‘अगर... अच्छे दिन आनेवाले है तो...’

अर्थ मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, सलग सहा महिने जीएसटी संकलन सुमारे १.३० लाख कोटींच्या वर असल्याचे लक्षात येत आहे
Bhushan Godbole writes investment in share market BSE SENSEX NIFTY 50
Bhushan Godbole writes investment in share market BSE SENSEX NIFTY 50sakal

गेल्या आठवड्यात शुक्रवारी ७०८ अंशांची तेजी दर्शवत ‘सेन्सेक्स’ ५९,२७६ अंशांवर, तर ‘निफ्टी’ २०५ अंशांच्या तेजीसह १७,६७० अंशांवर बंद झाला होता. वस्तू व सेवाकर (जीएसटी) संकलनाने गेल्या आर्थिक वर्षाअखेर मार्च महिन्यात रु. १.४२ लाख कोटींचा विक्रमी आकडा गाठला आहे. अर्थ मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, सलग सहा महिने जीएसटी संकलन सुमारे १.३० लाख कोटींच्या वर असल्याचे लक्षात येत आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारात खरेदी केल्याची आकडेवारी समोर येत आहे. आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ५२,२६० अंश ही महत्त्वाची आधार पातळी आहे. सध्या भू-राजकीय समस्यांमुळे अनेक क्षेत्रातील कंपन्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा कठीण वेळ निघून गेल्यावर जर ‘अच्छे दिन आनेवाले है,’ असा विचार केला तर सध्याच्या समस्यांमुळे घसरण केलेल्या, मात्र दीर्घावधीमध्ये व्यवसायवृद्धीची क्षमता असणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुकीची संधी मिळत आहे.

एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज (शुक्रवारचा बंद भाव : रु. १११७)

एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज ही कंपनी भारतातील आणि परदेशातील वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांसाठी साह्यकारी घटक पुरवठा करणारी एक प्रमुख कंपनी आहे. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीमध्ये हिरो मोटोकॉर्प, रॉयल एनफिल्ड, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर्स, टाटा मोटर्स आणि इतर अनेकांचा समावेश आहे. त्यांच्या परदेशातील क्लायंटमध्ये फोक्सवॅगन, फियाट क्रिस्लर, केटीएम आदी कंपन्यांचा समावेश होतो. एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज ही कंपनी ॲल्युमिनियम डाय कास्टिंग, सस्पेंशन, ट्रान्समिशन आणि ब्रेकिंग उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. ‘एन्ड्युरन्स’कडे एकूण २७ उत्पादन सुविधा आहेत. त्यापैकी साधारण १८ भारतात आणि ६ इटली आणि ३ जर्मनीमध्ये आहेत. कंपनी अंदाजे ७२ टक्के महसूल भारतातून आणि उर्वरित २८ टक्के महसूल परदेशातून मिळवत आहे. सध्या जागतिक पातळीवरील निर्माण झालेल्या पुरवठा साखळीतील समस्या, सेमी कंडक्टरच्या पुरवठ्यामध्ये निर्माण झालेली कमतरता आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आदी अनेक कारणांमुळे वाहननिर्मिती क्षेत्राशी निगडित कंपन्यांच्या उत्पादन, तसेच विक्रीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. जागतिक पातळीवरील निर्माण झालेले पुरवठा साखळीतील समस्यांचे संकट दूर झाल्यावर वाहननिर्मिती क्षेत्रात येणारे ‘अच्छे दिन’ लक्षात घेता, या क्षेत्राशी निगडित एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या शेअरचा गुंतवणूकदारांनी दीर्घावधीच्यादृष्टीने जरूर विचार करावा.

केईआय इंडस्ट्रीजकडे लक्ष (शुक्रवारचा बंद भाव : रु. १२४८)

केईआय इंडस्ट्रीज ही कंपनी पॉवर केबलचे उत्पादन आणि वितरणाचा व्यवसाय करते. कंपनीची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात लक्षणीय उपस्थिती आहे. ही कंपनी एक्स्ट्रा-हाय व्होल्टेज (ईएचव्ही), मीडियम व्होल्टेज आणि लो व्होल्टेज पॉवर केबल बनवते. कंपनी किरकोळ आणि संस्थात्मक दोन्ही विभागांना सेवा देत आहे. कंपनीचे ५००० चॅनेल पार्टनर, ३८ शाखा कार्यालये, २२ डेपो आणि २१ गोदामे आहेत. कंपनीच्या किरकोळ विभागाचे भारतभर १६५० वितरण भागीदार आहेत. कर्जाचे प्रमाण अत्यल्प ठेऊन व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर उत्तम परतावा मिळवत कंपनी व्यवसायवृद्धी करीत आहे. गेल्या तीन आठवड्यांत कंपनीच्या शेअरमधील उलाढाल लक्षणीय वाढ दर्शवत आहे. आगामी काळात रु. १२७७ या पातळीच्या वर शेअरने बंद भाव दिल्यास मध्यम अवधीमध्ये हा शेअर आणखी तेजी दर्शवू शकतो. दीर्घावधीच्या दृष्टीने देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मर्यादित भांडवलावर मर्यादित धोका स्वीकारून गुंतवणूक केल्यास दीर्घावधीमध्ये उत्तम फायदा मिळू शकेल.वरील माहिती अभ्यासाच्या, तसेच शैक्षणिक दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com