शेअर मार्केट : सावधान...! धावत्या गाडीत चढणे धोकादायक!

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ६०,८२१ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १८,११४ अंशांवर बंद झाला. एकसष्ठी साजरी केल्यानंतर ‘सेन्सेक्स’ने १९ ऑक्टोबरपासून सलग चार दिवस घसरण नोंदविली.
शेअर मार्केट : सावधान...! धावत्या गाडीत चढणे धोकादायक!

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ६०,८२१ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १८,११४ अंशांवर बंद झाला. एकसष्ठी साजरी केल्यानंतर ‘सेन्सेक्स’ने १९ ऑक्टोबरपासून सलग चार दिवस घसरण नोंदविली. आलेखानुसार, ‘सेन्सेक्स’ जोपर्यंत ५८,५५१ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत सद्यःस्थितील घसरण म्हणजे ‘करेक्शन’ किंवा मोठ्या तेजीनंतरचा घेतलेला उसासा असल्याचे सूचित होत आहे. फंडामेंटल्सनुसार बाजार महाग असल्याने, बाजार केवळ ‘करेक्शन’ दाखवत असला तरी सावध राहणे योग्य ठरेल. आधी दुधाने पोळल्यावर मग ताक फुंकून पिण्यापेक्षा आधीच सावध असणे कधीही हिताचे!

‘आयआरसीटीसी’ची सापशिडी

एप्रिल महिन्यात रु. १५५० ला असलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि. (आयआरसीटीसी) या कंपनीच्या शेअरने हळूहळू वेग पकडत ‘बुलेट ट्रेन’च्या गतीने १९ ऑक्टोबरला प्रति शेअर रु. ६३९६ पर्यंत धाव घेतली. एकास पाच या प्रमाणे या कंपनीच्या शेअरचे येत्या आठवड्यात ‘स्टॉक स्प्लिट’ अर्थात ‘फेस व्हॅल्यू’चे विभाजन होणार आहे. लॉकडाउनच्या काळात व्यवसायावर मर्यादा आल्याने २०२० मध्ये या कंपनीच्या शेअरने रु. १९७७ पासून रु. ७७४ पर्यंत मोठ्या प्रमाणात घसरण नोंदविली. रेल्वे तिकीट बुकिंग; तसेच रेल्वेमध्ये खानपान देण्याचा व्यवसाय करणाऱ्या आयआरसीटीसी या सरकारी कंपनीसाठी लॉकडाउन हे एक तात्पुरते संकट होते. कंपनी लॉकडाउनपूर्व काळात व्यवसायातून उत्तम परतावा मिळवत प्रगती करीत होती. एकूण व्यवसायाचे स्वरूप लक्षात घेता, आगामी काळातील व्यवसायवृद्धीच्यादृष्टीने गेल्या वर्षापासून अगदी एप्रिल २०२१ पर्यंत रु. ११९० ते रु. १८०० मध्ये रेंगाळणारा हा शेअर म्हणजे गुंतवणुकीची नामी संधीच होती.

याबाबत लेखाच्या माध्यमातून यापूर्वी वेळोवेळी सूचित केले होते. पण एकंदरीत वेगाने वाढणाऱ्या बाजारात अशा रेंगाळणाऱ्या शेअरमध्ये दडलेली संधी अनेक गुंतवणूकदारांना आकर्षक वाटली नाही. मात्र, नंतर शेअरने वेग पकडला आणि ‘स्टॉक स्प्लिट’च्या बातमीने वाढणाऱ्या शेअरला जणू इंधनच मिळाले. पाहता पाहता काही महिन्यांतच भाव रु. ६३९६ पर्यंत वर गेला. भाव खूप वेगाने वाढत असताना अनेकांनी या शेअरमध्ये नफा मिळविण्यासाठी ही पळणारी ‘बुलेट ट्रेन’ पकडण्याचा प्रयत्न केला आणि अचानक गेल्या आठवड्यात शेअरने रु. ६३९६ वरून रु. ४३७७ पर्यंत घसरण केली. एकूणच ‘आयआरसीटीसी’च्या शेअरचा भाव सापशिडीसारखा वर-खाली होताना दिसत आहे.

