कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे कुणीकडे?

sharemarket
sharemarket

शेअर बाजाराने गेल्या गुरुवारी नवनवे उच्चांक प्रस्थापित केले. ‘सेन्सेक्‍स’ ४१,१६३; तर ‘निफ्टी’ १२,१५८ अंशांना टेकून आला. सेन्सेक्‍स तर रोजच नवनवे शिखर गाठत आहे. पण, ‘निफ्टी’नेही मागे न राहता आत्तापर्यंतचा उच्चांक नोंदविला. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या बाजार भांडवलाने दहा लाख कोटींचा टप्पा गाठला. अबब! काय हे आकडे! आता तर बाजार खाली आलाच पाहिजे, असे म्हणत मंदीवाले पुढे सरसावले आणि चक्क शुक्रवारी बाजार खालीही आला!

असे असले तरी आता गुंतवणूकदारांसमोर मुख्य प्रश्‍न दोन! एक म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ४.५ टक्‍क्‍यांवर आले असताना बाजार वर जातोच कसा? दुसरे म्हणजे, अर्थव्यवस्था मंदावलेली असताना कंपन्यांचे वर गेलेले शेअर विकावे की नाही? 

कोणत्या क्षेत्रात संधी?
प्रथम, शेअर निर्देशांकाचे नवे उच्चांक हे ‘मैलाचे दगडच’ असतात, हे लक्षात घेतले पाहिजे! यापुढे निर्देशांक वर जाणारच नाही, असा निष्कर्ष त्यातून काढता येत नाही. दुसरे म्हणजे, ‘निफ्टी’तील अर्ध्याच्या वर शेअर खालीच आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज यांसारखे मोजकेच शेअर तेजीत आहेत. तेव्हा उरलेला ९० टक्के बाजार अजून वर जायचा आहे! हे लक्षात घेता, सध्या वाहन, औषध उद्योग, बांधकाम क्षेत्र, सरकारी उद्योग अत्यंत आकर्षक पातळीवर मिळत आहेत.

२००७ मध्ये ‘निफ्टी’चा मागील पाच वर्षांचा परतावा २२ टक्के होता. आजपासून मागील पाच वर्षांचा उतारा जेमतेम ७ टक्के आहे. संपूर्ण बाजाराचे भांडवलमूल्य ‘जीडीपी’च्या दीडपट होते, ते आज ८० टक्के आहे. त्या वेळी कारखानदारी किंवा औद्योगिक वाढ (आयआयपी) १८ टक्के होती, आज ती ३ टक्के आहे. ही आकडेवारी ‘सेन्सेक्‍स’ला अजून वरचा टप्पा गाठायचा आहे, हे दर्शविते. आज उद्योग क्षेत्रात जी मंदीसदृश स्थिती निर्माण झाली आहे, तिचे मुख्य कारण ‘एनबीएफसीं’कडून वाहन व गृहोपयोगी वस्तूंना होणारा पतपुरवठा थंडावला आहे, हे आहे. खासगी व सहकारी बॅंका ही पोकळी पूर्णपणे भरून काढू शकत नाहीत. सरकारने उशिरा का होईना याबाबतीत पावले उचलायचे ठरविले आहे. त्याचा परिणाम काय होतो, ते नजीकच्या काळात दिसेलच.

‘जीडीपी’चा परिणाम अल्पकाळ
गेल्या शुक्रवारच्या ‘जीडीपी’ कमी झाल्याच्या बातमीचा परिणाम तात्पुरता होऊ शकतो. स्मशानवैराग्य जसे दोन-चार दिवसांत जाते, तसे काहीसे होऊ शकेल. मुख्य म्हणजे, ही बातमी सर्वांना ठाऊक झालेली आहे. तेव्हा तिची भीती मनातून काढून टाकली पाहिजे. कदाचित, ‘सेन्सेक्‍स’ काही काळ विसावा घेईल. पण, मग इतर क्षेत्रांतील शेअर चालतील. त्यांच्याकडे लक्ष द्यावे. शेअर बाजार नेहमी पुढे काय होणार, या अपेक्षेने आधीच हलतो. आता सरकारला नक्कीच नव्या सुधारणा कराव्या लागतील, नवी पावले उचलायला लागतील, असे बाजाराला वाटते. सरकारच्या येऊ घातलेल्या नव्या धोरणांमुळे पुढील वर्षी मंदी दूर होईल, अशी बाजाराला आशा आहे. आकाश भरून आले, तर बळिराजाच्या डोळ्यांसमोर उभे पीक डोलायला लागते, तसे काहीसे आहे. त्या आशेवर बाजार वर-वर जात आहे.

नफा पदरात पाडून घ्या!
‘अशावेळी काय करावे,’ हा प्रश्‍न स्वाभाविक आहे. त्यावर नेहमीचाच सल्ला म्हणजे भरपूर नफा दिसत असलेल्या गुंतवणुकीतून थोडासा नफा पदरात पाडून घ्यावा. वर्षभरात दुप्पट झालेला शेअर विकला तर काय हरकत आहे? नव्या संधी येतीलच. वाहने, औषध उद्योग व बांधकाम क्षेत्राकडे नव्याने बघण्याची हीच वेळ आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी पुढील तीन ते पाच वर्षांचा विचार करून आजच्या दुर्लक्षित क्षेत्रांतील चांगल्या कंपन्यांचे शेअर ताब्यात घ्यावेत.

(लेखक शेअर बाजाराचे ज्येष्ठ विश्‍लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्याच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही. वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com