शेअर मार्केट : मंदीतच शोधा संधी!

share market
share market

कोरोनाबाधित रुग्णांचे वाढते प्रमाण, अमेरिका-सीरियामधील तणाव, अमेरिकी रोख्यांवरील वाढते व्याज आदी अनेक कारणांमुळे गेल्या आठवड्यात शुक्रवारी एकाच दिवशी १९३९ अंशांची पडझड करीत ‘सेन्सेक्स’ ४९,०९९ अंशांवर, तर ५६८ अंशांची घसरण दर्शवत ‘निफ्टी’ १४,५२९ अंशांवर बंद झाला. एकीकडे तिसऱ्या तिमाहीतील एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) आकडेवारीने सकारात्मक उडी मारली आहे, तर दुसरीकडे शेअर बाजाराने डुबकी मारल्याचे चित्र समोर आले आहे.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात पडझड होऊनदेखील किंमत आणि कंपन्यांच्या मिळकतीचा विचार करता, ‘फंडामेंटल्स’नुसार बाजार महागच आहे. आलेखानुसार, आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ४६,१६० अंश, तर ‘निफ्टी’साठी १३,५९६ अंश ही महत्त्वाची आधार पातळी आहे. ‘निफ्टी’ने १४,६३५ या पातळीच्या खाली बंद भाव देत ‘करेक्शन’ अर्थात विश्राम दर्शविला आहे. अशा मोठ्या पडझडीच्या काळात खरेदीची चांगली संधी मिळून जाऊ शकते. 

‘ट्रेडिंग’साठी ‘ब्लू स्टार’कडे लक्ष
गेल्या आठवड्यात पडझड करणाऱ्या बाजारात देखील ‘टाटा कॉफी’, ‘सिम्फनी’; तसेच ‘ब्लू स्टार’ आदी कंपन्यांच्या शेअरने आलेखानुसार तेजीचे संकेत देत उत्तम भाववाढ दर्शविली आहे. ‘ब्लू स्टार’ ही कंपनी प्रामुख्याने वातानुकूलन यंत्रणा, व्यावसायिक रेफ्रिजरेशन युनिट्स, वॉटर अँड एअर प्युरिफायर आणि एअर कूलरचे उत्पादन या व्यवसायात कार्यरत आहे. फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या मॉड्यूलर कोल्ड रूम, मेडिकल फ्रीझर, अल्ट्रा-लो-तापमान फ्रीझर, फार्मा रेफ्रिजरेटर आणि ब्लड बँक रेफ्रिजरेटर या सारख्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये ‘ब्ल्यू स्टार’चा बाजारात सुमारे ७० टक्के वाटा आहे. थोडक्यात, कुलिंग प्रॉडक्ट्स निर्माता ‘ब्लू स्टार’ला येत्या तीन वर्षांत व्यावसायिक रेफ्रिजरेशन सेगमेंटमधील विक्री दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. कोरोनाच्या महासाथीनंतर कंपनीच्या या विभागातील उत्पादनांना मागणी वाढत आहे. फेब्रुवारी २१ मध्ये कंपनीने आपल्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे आणि लस साठवण्यासाठी आदर्श असलेल्या आईस लाइन रेफ्रिजरेटर आणि व्हॅक्सिन ट्रान्स्पोर्टर सादर केले आहेत. डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत आपल्या व्यवसायात वृद्धी दर्शवत कंपनीने ३७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. आलेखानुसार, डिसेंबर २०२० पासून रु. ८५९ ते ७०० या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात रु. ८७० ला बंद भाव दिला आहे. या कंपनीच्या शेअरचा भाव जोपर्यंत ७०० रु. या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत अल्पावधीच्या; तसेच मध्यम अवधीच्या आलेखानुसार तेजीचा कल दिसत आहे. आगामी काळात रु. ८८७ या पातळीच्या वर बंदभाव दिल्यास या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात भाववाढ होऊ शकते.

दीर्घावधीसाठी ‘आयआरसीटीसी’
मागील लेखांमध्ये नमूद केलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि. अर्थात ‘आयआरसीटीसी’ या कंपनीच्या शेअरने उत्तम भाववाढ दाखविली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बातमीनुसार, आता ‘आयआरसीटीसी’ने ग्राहकांना बस तिकीट सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी ‘अभिबस’ या ऑनलाइन ई-तिकीट मंचाने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनशी भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीअंतर्गत, ‘आयआरसीटीसी’ एक लाख बस मार्गांवर बसयादी मिळविण्यासाठी सक्षम असेल. तसेच, ‘आयआरसीटीसी’च्या ग्राहकांना किंवा वापरकर्त्यांना वातानुकूलित किंवा विना वातानुकूलित बस तिकिटे बुक करण्याचा पर्याय मिळणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर कंपनी व्यवसाय सुधारून वृद्धी दर्शविणे अपेक्षित आहे. उत्तम ‘रिटर्न ऑन  इन्व्हेस्टेड कॅपिटल मिळवीत असलेल्या अशा कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीसाठी मर्यादित गुंतवणुकीचा विचार करणे फायदेशीर ठरू शकते. 

जेव्हा जंगलात आग लागते, तेव्हा सुक्याबरोबर ओलेही जळते. त्याचप्रमाणे बाजाराच्या पडझडीत ‘फंडामेंटली’ सक्षम असणाऱ्या कंपन्यांचे शेअरदेखील घसरण दाखवत असतात. अशा वेळेस बाजाराचे मूल्यांकन लक्षात घेऊन टप्प्याटप्याने गुंतवणुकीच्या संधीचा फायदा घेता येतो. कारण शेवटी बाजाराच्या पडझडीत किंवा ‘मंदीतच संधी’ शोधायची असते!

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com