ज्याप्रमाणे धावती गाडी एकदम पकडण्याचा धोका पत्करू नये, त्याचप्रमाणे कमी अवधीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यावर वरच्या पातळीला अशा प्रकारे शेअरमध्येदेखील व्यवहार करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. कंपनीच्या मिळकतीमध्ये आगामी काळात होऊ शकणारी वाढ; तसेच ‘फ्री कॅश फ्लो’ म्हणजेच मुक्त रोख प्रवाहात होऊ शकणाऱ्या वाढीच्या तुलनेत शेअरचा भाव कमी वेळात जास्त वेगाने वाढला असेल, तर अशा पद्धतीने शेअरमध्ये घसरण होणे स्वाभाविक असते. यामुळे दीर्घावधीची गुंतवणूक करताना देखील कंपनीच्या विक्री, मिळकत आणि ‘फ्री कॅश फ्लो’मध्ये होऊ शकणाऱ्या वाढीचे प्रमाण आणि शेअरच्या भाववाढीचे प्रमाण लक्षात घेणे योग्य ठरते. ट्रेडिंग करताना देखील खूप भाव वाढ झाल्यावर ‘ट्रेड’ करण्यापेक्षा आलेखानुसार ‘ब्रेक आऊट’ म्हणजेच शेअर बराच काळ मर्यादित पातळ्यांमध्येच रेंगाळणाऱ्या अवस्थेमधून नुकताच बाहेर पडल्यावर नव्याने तेजीची सुरवात करीत असताना, गरजेनुसार ‘स्टॉपलॉस’ तंत्राचा वापर करून मर्यादित जोखीम स्वीकारणे जास्त योग्य ठरते.

आगामी काळात रेल्वेशी निगडित कंपन्यांच्या संदर्भात नियामक मंडळ, खासगीकरणास प्राधान्य, एकूण दरवाढ; तसेच नफ्यावरील नियमन आदीं बाबतीत सरकारी धोरणांमध्ये बदल झाल्यास आयआरसीटीसी; तसेच इतर रेल्वेशी निगडित कंपन्यांच्या एकूण व्यावसायिक स्वरूपावर परिणाम होणे स्वाभाविक असणार आहे. आगामी ५ ते १० वर्षांत कंपनीच्या नफ्यात वार्षिक तत्वावर किमान १५ टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. अपेक्षित नफ्यातील वाढीच्या तुलनेत कंपनीच्या शेअरमध्ये बाजारातील लहरीपणामुळे शेअरचे भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरल्यास किंवा भाव रेंगाळत राहून तुलनेने कंपनीच्या नफ्यात मात्र वाढ होत असल्यास संधी ओळखून दीर्घावधीसाठी या कंपनीचा जरूर विचार करावा. मात्र, सरकारी धोरणांमध्ये बदल होण्याचा धोका लक्षात घेऊन गुंतवणुकीचे प्रमाण मर्यादित ठेवावे.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

एचडीएफसी लिमिटेडकडे लक्ष ठेवा!

फेब्रुवारीपासून रु. २८९६ ते २३५४ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या शुक्रवारी एकूण उलाढालीत लक्षणीय वाढ दर्शवत रु. २९०३ ला बंद भाव देऊन एचडीएफसी लिमिडेट या कंपनीच्या शेअरने मध्यम अवधीच्या आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. जोपर्यंत या कंपनीच्या शेअरचा भाव रु. २३५३ या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये चढ-उतार दर्शवत आणखी भाववाढ दिसू शकते. दीर्घावधीच्यादृष्टीने आगामी १० ते १५ वर्षांतील एकूण व्यवसायवृद्धीचा विचार करता, एचडीएफसी लि. (रु. २९०३) बरोबरच, एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (रु. २७८१), एचडीएफसी बँक (रु. १६८१) या तीन कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी केल्यास दीर्घावधीमध्ये उत्तम परतावा मिळू शकेल, असे वाटते.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com