'कॉंग्निझंट'मध्ये घेतली 400 वरिष्ठांनी निवृत्ती

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

वरिष्ठ स्तरावरील ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन 40 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशांसाठी देखील हा पर्याय खुला होता, असे सूत्रांनी सांगितले.

बंगळूर : माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील 'कॉंग्निझंट' कंपनीने वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय दिल्यानंतर कंपनीच्या 400 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे. 'आयटी' क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे 'कॉंग्निझंट'ने मनुष्यबळ कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

अमेरिकेच्या 'नॅस्डॅक'मध्ये नोंदणीकृत असलेल्या कॉग्निझंट कंपनीचे बहुतांश कामकाज तमिळनाडू राज्यातून चालते. 'कॉग्निझंट'कडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने संचालक पातळीपासून ते वरिष्ठ उपाध्यक्षपदी असलेल्या वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय खुला ठेवला होता. वरिष्ठ स्तरावरील ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन 40 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशांसाठी देखील हा पर्याय खुला होता, असे सूत्रांनी सांगितले.

भरपाई म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान नऊ महिन्यांचा पगार देण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे आता काही कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारल्याने कंपनीची दरवर्षी 6 कोटी डॉलरची बचत होणार आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र भारतातील किती कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय स्वीकारला त्याबाबत माहिती देण्यात आली नाही.

31 डिसेंबर 2016च्या प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, 'कॉग्निझंट'मध्ये जगभरात दोन लाख 60 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी एक लाख 88 हजार, म्हणजेच एकूण मनुष्यबळाच्या 72 टक्के कर्मचारी भारतात काम करतात.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: business news cognizant 400 senior employees retired