Science-and-Technology
Science-and-Technology

Budget 2020:सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये परिवर्तनाच्या दिशेने पाऊल

अर्थसंकल्प 2020 : अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा वार्षिक असला, तरी त्यातील काही तरतुदी या पाच वर्षांसाठी असतात. हे गृहित धरले, तर २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात पारंपरिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित संस्थांच्या तरतुदींचा उल्लेख झाला नाही, याचा अर्थ त्याच्या अगोदरच्या तरतुदी लागू राहतील, असा घ्यायला हरकत नाही.

या पार्श्‍वभूमीवर अर्थमंत्र्यांनी रोबोटिक्‍स, मशीन लर्निंग आणि बायोइन्फॉरमेटिक्‍स यांचा उल्लेख केला, तरी या विषयांसाठी थेट तरतुदी केल्याचे दिसत नाही. विज्ञान संशोधनाचा विचार केल्यास पूंज तंत्रज्ञान (क्वांटम टेक्‍नॉलॉजी) विकासासाठी आठ हजार कोटींची भरीव तरतूद केली आहे. हे नवीन विकसित होणारे तंत्रज्ञान असून याचा उपयोग संवेदक निर्मितीसाठी, सुरक्षित संपर्क यंत्रणेच्या निर्मितीसाठी, हवामान शास्त्रातील प्रारूप निर्मितीसाठी, प्रतिमांचे विश्‍लेषण करण्यासाठी होऊ शकतो.

माहितीच्या सुरक्षिततेसाठी त्याच प्रमाणे दुरुपयोग टाळण्यासाठी आवश्‍यक अशा सांकेतिक पद्धती निर्माण करण्यासाठी होऊ शकतो. पूंज तंत्रज्ञान प्राथमिक अवस्थेत असताना त्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी टाकलेले पाऊल आणि त्यासाठी केलेली भरीव तरतूद ही निश्‍चितच स्वागतार्ह आहे. 

या भरीव तरतुदी व्यतिरिक्त विज्ञानासाठी थेट भरीव तरतूद नाही. तंत्रज्ञान विकास आणि उपयोजनासाठी मात्र अनेक अप्रत्यक्ष तरतुदी दिसतात. शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना या अर्थसंकल्पात आहेत. तंत्रज्ञानावर आधारित शेती हे त्याचे मूळ सूत्र आहे. त्यासाठी २.८३ लाख कोटी एवढी तरतूद केली आहे.

त्यामुळे शेतीला पूरक असे तंत्रज्ञान निर्मितीला चालना मिळू शकते. खतांचा सुयोग्य वापर करायचा असेल तर संगणकावर आधारित स्वयंचलित यंत्र तयार करता येतील हे एक उदाहरण. सौर ऊर्जेची निर्मिती आणि वापर यावर भर देण्यात आला आहे. यासाठी आर्थिक कार्यक्षमता असणारे, जास्त काळ टिकणारे आणि स्वस्त सोलर पॅनेल निर्माण करण्यास वाव आहे. त्यासाठी संशोधन व्हायला हवे. स्मार्ट वीजमीटर, त्याचप्रमाणे पुरवठादार निवडण्यासाठी मुभा यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करावा लागेल.

आरोग्यासाठी रुग्णालयांची निर्मिती आणि निदान आणि उपचारांसाठी लागणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीला चालना देण्यात येणार आहे. इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी दिलेल्या सवलती वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीला चालना देणाऱ्या ठरतील. 

निर्माण होणाऱ्या माहितीच (डेटा) साठवण, विश्‍लेषण आणि उपयोजन हे सध्या महत्त्वाचे क्षेत्र आहे. माहिती योग्यप्रकारे गोळा करणे आणि एकत्रीकरण करणे हे मोठे आव्हानात्मक कार्य आहे. देशभर माहिती केंद्र (डेटा सेंटर) स्थापन करण्याची योजना आहे. या पार्श्‍वभूमीवर स्टार्टअप साठी देण्यात आलेली करसवलत महत्त्वाची ठरेल. तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रशिक्षित अभियंत्यांची गरज असते. अभियंत्यांच्या विशेष प्रशिक्षणाची तरतूद यात आहे. देशभर डिजिटल संपर्क यंत्रणेमध्ये भरीव वाढीची तरतूद आहे. यात शाळा, ग्रामपंचायती आणि पोलिस ठाण्यांना जोडले जाईल. हे परिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com