्याच पडणाऱ्या शेअरमध्ये खरेदी करून "ऍव्हरेजिंग'चे धोरण आखतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेअरशी पंगा नको रे बाबा! 
शॉर्ट टर्म किंवा मिडीयम टर्म ट्रेडिंग करण्यासाठी आलेले लोक शेअरभाव वर येईपर्यंत दीर्घकाळ थांबण्याची तयारी ठेवतात. पडझड होत असताना पुनःपुन्हा त्याच शेअरमध्ये खरेदी करणारे लोक जणू पैसे कमवणार तर याच शेअरमधून, अशी जणू शपथच घेतात. काही जण तर "दाखवतोच या शेअरला' म्हणून त्याच पडणाऱ्या शेअरमध्ये पुन्हा खरेदी करीत राहतात. अशा प्रकारचे "ट्रेडिंग' व्यावसायिकऐवजी भावनाप्रधान होऊन केले जाते. तसेच एकाच शेअरमध्ये भांडवल गुंतवत गेल्याने धोका वाढतो आणि भांडवलाचे नियोजनदेखील गडबडते. यानंतर अशा पडणाऱ्या शेअरमध्ये कालांतराने वाढ झाल्यास ठीक; मात्र आणखी पडझड होऊन शेअर रेंगाळत राहिल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

निर्णय चुकतात कारण... 
मोठ्या प्रमाणात पडझड झाल्यावर पुन्हा शेअरवाढ दर्शवून घेतलेल्या भावाला आला, की जे लोक वरच्या पातळीला विकत घेऊन अडकलेले असतात, ते असा शेअर विकून टाकतात. यानंतर शेअरमध्ये आणखी वाढ होते आणि हेच लोक म्हणतात, "मी घेतला की शेअर पडतो आणि मी विकला की वाढतो.' याचमुळे "ट्रेडिंग' करताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणे आवश्‍यक असते. तेजीचा शेअर निवडल्यानंतर निर्णय चुकू शकतो, हे लक्षात घेऊन "स्टॉपलॉस' ठेवणे आवश्‍यक असते. काही वेळेस "स्टॉपलॉस' ट्रिगर झाल्यावरही शेअर पुन्हा वाढतो, अशा वेळेस शेअरचा कल सक्षम असेल, तर पुन्हा "स्टॉपलॉस' ठेवून खरेदी करणे योग्य ठरते. पूर्वी वरच्या भावात खरेदी करून अडकलेले लोक विकून बाहेर पडण्यासाठी पुन्हा तोच भाव येण्याची वाट बघत असतात. पडझड झाल्यावर शेअर पुन्हा वर आल्यानंतर त्या शेअरमधून बाहेर पडण्यासाठी पूर्वी अडकलेल्या लोकांनी केलेल्या विक्रीमुळे शेअरला वर जाताना अडथळा येणे अपेक्षित असते. मात्र, अशा प्रकारचा अडथळा ओलांडून शेअर वर जातो, तेव्हा आणखी तेजीचे संकेत देतो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"ओपन ब्ल्यू स्काय' 
शेअरचा भाव वर जात असताना किंवा शेअर तेजीचा कल दर्शवत असताना शेअरच्या वाटेत अशा प्रकारचा कोणताही अडथळा नसेल आणि शेअरभाव नवे उच्चांक नोंदवत असेल तर अशा वेळेस हा शेअर "ओपन ब्ल्यू स्काय' म्हणजेच मोकळ्या आकाशात झेप घ्यायला तयार असतो. सद्यःस्थितीमध्ये कोफोर्ज (पूर्वीची एनआयटी टेक), एसबीआय कार्डस (स्टेट बॅंक ऑफ इंडिया कार्डस), ज्युबिलंट फूड्‌स आदी कंपन्यांच्या शेअरने "ओपन ब्ल्यू स्काय'मध्ये प्रवेश केला आहे. "कोफोर्ज' या शेअरचा भाव जोपर्यंत 1879 या "स्टॉपलॉस' पातळीच्या वर आहे, तोपर्यंत आणखी तेजी दर्शवू शकतो. आगामी कालावधीमध्ये निर्देशांकाने; तसेच "ओपन ब्ल्यू स्काय'मध्ये प्रवेश केलेल्या शेअरने देखील तेजी दर्शविल्यास "ट्रेडर्स'नी अशा शेअरमध्ये "स्टॉपलॉस' ठेवून तेजीचा व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकेल. मात्र, मोकळ्या आकाशात प्रवेश केलेले शेअर कधीही कोसळू शकतात. यामुळे "ट्रेडिंग' करताना "स्टॉपलॉस'चे पॅराशूट वापरणे अत्यंत आवश्‍यक आहे. बाजाराचे "व्हॅल्युएशन' महाग असल्याने तेजीचा व्यवहार करताना मर्यादितच भांडवल गुंतविणे योग्य ठरेल. 

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे, त्यामुळे व्यवहार करताना बाजारातील जोखीम ओळखून तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. 

(लेखक "सेबी' रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhushan godbole writes article about share market