esakal | मुंबईत तीन एकर जमिनीची किंमत किती? ऐकलंत, तर डोळे दिपतील..!
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत तीन एकर जमिनीची किंमत किती? ऐकलंत, तर डोळे दिपतील..!

मुंबईत तीन एकर जमिनीची किंमत किती? ऐकलंत, तर डोळे दिपतील..!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई: बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील तीन एकर प्लॉटसाठी एका जपानी कंपनीने जबरदस्त ऑफर दिली आहे. जपानच्या सुमिटोमो या कंपनीने बीकेसीतील प्लॉटसाठी तब्बल 2,238 कोटी रुपयांची बोली लावली आहे. म्हणजेच 745 कोटी रुपये प्रति एकर या दराने हा प्लॉट विकत घेण्याची या कंपनीची तयारी आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. जपानच्या या आघाडीच्या कंपनीने बोली लावलेल्या या जागेसाठी स्थानिक विकासकांकडून मात्र कोणीही समोर आलेले नाही. स्थानिक बाजारपेठेतील रोकडच्या अभावामुळे हा प्लॉट विक्रीला काढून काही महिने झालेले असतानासुद्धा स्थानिक विकसक या व्यवहारात पुढे आलेले नाहीत. 

याआधी देशातील सर्वात महागडा व्यवहार 2010 मध्ये झाला होता, जेव्हा लोढा समूहाने मुंबईतील वडाळ्यातील 6.2 एकर जागेसाठी 653 कोटी रुपये प्रति एकर ही ऑफर दिली होती. मुंबई मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथोरिटीमधील (एमएमआरडीए) या प्लॉटसाठी हा व्यवहार एकूण 4,050 कोटी रुपयांना झाला होता. स्थानिक तज्ज्ञांनी जपानी कंपनीच्या ऑफरची संभावना खूपच अतिरिक्त किंमतीची अशी केली आहे. सुमिमोटो, कदाचित फ्लोअर स्पेस इंडेक्स पद्धतीचा वापर करून हा प्लॉट घेत असावी ज्यात 10 लाख चौ. फूटांचा बिल्ट अप एरिया कंपनीला मिळेल, अशी शक्यता एमएमआरडीएने व्यक्त केली आहे. मात्र अजून या प्रस्तावाची प्रक्रिया सुरू असल्याचे एमएमआरडीकडून सांगण्यात आले आहे. सुमिमोटोचे जपान, आशिया, युरोप आणि आखाती देशांमध्ये व्यवसाय आहेत. त्याचबरोबर आफ्रिका, उत्तर-मध्य-दक्षिण अमेरिकेतही कंपनीने हातपाय पसरलेले आहेत. या कंपनीची स्थापना 1919 मध्ये झाली होती. यंदा सुमिमोटो आपला 100 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. सुमिमोटो मुख्यत: क्षेत्रांमध्ये व्यवसाय करते. धातू उत्पादने, दळणवळण आणि बांधकाम, पायाभूत सुविधा, प्रसारमाध्यमे-डिजिटल, खाणी-केमिकल्स आणि रिअल इस्टेट ही सहा क्षेत्रे आहेत. 31 मार्च अखेर या कंपनीच्या समभागधारकांच्या शेअरचे मूल्य 25 अब्ज डॉलर इतके आहे. 

loading image