ब्लॅक स्वान इव्हेंट अन्‌ संधी 

black-swan
black-swan

एल्गार म्हणजे जोराचा हल्ला आणि असा एल्गार ध्यानीमनी नसताना अवचित झाला तर? दाणादाण उडणारच! कितीही ठरविले, तरी अशा आपत्तीला सामोरे जायची कुणाचीच तयारी नसते. प्रसिद्ध लेखक नसीम तालेब म्हणतो, कुणीही कधीही स्वप्नातही न कल्पलेली एखादी घटना अवचित घडते आणि अर्थव्यवस्था ढवळून टाकते. कितीही ठरविले, तरी त्या घटनेचा सामना करण्यास आपण सक्षम नसतो. चीनमधे प्रादुर्भाव होऊन सर्वदूर पसरत असलेला कोरोना व्हायरस अशीच एक घटना आहे. 

वर्ष 2003 मध्ये असाच "सार्स' व्हायरस पसरला होता. तो कोरोनापेक्षा जास्त घातक होता. त्या वेळीदेखील जगभरातील शेअरबाजारांची वाताहत झाली! मात्र, आपल्या शेअरचे झालेले नुकसान! ते टाळता आले असते का? 

नसीम तालेब म्हणतो की, असा एल्गार कधीही होईल, हे गृहीतच धरले पाहिजे. 

वर्ष 2000 मध्ये नॅसडॅक निर्देशांकाची डॉट कॉमचा बुडबुडा फुटल्यावर झालेली आपटी भरून निघायला 15 वर्षे लागली. त्या वेळी (ताळेबंद न बघता) केवळ नावात सॉफ्टवेअर असलेले शेअर गगनाला भिडले होते. इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो, असे काही अपवाद वगळता बाकी असंख्य सॉफ्टवेअर कंपन्या पुढे काळाच्या ओघात कुठे गेल्या कळलेही नाही. हा एल्गार; थोडा लोभ बाजूला ठेवून पचवता आला असता. शेअरच्या मूलभूत कामगिरीवर मिळणाऱ्या भावाच्या कितीतरी पट भाव बाजारात मिळत असेल, तर नफा ताब्यातच घेतला पाहिजे, नाही का? 

वर्ष 2001 चा ट्विन टॉवरवरील हल्ला किंवा 2003 मध्ये झालेला सार्सचा उद्रेक निर्देशांकात 10-12 टक्‍क्‍यांची आपटी देऊन गेला. पण, दोन्ही "ब्लॅक स्वान इव्हेंट्‌स' झाल्यानंतर बाजार काही महिन्यांत सावरले. वर्ष 2008 मध्ये "सब प्राइम'चा फुगा फुटला. हा हंस बाजाराची काही वर्षे घेऊन गेला. वर्ष 2001 मध्ये जपानची फुकुशिमा अणुगळती 4-5 टक्केच पडझड करून गेली आणि आता कोरोनाचे संकट. 

गेल्या वीस वर्षांत या प्रकारच्या दहा घटना घडून गेल्या, हे बघितले की लक्षात येते; ते म्हणजे असे एल्गार होत राहणार. आपणच सावध राहिले पाहिजे. 

कोरोनाचा उद्रेक झाला डिसेंबरमध्ये. त्यानंतर दोन महिने जगभरातील बाजार तेजीतच होते. प्रत्येकाला आशा होती की चित्र निवळेल; पण तसे कदाचित घडणार नाही, अशी पालही मनात चुकचुकत होतीच. 

1. "ब्लॅक स्वान इव्हेंट' होणार, हे लक्षात आल्याबरोबर आपल्या भांडारातील नफा जमा करून किमान 20 टक्के रोखीवर आले पाहिजे. पुढे "बॉटम फिशिंग'च्या भानगडीत न पडता ही रोख रक्कम वाढवत राहिले पाहिजे. बाजार भरपूर वेळ देतो. वर्ष 2007 ऑक्‍टोबरमध्ये सेन्सेक्‍सला पहिले खालचे सर्किट लागले होते. त्यानंतर तो पुन्हा वर आला व त्याने नवीन उच्चांक केला. बाजार पुन्हा कोसळला तो पुढे जानेवारी 2008 मध्ये. 

2. पोर्टफोलिओचे सतत निरीक्षण केले पाहिजे. दीर्घकालीन गुंतवणूक पुढील किमान दोन वर्षे आपण सांभाळणार आहोत का? हे स्वत:ला विचारत राहिले पाहिजे. तसेच, त्या न विकता बाजार पडल्यावर त्यात वाढच करीत राहिले पाहिजे. मात्र, ट्रेडिंगच्या उद्देशाने घेतलेले शेअर्स जरूर विकावे. 

3. ऑप्शनचा व्यवहार शिकून निर्देशांकाचे "पुट ऑप्शन' घेत राहून ते फिरवत राहिले पाहिजे (रोल ओवर). 

4. मंदीचा मार सहन करता आला, तर बाजार स्वत:च प्रचंड मोठी संधी देतो. 2000 मध्ये इन्फोसिसचा शेअर 17000 रुपये, तर लार्सन टुब्रोचा शेअर 60 रुपये होता. 

5. जागतिक दळणवळण ठप्प झाल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेवर अवलंबून असलेले व वरील एल्गाराचा धक्का लागू न शकलेले शेअर जमा करीत राहिले पाहिजे. 

6. स्वत:च्या "पोर्टफोलिओ'चे निरीक्षण करण्याची व त्याप्रमाणे बादल करण्याची ही मोठी संधी आहे. 

7. यापूर्वी सतत सुचविलेले रसायन क्षेत्रातील शेअर उदा. अतुल, पीआय इंडस्ट्री, आरती, नवीन फ्लोरिन गेली दोन वर्षे तेजीत आहेत. त्यावर बारीक लक्ष ठेवून कल (ट्रेंड) बदलल्यास बाहेर पडता येईल. याखेरीज आपले कोटक बॅंक, आयसीआयसीआय घेता येतीलच. 

8. बाजार पडझडीच्या काळात मन स्थिर ठेवणे सर्वांत महत्त्वाचे आहे. 

लेखक गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com