65,250 कोटी रुपयांचा काळा पैसा उघड: जेटली

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

या योजनेमुळे काळा पैसा जाहीर करून कायदेशीर कारवाई टाळता येईल. यातून मिळणाऱ्या कर उत्पन्नामुळे केंद्राला अर्थसंकल्पीय तूट भरुन काढण्यास मदत होणार आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या प्राप्ती जाहीर योजनेअंतर्गत तब्बल 65,250 कोटी रुपयांचा काळा पैसा उघड झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. याअंतर्गत एकुण 64,275 व्यक्तींनी आपले उत्पन्न उघड केले आहे, परंतु या व्यक्तींची ओळख गुप्त राखली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एचएसबीसीच्या यादीतून रु.8,000 कोटींच्या रकमेचे मूल्यमापन झाले आहे. याशिवाय, छापेमारीतून 56,378 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे. प्रत्येक करदात्याने सरासरी एक कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न जाहीर केले आहे. मूल्यमापनाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर या आकडेवारीत आणखी बदल होऊ शकतो, असेही जेटली यांनी नमूद केले.

आर्थिक वर्ष 2015-16 किंवा त्यापुर्वीची बेहिशेबी मालमत्ता जाहीर करण्यासाठी प्राप्ती जाहीर योजनेअंतर्गत चार महिन्यांची मुदत देण्यात आली होती. या योजनेअंतर्गत काळा पैसा जाहीर केल्यास 45 टक्के अधिभार आणि दंड भरावा लागत आहे. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये सप्टेंबर 2017 पर्यंत भरण्याची मुभाही देण्यात आलेली आहे.

या योजनेमुळे काळा पैसा जाहीर करून कायदेशीर कारवाई टाळता येईल. यातून मिळणाऱ्या कर उत्पन्नामुळे केंद्राला अर्थसंकल्पीय तूट भरुन काढण्यास मदत होणार आहे.

Web Title: Black money worth Rs 65,250 cr declared in tax disclosure scheme: Jaitley