'एकत्रित वाटचाल गरजेची'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई - इस्राईल आणि भारत हे दोन्ही देश नावीन्यपूर्ण संकल्पनांचे जनक आहेत. ज्यांच्याकडे नावीन्यपूर्ण संकल्पना आहेत, त्यांचेच भवितव्य उज्ज्वल आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील उद्योजकांनी नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन एकत्रित वाटचाल करणे जरूरी आहे, असे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी येथे सांगितले.

मुंबई - इस्राईल आणि भारत हे दोन्ही देश नावीन्यपूर्ण संकल्पनांचे जनक आहेत. ज्यांच्याकडे नावीन्यपूर्ण संकल्पना आहेत, त्यांचेच भवितव्य उज्ज्वल आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील उद्योजकांनी नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन एकत्रित वाटचाल करणे जरूरी आहे, असे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी येथे सांगितले.

सीआयआय आणि अन्य उद्योजक संघटनांच्या उद्योजक परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी उद्योजकांसमोर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळलीच; पण दोन्ही देशांतील भागीदारीचे स्वागत करताना भारतीय उद्योजकांना आमंत्रणही दिले. इस्राईलच्या तंत्रज्ञानामुळे भारतीय शेती क्षेत्राला फायदा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नावीन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार आणि इस्राईल सरकार नेमकी याच दिशेने वाटचाल करत आहे. दोन देशांची भागीदारी प्रगतिपथावर असून, त्यांच्यातील गुणवत्तेचा संगम आपल्याला साधायचा आहे, यावरही नेतान्याहू यांनी भर दिला. संकल्पनांना प्रोत्साहन देणे, सरकारी हस्तक्षेप कमी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

स्पर्धा थांबता कामा नये
आज जगातील १५ देश माझी झोप उडवत आहेत. त्यात इराण, सीरिया नाहीत तर जागतिक बॅंकेच्या स्पर्धात्मक निर्देशांकात आमच्यापेक्षा वरच्या क्रमांकावर असलेले स्वित्झर्लंड, सिंगापूर, अमेरिका हे आहेत. ते इस्राईलला कसे मागे टाकतात, ते नेमके काय करतात, अशी चिंता मला सतावते. अर्थात ते योग्य तेच करतात आणि आम्हीही दोन वर्षांत २७ वरून १५ व्या क्रमांकावर मजल मारली. आमचे पुढील ध्येय पहिल्या क्रमांकाचे आहे. आपल्या यशावर संतुष्ट होऊन थांबू नका आणि स्पर्धा करणे केव्हाही थांबवू नका. विकास साधण्यात त्याचा नक्कीच फायदा होईल, असा सल्लाही त्यांनी दिला. १९८३ मध्ये वर्ल्ड कप क्रिकेट जिंकलेल्या भारताला स्पर्धेचे महत्त्व माहिती आहेच, असा दाखलाही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांना फायदा
इस्राईलने शेतीमध्ये आणलेले क्रांतिकारक तंत्रज्ञान आम्ही भारतालाही देत आहोत. भारतासारख्या मोठ्या देशाला आम्ही केलेले हे साह्य आम्हाला अभिमानास्पद वाटते. हे तंत्रज्ञान भारतातील हजारो शेतकऱ्यांना मिळून येथील शेतीची उत्पादकता वाढणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: business news Benjamin Netanyahu