स्वतःची कार, नको रे बाबा!

रविवार, 14 जानेवारी 2018

केवळ परवडते म्हणून नाही, तर पर्यावरणाविषयी जागृत असलेल्या तरुणाईकडून राइड-शेअरिंगचा पर्याय स्वीकारला जात आहे.
- ओला कंपनी प्रवक्ता

पुणे - केवळ अडीच मिनिटांची प्रतीक्षा व जास्तीत जास्त फक्त शंभर मीटर चालत जावे लागेल अशा पद्धतीने जर शहरांतर्गत प्रवासी वाहतूक यंत्रणा विकसित झाली तर? होय, असा अभ्यास न्यूयॉर्क शहरात सुरू आहे आणि त्याचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. या अभ्यासानुसार त्या यंत्रणेमध्ये संपूर्ण शहरासाठी फक्त तीन हजार कॅब पुरणार आहेत. अशाच प्रकारचे ‘शेअर इकॉनॉमी’ मॉडेल व्यावसायिक माल वाहतुकीसाठीही वापरण्यात येईल असा ट्रेंड  दिसत आहे. 

चीन, अमेरिका, जपान अशा विविध देशांमध्ये स्वतःची आणि नवीन कार विकत घेण्याच्या प्रमाणात घट होत आहे. या देशांमध्ये जारी करण्यात येणाऱ्या वाहन परवान्यांच्या संख्येतही घट होत आहे. विशेषतः ‘मिलेनियल्स’ म्हणजे अठरा वर्षे वय पूर्ण झालेल्या मुला-मुलींचा ‘शेअर कॅब’ सेवा वापरण्याकडे कल आहे. एका सर्वेक्षणानुसार चीनमध्ये यंदाच्या वर्षी एकतृतीयांश इंटरनेट युजर हे ‘राइड- शेअरिंग’ सेवा वापरणार आहेत. हेच प्रमाण पुढील वर्षी ४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्याचे संकेत आहेत. भारतातही उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत वर्गामध्ये असाच ट्रेंड दिसू लागला आहे. स्वतःची मोटार विकत घेणे, तिच्या देखभाल- दुरुस्तीवर खर्च करणे आणि चालकाचा पगार हा सर्व खर्च टाळून ‘शेअर कॅब’ वापरणे सोयीचे असल्यामुळे हा बदल दिसत आहे. 

राईड- शेअरिंगच्या व्यवसायात असलेल्या कंपन्यांनी विकत घेतलेल्या मोटारींच्या संख्येतूनही हा बदल अधोरेखित होतो. मोबोलिटी क्षेत्रात काम करणाऱ्या ‘इंटेलिमेंट टेक्‍नॉलॉजी’चे संस्थापक प्रशांत पानसरे म्हणाले, ‘‘जगभरामध्ये नॉलेज इकोनॉमीकडून ‘एक्‍सपिरियन्स इकॉनॉमी’कडे वाटचाल सुरू आहे. ओला, उबेर अशा कंपन्या या ग्राहकांना चांगला ‘एक्‍सपिरियन्स’ देण्यावर भर देणाऱ्या आहेत. म्हणूनच एखादी कार ही त्या कंपनीच्या मालकीची आहे किंवा नाही याचा विचार न करता ग्राहक सेवेच्या अनुभवाला महत्त्व देत आहेत. केवळ एखाद्या मोबाईल ॲपवरून पाहिजे ते उत्पादन वापरायला मिळणे आणि त्यातून चांगला अनुभव घेणे याकडे ग्राहकांचा कल असेल.’’

Web Title: business news car Share economy