शेअर बाजार अन् रुपया भुईसपाट

शेअर बाजार अन् रुपया भुईसपाट

मुंबई - खनिज तेलाची भाववाढ, रुपयाचे अवमूल्यन, रिझर्व्ह बॅंकेची संभाव्य रेपोदरवाढ आदी घडामोडींनी आज सेन्सेक्‍स आणि रुपया भुईसपाट झाला. अनिश्‍चित वातावरणाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी तुफान विक्री केल्याने दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल ८०६ अंशांनी कोसळून ३५ हजार १६९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा  निर्देशांक निफ्टी २५९ अंशांनी गडगडून १० हजार ५९९ अंशांवर बंद झाला. 

चलन बाजारात रुपयाने डॉलरसमोर सपशेल शरणागती पत्करत ७३.८१ च्या नीचांकी स्तराला स्पर्श केला. अखेर बाजार बंद होताना तो ७३.५७ च्या पातळीवर स्थिरावला. सलग दोन सत्रांत सेन्सेक्‍समध्ये १ हजार ३५० अंशांची घसरण झाली आहे. आयटी, ऑटो, एफएमसीजी, औषधनिर्माण, बांधकाम आदी क्षेत्रातील समभागांची गुंतवणूकदारांनी विक्री केली. विक्रीच्या माऱ्यात रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस, एचयूएल, एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, हिरोमोटो कॉर्प, बजाज ऑटो, इंडस्‌इंड बॅंक, सन फार्मा, ओएनजीसी हे शेअर भरडून निघाले. या समभागांमध्ये दोन ते सहा टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. 

पाच लाख कोटी हवेत विरले!
शेअर बाजारात बुधवार आणि गुरुवारी तुफान विक्री झाली. सेन्सेक्‍स आणि निफ्टीतील पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे या दोन सत्रांत सुमारे पाच लाख कोटी रुपये हवेत विरले आहेत. खनिज तेलाची भाववाढ चलनवाढीस कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे बाजारात विक्रीचा प्रभाव कायम आहे. बुधवारच्या तुलनेत सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल गुरुवारी दिवसअखेर १४०.४० लाख कोटींपर्यंत घसरले. 

अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर घसरण
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इंधनावरील शुल्क कपातीची तीन वाजता घोषणा केली. त्या वेळी सेन्सेक्‍स ७०० अंशांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. मात्र, सरकारच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याने गुंतवणूकदारांनी विक्रीचा जोर वाढवला. पत्रकार परिषद सुरू असताना सेन्सेक्‍सने आणखी २०० अंशांची गटांगळी खाल्ली होती. 

तीन महिन्यांची नीचांकी पातळी 
परकी गुंतवणूकदारांनी काल (ता.३) बाजारातून १ हजार ५५० कोटी रुपये काढून घेतले. मात्र, स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १ हजार ४५० कोटींची खरेदी करत बाजार सावरण्यास हातभार लावला. ऑगस्टमध्ये उच्चांकी पातळीला स्पर्श करणाऱ्या सेन्सेक्‍स आणि निफ्टीत १० टक्‍क्‍यांची घट झाली. आज निर्देशांक तीन महिन्यांचा नीचांकी पातळीवर आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com