शेअर बाजारातील तेजीचे वारे कायम

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चित वातावरणाकडे दुर्लक्ष करीत गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर कायम ठेवल्याने बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजारातील तेजीची लाट कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २१६ अंशांच्या वाढीसह ३७ हजार ७५२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४० अंशांनी वधारून ११ हजार ३४१ अंशांवर बंद झाला.

आजच्या सत्रात बॅंकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना मोठी मागणी दिसून आली. नुकत्याच जाहीर झालेल्या चलनवाढ आणि औद्योगिक उत्पादनाच्या निराशाजनक आकडेवारीचा गुंतवणूकदारांवर फारसा प्रभाव पडला नाही. त्यांच्याकडून खरेदीचा ओघ कायम राहिला. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे. त्याशिवाय, चलन बाजारातदेखील रुपयाची कामगिरी उंचावलेली आहे. परिणामी, बाजारात चौफेर खरेदीचे चित्र असल्याचे शेअर दलालांनी सांगितले.

आजच्या सत्रात इंड्‌सइंड बॅंकेच्या समभागामध्ये सर्वाधिक ४ टक्‍क्‍यांची वाढ झाली. त्याशिवाय येस बॅंक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बॅंक, एसबीआय, बजाज ऑटो, रिलायन्स, एचसीएल टेक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बॅंक आदी समभाग तेजीसह बंद झाले.

जागतिक बाजारांवर ब्रेक्‍झिटचे पडसाद 
जगभरातील प्रमुख शेअर बाजारांवर ब्रेक्‍झिटचे पडसाद उमटत आहेत. विशेषत: कमोडिटी बाजारावर याचा मोठा परिणाम होणार असल्याने आजच्या सत्रात धातू, औषधनिर्माण आणि तंत्रज्ञान आदी क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांवर विक्रीचा दबाव दिसून आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Bombay Stock Exchange benchmark Sensex closed at 37752 points up 216 points