‘बॉटम फिशिंग’ करावे का?

अनेक कंपन्यांच्या शेअरनी पूर्वी नोंदविलेल्या उच्चांकी पातळीपासून ३० ते ४० टक्के देखील पडझड केली आहे. बाजाराने आता तळ तयार केला असून, मोठ्या प्रमाणात खरेदी करून ‘बॉटम फिशिंग’ करावे का, असे वाटू शकते.
Bhushan godbole writes share market hoilding position of investment bottom fishing
Bhushan godbole writes share market hoilding position of investment bottom fishingsakal

अनेक कंपन्यांच्या शेअरनी पूर्वी नोंदविलेल्या उच्चांकी पातळीपासून ३० ते ४० टक्के देखील पडझड केली आहे. बाजाराने आता तळ तयार केला असून, मोठ्या प्रमाणात खरेदी करून ‘बॉटम फिशिंग’ करावे का, असे वाटू शकते.

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५२,९०७ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १५,७५२ अंशांवर बंद झाले. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, देशातील वस्तू व सेवाकर (जीएसटी) संकलनाने जून महिन्यात रु. १.४५ लाख कोटींचा टप्पा गाठला आहे. अर्थचक्र गतिमान होऊन ग्राहकांकडून मागणीत वाढ होत असल्याचे हे निर्देशन करीत आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या शुक्रवारी केंद्र सरकारने सोन्यावरील आयातशुल्कात थेट ५ टक्के वाढ केल्याने सोन्यावरील एकूण आयातशुल्क १५ टक्क्यांवर पोचला आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये ‘सेन्सेक्स’ने ६२,२४५ अंशांचा, तसेच ‘निफ्टी’ने १८,६०४ अंशांचा उच्चांक नोंदविला होता. गेल्या नऊ महिन्यांत निर्देशांकाने सुमारे १८ टक्के घसरण दर्शविली आहे. या काळात अनेक कंपन्यांच्या शेअरनी पूर्वी नोंदविलेल्या उच्चांकी पातळीपासून ३० ते ४० टक्के देखील पडझड केली आहे. बाजाराने आता तळ तयार केला असून, मोठ्या प्रमाणात खरेदी करून ‘बॉटम फिशिंग’ करावे का, असे वाटू शकते.

मध्यम अवधीसाठी किमान सहा महिन्यांसाठी ‘ट्रेडिंग’च्या दृष्टीने तेजीचे व्यवहार करताना आलेखानुसार सक्षम तेजीचे संकेत मिळाल्यावर ‘स्टॉपलॉस’ तंत्राचा वापर करून मर्यादित धोका स्वीकारणे योग्य ठरते. सध्या उच्चांकापासून निर्देशांकांने १८ टक्के घसरण दर्शविली असली तरी मध्यम अवधीच्या आलेखानुसार, निर्देशांक ‘लोअर टॉप लोअर बॉटम’ म्हणजेच उतरणाऱ्या जिन्यासारखी नकारात्मक रचना दर्शवत आहे. निर्देशांकात घसरण झाली असली तरी बॉटम म्हणजेच तळ तयार झाल्याचे आलेखानुसार अद्यापही संकेत मिळालेले नाहीत. यामुळे जोपर्यंत आलेखानुसार सक्षम तेजीचे संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत मध्यम अवधीसाठी ट्रेडर्सनी गडबड करून मोठ्या प्रमाणात तेजीचे व्यवहार करू नयेत. कारण ‘दुर्घटनासे देर भली.’ कल नकारात्मक असताना पूर्वीपेक्षा स्वस्त झालेल्या शेअरचा भाव आणखी स्वस्त होऊ शकतो. यामुळे कल नकारात्मक असताना नकारात्मक कल दर्शविणाऱ्या शेअरमध्ये ‘बॉटम फिशिंग’चा मोह टाळणे योग्य.

दीर्घावधीसाठी गुंतवणूक करताना मात्र बाजारातील पडझड ही गुंतवणुकीची संधीच असते. त्यामुळे निर्देशांकामध्ये उच्चांकापासून १८ टक्के पडझड झाली असताना किमान ३ ते ५ वर्षांच्या दृष्टीने ‘बॉटम फिशिंग’ करावे का?

केवळ खूप पडझड झाली आहे म्हणून कोणत्याही कंपन्यांच्या शेअरमध्ये ‘बॉटम फिशिंग’ म्हणून खरेदी करणे धोकादायक असते. ज्या कंपनीचा शेअरची दीर्घावधीच्या दृष्टीने निवड केली आहे, त्या कंपनीच्या व्यवसायाची माहिती असणे आवश्यक आहे. कंपनीची दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची संधी लक्षात घेऊन, शेअर बाजारात मूल्यांकनाच्या तुलनेत संबंधित कंपनीच्या शेअरचा भाव मुबलक ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’सह स्वस्त भावात मिळत असल्यास गुंतवणुकीची संधी असते. शेअर बाजार भावनाप्रधान असल्याने उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मूल्यांकनाच्या तुलनेत ज्या वेळेस घसरण होते, त्या वेळेस संयम ठेऊन जोखीम लक्षात घेत, ‘फिशिंग’ किंवा खरेदीचे धोरण स्वीकारणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, अशा प्रकारे अभ्यासपूर्ण खरेदी केल्यानंतर सुद्धा अगदी उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये बाजारातील पडझडीच्या काळात आणखी घसरण होऊ शकते. पडझडीच्या काळात बाजाराचा ‘बॉटम’ किंवा तळ ओळखणे अत्यंत कठीण असल्याने तळ ओळखण्याच्या फंदात पडू नये. कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन गुंतविलेल्या भांडवलावर उत्तम परतावा मिळवत व्यवसायवृद्धी करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये संधी ओळखून ‘बॉटम फिशिंग’च्या ऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करणे योग्य ठरू शकते.

सध्या फंडामेंटल्सचा विचार करता, ‘निफ्टी’ १९ ‘पीई’च्या आसपास ‘ट्रेड’ होत आहे. दीर्घावधीच्या दृष्टीने मागील लेखांमध्ये नमूद केल्यानुसार, सध्या गुंतवणूकदारांनी टीसीएस, डिव्हिज लॅबोरेटरीज, एसबीआय कार्डस, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आदी कंपन्यांच्या शेअरचा विचार करावा. या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com